Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
सांगे सूर्याचां घरीं

 

सूर्याच्या संक्रमणाला तिळा तिळाने वाढ होते. म्हणून मकरसंक्रमणाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. १४ जानेवारीला सूर्याच्या उत्तरायणाला आरंभ होतो. तसा सूर्य फिरता आहेच. दक्षिणायन आणि उत्तरायण हे आपल्यासाठी आपण भाग केले. त्या त्या प्रकाशपर्वात ऋतूंना जे सौंदर्य प्राप्त होते, ते मानवी जीवनावर परिणाम करते. माणसाला जगण्यासाठीच्या ज्या नव्या धारणा लागतात; त्या अंशात्म चिद्रुपातून जन्मतात. त्याचे तीळ हे प्रतीक आहे. या प्रकाशधारणेतून नवा स्नेह जुळतो. त्याचे गूळ हा प्रतीक आहे. म्हणून ‘‘तिळगूळ घ्या. गोड बोला.’’ प्रकाशाच्या अंगणात केलेला मनमुक्त भावसंवाद म्हणजे तिळगूळ. सृष्टीतल्या बहरत्या थंडीत तिळाएवढी उन्हाची तिरीप आली तरी समाधान वाटते. तिळात चेतना आहे. तिळात स्नेह आहे. तीळ चोळला तरी नष्ट होत नाही. तो स्नेह म्हणजे तेल देऊन जातो. म्हणून संक्रांतीला तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात. यामुळे सतत घरात स्नेहशील वातावरण राहावे ही प्रार्थना कुलस्वामिनीला करतात. तिचे पाहणे कोणत्या तरी दिशेला असते. त्याचेही स्वतंत्र भावार्थ आहेत. संक्रांत ही देवता आहे. प्रांतोप्रांती तिचे वेगळे विधी आहेत. संक्रांतीच्या विषिष्ट पर्वकाळात संगमतीर्थात स्नानाला प्रचंड गर्दी असते. पितरांना तिलमिश्रित पाणी देताना त्यांच्या चैतन्याला तो नमस्कार असतो. संक्रांतीला सुगडाची पूजा करतात. हा कृषिविधी आहे. छोटय़ाशा बोळक्यात सोलाणे, उसाचे गंडोरे, देशी गाजर ठेवून ते पूजतात. सोलाणे हे पृथ्वीबद्दल कृतज्ञता, ऊस हा मधुरस; गाजर हा स्नेह यांनी मिळून जगण्याचे उत्तरायण सुफल होवो अशी प्रार्थना असते. अशी प्रार्थना एकोपा निर्माण करून दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करते. तिळात भेद नाही. तसा माणसात भेद नाही. गूळ पक्का, चिवट, कडक, रसपूर्ण नि चवदार असतो. तसा माणूस आहे. आपण सारे सूर्याच्या घरातले आहोत. तेजाचे अंश आहोत. ज्ञानदेव सांगतात- सांगें सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।कीं न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ।। (ज्ञानेश्वरी आ. ४. अ. ३. ओ. ३६१. शं. वा. दांडेकरप्रत.)
सांग! सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो काय? आणि समजा; दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल काय? सूर्याच्या साक्षीने विधायक काम करणे आणि विघातक कामावर एकमुखाने तुटून पडणे याला मकरसंक्रमण म्हणतात. यासाठी हा अक्षरांचा तिळगूळ. सस्नेहपूर्वक!
यशवंत पाठक

कु तू ह ल
तारकासमूह

तारकासमूह म्हणजे काय? ताऱ्यांची तारकासमूहात विभागणी कशी केली गेली?
आदिमानवाच्या काळापासून आकाशनिरीक्षण करणाऱ्या माणसाला सूर्य-चंद्राच्या भ्रमणावरून दिवस-रात्र, महिने व वर्षांची कल्पना करता आली. आकाशात दिसणाऱ्या हजारो ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर चंद्राचे सतत बदलणारे स्थान निश्चित करण्यासाठी ताऱ्यांना अथवा ताऱ्यांच्या गटांना ओळखणे माणसाला गरजेचे वाटले असणार. आपण नेमकं केव्हा ताऱ्यांच्या गटांना नाव द्यायला सुरुवात केली हे आपल्याला अचूक माहीत नाही. परंतु सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी सध्याच्या इराकमधील युफ्राटिस नदीच्या खोऱ्यात विकसित झालेल्या सुमेरिअन संस्कृतीत ताऱ्यांच्या गटांना विशिष्ट नावांनी ओळखण्यास सुरुवात झाली होती, असे पुरावे मिळाले आहेत. चीन, खाल्डिआ, बॅबिलोनिआ येथील संस्कृतीमध्येही ताऱ्यांच्या अनेक गटांची नावे प्रचलित होती. अडीच हजार वर्षांपूर्वी बॅबिलोनिअन लोकांनी सूर्याच्या आकाशातील भ्रमणमार्गाचे बारा भाग केले होते. अशा प्रकारे विभागणी केलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह (कॉन्स्टलेशन) असे म्हणतात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी याने त्या काळात प्रचलित असलेल्या ४८ तारकासमूहांची नोंद केली. आधुनिक काळात, सतत नवनवीन तारकासमूहांची भर पडत होती. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी १९३० मध्ये ‘इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन’ या संस्थेने प्राचीन तारकासमूह विचारात घेऊन संपूर्ण आकाशाची ८८ तारकासमूहांत काटेकोर विभागणी केली. ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वानाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, आयनिक वृत्तावर असलेले बारा तारकासमूह भारतात ‘राशी’ या नावाने ओळखले जातात. मेष, वृषभ, मिथुन ते मीन या बारा राशींची ओळख आपल्याला खरेतर ग्रीकांद्वारे झाली. या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. प्रत्येक तारकासमूहाच्या सीमारेषा निश्चित असतात व या सीमेमधील प्रत्येक तारा हा त्या तारकासमूहाच्या नावाने ओळखतात. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली आहेत.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
मराठय़ांचं पानिपत

