Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

मंदीची संक्रांत
प्रसाद रावकर
डोंगरीचा परिसर.. दरवर्षी १२, १३ जानेवारीला हा भाग अबालवृद्धांच्या गर्दीने फुललेला असतो.. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीसाठी नवा कोरा मांजा आणि पतंग खरेदीसाठी ही गर्दी लोटते.. पण यंदा मात्र मंदीची संक्रात आहे.. आर्थिक मंदीमुळे पतंगशौकिनांनी हात आखडता घेतला आहे.. खरेदीदारांनी पतंगांकडेच पाठ वळविल्यामुळे दुकानदारही अस्वस्थ झाले आहेत..
मकरसंक्रांतीनिमित्त मुंबईत कानपूर, बरेली, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणावर पतंग आणि मांजाची आवक होते. त्याचप्रमाणे मुंबईतील अनेक घाऊक विक्रेते येथेच पतंग तयार करतात. मुंबईमधील डोंगरी, वांद्रे, कुर्ला आदी ठिकाणच्या घाऊक बाजारातील दुकाने निरनिराळ्या आकारांच्या, रंगांच्या पतंगांनी आणि रंगीबेरंगी मांजाने भरलेल्या फिरक्यांनी सजलेली असतात.

‘स्लमडॉग..’मधील लिटल चॅम्प्स
सुनील डिंगणकर

‘सारेगमप’च्या लिटल चॅम्प्सनी छोटय़ा पडद्यावर धुमाकूळ घातला असतानाच मुंबईतील अजून दोन लिटल चॅम्प्सनी मोठा पडदा गाजविला आहे. ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारां’च्या चार विभागांमध्ये पुरस्कार पटकाविलेल्या ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील ‘छोटय़ा जमाल’ची भूमिका मीरा रोडच्या आयुष खेडेकरने तर ‘पीला हाऊस’मधील ‘चेरी’ची भूमिका गोरेगावच्या तन्वी लोणकरने केली आहे. त्यांच्या अभिनयाचे जगभर कौतुक केले जात आहे. मोठय़ा पडद्यावरील ‘लिटल चॅम्प्सनी’ या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाच्या दुनियेतही मराठी ठसा उमटवला आहे. मीरा रोडच्या कनाकिया स्कूलमध्ये तिसरीत शिकणारा आयुष खेडेकर वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच जाहिरातींमध्ये अभिनय करत आहे.

अर्थकारणाला ओहोटी पण नोकऱ्यांना भरती!
एसबीआयच्या सहयोगी बँकेत ४५०० जागांसाठी ९.५० लाख अर्ज

राजीव कुळकर्णी

जागतिक मंदीच्या तडाख्याने अनेक कंपन्या अडचणीत सापडल्या असल्या तरी कर्मचारी भरतीच्या बाबतीत भारतीय बँका तेजीत असून कारकून श्रेणीतील पदांच्या भरतीत नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या एसबीआयच्या सहयोगी बँकांवरही तरुणांनी पसंतीची मोहोर उठविली. ४५०० जागांसाठी तब्बल ९.५० लाख उमेदवारांनी अर्ज केल्याने याही वेळी एका सत्रात सर्वाची लेखी परीक्षा घेणे बँकेला शक्य होणार नाही. गेल्या महिन्यात एसबीआयच्या संलग्न बँका (स्टेट बँक ऑफ हैदराबाद /म्हैसूर /त्रावणकोर/बिकानेर/जयपूर/पतियाळा) यूको बँक, आयडीबीआय, देना बॅंक, इण्डियन ओव्हरसीज, अलाहाबाद व कॅनरा बँकांनी कारकून/अधिकारी वर्गातील पदांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्या. १ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा परीक्षांचा हंगाम २९ मार्चपर्यंत चालणार आहे.

रुचकर स्वादयात्रा ‘पोपटी’ची
सुनील नांदगावकर

थंडीच्या दिवसात शेतावर जाऊन हुर्डा पार्टी करतात हे सर्वश्रुत आहे. ग्रामीण भागात हुर्डा पार्टीप्रमाणेच अनेक पदार्थाचा आस्वाद थंडीच्या दिवसात घेतला जातो. हिवाळ्याच्या दिवसात रायगड जिल्ह्यात शेतांवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या पार्टीत पारंपरिक पोपटीची लज्जत काही न्यारीच. ई टीव्ही मराठीच्या स्वादयात्रा कार्यक्रमात मकरसंक्रांत विशेष म्हणून चौल, अलिबाग येथील पार्टीतील पोपटीची रेसिपी दाखविण्यात येणार आहे. पांडवकालीन चौल तसेच अलिबाग, नागोठणे या परिसरात वालाची शेंग भरपूर प्रमाणात पिकते. पूर्वी थंडीच्या दिवसात शेतावर राखणदारीसाठी गेल्यानंतर लोक शेकोटी पेटवीत.

