Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

‘गतिमंदांच्या समस्यांबाबत जनतेनेच सरकारला जागे करावे’
रेड स्वस्तिक सोसायटीचा आठवा वर्धापनदिन

मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरविणारे राज्य सरकार गेल्या ५० वर्षांपासून गतिमंदांच्या समस्यांबाबत, त्यांच्या पुनर्वसनाबाबत गप्प कसे बसू शकते, असा प्रश्न उपस्थित करीत ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी या प्रश्नासाठी आता लोकांनीच पुढे येऊन राज्य सरकारला जागे करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच असे झाल्यास ही समस्या सुटण्यास फारसा वेळ लागणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला. रेड स्वस्तिक सोसायटी या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नेहरू केंद्र येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जोगळेकर बोलत होते.

‘काँग्रेसने दिलेली कर्जमाफी राष्ट्रवादीने घातली खिशात’
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

मागील अर्थसंकल्पात केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्या कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्यापोटी नाबार्डमार्फत ३१०० कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे जमा झाले. परंतु जिल्हा सहकारी बँकांच्या थकित रकमेपोटी ही रक्कम राज्य सहकारी बँकेने वळती करून घेतल्याने रबीच्या हंगामात मागील कर्ज माफ होऊन शेतकऱ्यांना नवी कर्ज मिळाली नाहीत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केला.

‘गजनी’, ‘जाने तू. या जाने ना’ ‘वेनस्डे’, आघाडीवर
१५ वा स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळा

मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार-स्क्रीन पुरस्कार संध्येच्या निमित्ताने नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अवघी चित्रपटसृष्टी सज्ज झाली असून उद्या बुधवारी संध्याकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर बॉलीवूडमधील तारकांची मांदियाळी उतरणार आहे. नामांकनांच्या यादीकडे पाहूनच या रंगतदार सोहळ्याची कल्पना येते. २००८ हे वर्ष गाजविणारे चित्रपट, चित्रपट तारकांची उपस्थिती, ग्लॅमर आणि भरपूर गमती-जमतींनी यंदाचा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

‘उत्तर प्रदेश दिन’विरोधात मनसेची आक्रमक भूमिका
संदीप आचार्य
मुंबई, १३ जानेवारी

संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ हुतात्मांनी बलिदान केले होते. त्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला. त्याचे स्मरण म्हणून १ मे हा महाराष्ट्रदिन साजरा केला जातो. उत्तर प्रदेश दिन हा खुद्द उत्तर प्रदेशातही साजरा होत नाही. मग मुंबईत ही नौंटकी कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी केल्याने येत्या २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रात या संदर्भात मनसे कार्यकर्ते विरुद्ध उत्तर प्रदेश दिन संयोजक, अशा चकमकी घडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. याच पाश्र्वभूमीवर येत्या २४ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे येथील जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.

‘भारनियमन कमी झाल्याचा दावा दिशाभूल करणारा’
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील वीज उत्पादनात ८६० मेगाव्ॉटची वाढ झाल्याने राज्यातील भारनियमन तीन तासांनी कमी करीत असल्याची ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली.
वीज उत्पादनात एक मे.व्ॉ.चीही भर पडली नसताना उत्तरेतून मिळणाऱ्या विजेच्या प्रमाणात झालेली वाढ, आर्थिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील विजेच्या मागणीत झालेली घट याचा आधार घेऊन भारनियमन कमी झाल्याचा डिंडोरा ऊर्जामंत्री पिटत असे भांडारी म्हणाले. रायगड जिल्ह्यातील स्टील, सिमेंट, केमिकल्स, पेस्टीसाईडस उद्योगांना आर्थिक मंदीचा फटका बसल्याने विजेच्या मागणीत घट झाली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील उद्योगांच्या विजेच्या मागणीतील झालेल्या घटीची मागणी माहिती देऊन भांडारी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून राहिल्यावर तोंडघशी पडण्याची पाळी तटकरे यांच्यावर लाल गव्हाच्या प्रकरणात यापूर्वी दोनवेळा आली होती. आता तरी तटकरे यांनी आपली कार्यपद्धती बदलली पाहिजे.

वसंतराव मराठे यांचे निधन
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव मराठे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
संघाचे मुंबई महानगर कार्यवाह म्हणून मराठे यांनी दीर्घकाळ काम केले. रा. स्व. संघ व संघसंबंधित अन्य संस्थांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी कुशलतेने सांभाळली होती. आणीबाणीत मराठे यांनी महत्त्वाची कामगिरी केली. मालाड येथील उत्कर्ष मंदिर शाळा चालविणाऱ्या शिक्षण मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार माधवराव मराठे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. मराठे यांच्या अंत्ययात्रेस राम नाईक, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, औदुंबर भांगे, राजाभाऊ दामले आदी मान्यवर उपस्थित होते.