धर्मयुद्धाचं आवाहन करून अफगाण सुलतान अहमद शहा अबदालीला यमुनेच्या तीरावर बोलविणाऱ्या सरदार नजिबखानाला उत्तरेतल्या मुसलमान समाजाची साथ मिळालीच, पण सूरजमलसारखे जाटही त्याच्या मागे उभे राहिले. अन्नावाचून मरण्यापेक्षा युद्धात मरू, असा धोशा मराठा सैन्यानं लावल्यावर पानिपतच्या मैदानावर अबदालीच्या सैन्याला मराठा सैन्य भिडले.. पण आधुनिक शस्त्रांनिशी लढणाऱ्या अबदालीसमोर मराठे हरले. विश्वासराव पडला, भाऊ फौजेत घुसले, होळकरांनी पळ काढला आणि मग लाखभर मराठे कामी आले, मराठय़ांचे ‘पानिपत’ झाले, तो दिवस होता १४ जानेवारी १७६१ चा.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
बागेची काळजी

श्यामली आणि शिल्पा शेजारी राहायच्या. श्यामली शिल्पाकडे खेळाला यायची. शिल्पा श्यामलीकडे अभ्यासाला जायची. दोघींची मैत्री होती. दोघी मिळून टीव्ही बघायच्या. पुस्तकं वाचायच्या. श्यामलीला फुलझाडांची आवड होती. तिनं निशिगंधाचे कांदे लावून बागेत मोठा वाफा तयार केला होता. खतपाणी घालून सारी निगा करायची. रोपांची काळजी घ्यायची. रोपं जोमानं वाढत होती.
बाबांनी दक्षिण भारताच्या सहलीचा बेत आखला तेव्हा श्यामलीला आनंद झाला, पण दहा दिवस तिच्या झाडांची काळजी कोण घेणार? तिनं बाबांना विचारलं, ‘‘बाबा, माझ्या बागेचं काय करायचं?’’ ‘‘अगं, शिल्पाला सांग. ती घालेल की पाणी..’’ श्यामलीनं शिल्पाला विचारलं. ती आपल्या छोटय़ा कुत्र्याशी खेळत म्हणाली, ‘‘हो, त्यात काय एवढं, मलाही आवडतात फुलझाडं. मी नक्की रोज घालीन पाणी त्यांना. काळजी नको करूस.’’ श्यामलीनं फाटकाच्या कुलपाची चावी आईला विचारून शिल्पाला दिली आणि ती सहलीला गेली. जाताना ‘दक्षिण भारताची सफर’ हे शाळेच्या ग्रंथालयातलं पुस्तक बरोबर घ्यायला ती विसरली नाही. प्रवासात तिच्या मनात येई, शिल्पा विसरली नसेल ना? झाडांना पाणी रोज घालत असेल ना, की तिला फोन करून विचारावं? कुत्र्यानं वाफा उकरला तर नसेल? हळू हळू नव्या जागा, देवळे, बागा, इमारती, समुद्र पाहण्यात ती रंगून जायची. कधी परतते अन् शिल्पाला सारं वर्णन करून सांगते असं तिला झालं होतं. दहा दिवसांनी सहलीहून परतल्यावर रिक्षातून उतरताच श्यामली बागेकडे धावली. पाहते तो सारी फुलझाडं कोमेजून गेली होती. जमिनीला भेगा पडल्या होत्या. ती कळवळली. धावत ती शिल्पाकडे गेली. शिल्पा फोनवर गप्पा मारत बसली होती.
‘‘काय गं शिल्पा, अशी घेतलीस होय माझ्या बागेची काळजी. मारे मला ऐटीत सांगितलंस, मॅलॅ पॅण अ‍ॅवडतात फुलझ्ॉडं..’’ श्यामलीला संताप आवरेना. ‘‘अगं, सॉरी! मी विसरलेच गं पाणी घालायला. माझा काका आला होता अमरावतीहून. त्याच्याबरोबर भटकण्यात वेळ जायचा. शिवाय टय़ुशन्स, शाळा..’’ शिल्पा कारणं सांगू लागली.
‘‘अगं, पण नक्की पाणी घालेन बागेला असं मला कबूल केलं होतंस तू. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू असं वागलीस.’’
‘‘एवढं काही संतापायचं कारण नाही. इथं ऊन केवढं होतं माहितेय आणि नाही राहिलं लक्षात माझ्या. इतका काय बाऊ करतेस त्याचा.’’ शिल्पाचाही आवाज चढला. नाकपुडय़ा फुगल्या.
स्वत: चूक करून वर बेफिकीरपणा करणाऱ्या शिल्पाचा श्यामलीला आणखीनच राग आला. ती म्हणाली, ‘‘यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही अन् तुझ्याशी बोलणारही नाही.’’
चूक म्हणजे काही अक्षम्य अपराध नव्हे. चुकीबद्दल तुम्हाला वाईट वाटले तर स्वत:ला माफ करा. आजचा संकल्प- माझ्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करून त्याबद्दल मी माफी मागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com