मुंबईकरहो, सजग व्हा..
जागतिक कीर्तीचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या मुंबापुरीतील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करते. पाणीपुरवठा हे त्यापैकी एक प्रमुख काम. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई झपाटय़ाने विस्तारली. एकेकाळी सात बेटांची असलेली मुंबई आणि उपनगरे आज सुमारे ४३७.७१ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर उभी आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार मुंबईत साधारण ११.९ दशलक्ष घरे विसावली आहेत. मुंबई आणि लगतच्या उपनगरांना पाणीपुरवठा करण्याचे मुख्य काम बृहन्मुंबई महानगरपालिका करते. एकेकाळी मुंबईमध्ये गोडय़ा पाण्याच्या अनेक विहिरी आणि तळी होती. याच विहिरी आणि तळ्यांमधील पाण्याने जुन्या मुंबईची तहान भागविली जात असे.

दीर्घायुष्याच्या वाटेवरच्या पाऊलखुणांचा मागोवा
प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त करणे सहज शक्य झाले आहे. परंतु दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य यामध्ये एक अंधुक रेषा आहे. ही रेषा म्हणजे आपली दिनचर्या. वैद्यकीय क्षेत्रामध्ये या दिनचर्येला फार मोठे महत्त्व दिले जाते. दीर्घायुष्य सुखी व आनंदी करण्यासाठी आयुर्वेदातील जीवनशैली मार्गदर्शक ठरते. आजच्या काळातील महाभयानक आणि गंभीर मानल्या गेलेल्या रोगांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर जीवनशैलीतील बदलही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. आयुर्वेदामध्ये अशा जीवनशैलीसाठी सहज आणि सोपे पर्याय सांगितले आहेत. वर्षांनुवर्षे या पर्यायाचा आदर्श मानवाने अनुभवून जीवन सुखी-आनंदी केले होते, परंतु जागतिकीकरणात मानवाने दगदग, धावपळीचे आणि ताणतणावाचे जीवन नकळतच स्वीकारले आणि तरुणपणातच विविध आजारांना सामोरा जाऊ लागला आहे.

‘द गोवा पोर्तुगीजा’ कूकबुकचे प्रकाशन
प्रतिनिधी : मुंबईतील प्रख्यात डिझायनर रेस्टॉरंट गोवा पोर्तुगीजाच्या सीईओ आणि मास्टर शेफ दीपा अवचट यांनी पॉप्युलर प्रकाशनाच्या सहयोगाने लिहिलेले पहिल्या डिझायनर रेस्टॉरंट पाककलाकृतींच्या 'द गोवा पोर्तुगीजा कुकबुक' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.

संक्रांतीला संकष्टी!
१९ वर्षांनी आलेला योग
प्रतिनिधी

मकरसंक्रांत आणि संकष्टी चतुर्थी असा योग १९ वर्षांनी आलेला आहे. यापूर्वी १४ जानेवारी १९९० रोजी असा योग आल्याचे पंचांगकर्ते ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तीळ हे हविष्यान्न असल्याचे संकष्टी चतुर्थीचा उपवास असतानाही तीळगूळ खाण्यास हरकत नाही. त्यामुळे आज गणेश उपासक संकष्ट चतुर्थीचा उपवास असतानाही तिळगुळाचे लाडू खाऊ शकतात. सूर्याने सायन मकर राशीत २१ डिसेंबर रोजी प्रवेश केला. तिथपासूनच आपल्या येथे दिनमान वाढू लागले. आपली पंचांगे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने आज १४ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजून २६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे, असे दा. कृ. सोमण यांनी कळविले आहे.

डॉ. दत्ता सामंत स्मृतिदिनी गिरणी कामगारांचा संकल्प मोर्चा
प्रतिनिधी: दिवंगत कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनी, १६ जानेवारी २००९ रोजी मुंबईत गिरणी कामगार तसेच सुरक्षा रक्षक यांच्या संकल्प मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या वतीने सुरक्षा रक्षकांचा मोर्चा, तर गिरणी कामगारांच्या संकल्प मोर्चाचे आयोजन सर्व श्रमिक संघटनेने केले आहे. दोन्ही मोर्चे १६ जानेवारीला दुपारी ४ वाजता डिलाईल रोडच्या करीरोड नाका येथून सुरू होतील.
मुंबईतील अनेक गिरण्या उठल्या आणि गिरण्यांच्या जमिनीचे आलिशान शॉपिंग मॉल्स व कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर झाले असले तरी, श्रीनिवास, स्वदेशी, मफतलाल, क्राऊन, क्राऊन प्रोसेस या गिरण्यांमधील कामगारांची देणी अद्याप थकित आहेत. गिरणी कामगारांना घरे, कामगार किंवा त्यांच्या मुलांना गिरण्यांच्या जागेवर तयार होणाऱ्या उद्योग-व्यवसायात पर्यायी रोजगार, पिवळे रेशनिंग कार्ड, कामगार विमा योजनेचा लाभ वगैरे सरकारचे मंजूर आदेशही केवळ कागदावर राहिले आहेत. या मागण्यांसंबंधित सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला लढा तीव्र करण्याचा संकल्प गिरणी कामगार करतील. शिवाय वेतनवाढ व ठेकेदारी प्रथेच्या निर्मूलनासाठी सुरक्षा रक्षकांच्या संकल्प मोर्चात मंडळ तसेच खासगी ठेकेदारीतील सुरक्षा रक्षक सामील होणार आहेत.

‘डॉ. आंबेडकर यांची चळवळ व मराठी साहित्य’वर परिसंवाद
प्रतिनिधी : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा मराठी विभाग आणि बहुजन समता प्रबोधिनी यांच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य ’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’कडून हे चर्चासत्र पुरस्कृत केले आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील समिती कक्षात येत्या १४ व १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत चर्चासत्र होणार आहे. १४ तारखेला होणाऱ्या उद्घाटनच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विद्यमान खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. चंद्रा कृष्णमूर्ती आणि मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या चर्चासत्रात प्रा. अनंत देशमुख, प्रा. पी. जी. जोगदंड, राजेन्द्र करनकाल, संपतराव गायकवावड, यशवंत मनोहर केशव वसेकर, संजय पवार, अर्जून डांगळे, ज. वि. पवार, प्रा. बाबा पाटील आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

जावसई गावात आरोग्य शिबीर
प्रतिनिधी: अंबरनाथ येथील जावसई गावात एकता सेवा संस्थेच्या वतीने आणि जायंट्स ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य शिबीर अलीकडेच गुरूकुल हायस्कूल येथे संपन्न झाले. या शिबिरास जायंट ग्रुपचे डॉ. संजय पवार, डॉ. दीपक साळुंखे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. एस. डी. सकपाळ, डॉ. प्रशांत बधाने, डॉ. सुधीर आडवाणी आणि डॉ. पी. के. भोळे या जनरल फिजिशियन्सनी सर्वसाधारण तपासण्या केल्या. त्याच बरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. संजय हंकारे (दंत चिकित्सा), एकता सेवा संस्थेच्या डॉ. मंगला बोटे व नेत्रविशारद डॉ. दिलीप अहिरे यांनी नेत्र तपासण्या केल्या. त्याचप्रमाणए डॉ. सुजाता मानकामे यांनी रक्तगट तपासण्या केल्या. शिबिराच्या यशस्वितेसाठी एकता सेवा संस्थेच्या प्रमुख सुधा चौबे यांनी व अन्य कार्यकर्त्यांनी काम पाहिले. अंबरनाथ परिसरातील सुमारे ४०० लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.

विलेपाल्र्यात फिल्म सोसायटीचे उद्घाटन
प्रतिनिधी : चित्रपट रसिकांसाठी जागतिक पातळीवरचे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी विलेपार्ले येथे संधी उपलब्ध होत आहे. ‘वाईड अँगल फिल्म सोसायटी’तर्फे प्रत्येक महिन्यातील दोन रविवारी सकाळी १० वाजता जागतिक दर्जाचे चित्रपट दाखविण्यात येतील. या चित्रपटांसाठी विलेपार्ले पूर्व मधील साठय़े कॉलेजमध्ये साऊंड प्रुफ, एअर कंडिशन, डॉल्बी सराऊंड अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे विशेष ऑडिटोरियम सज्ज करण्यात आले आहे.