Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

एक हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला निधीची वानवा
जयेश सामंत

शहरातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा सन २००८-२००९ सालचा अर्थसंकल्प म्हणजे फुसका बार ठरला असून, मागील वर्षभरात आपल्या तिजोरीत सुमारे एक हजार कोटींची गंगाजळी उभी करण्याच्या बाता मारणाऱ्या महापालिका प्रशासनाला उत्पन्नाचे ‘टार्गेट’ पूर्ण करताना अक्षरश: फेस आला आहे. या वर्षभरात सुमारे ४०० कोटींचा निधी आपल्या झोळीत पडावा, यासाठी दिल्लीकडे डोळे लावून बसलेल्या प्रशासनाला जवाहरलाल नेहरू विकास योजनेंतर्गत अजून एकही रुपया पदरात पाडून घेता आलेला नाही. यात भर म्हणून की काय, एमएमआरडीएकडून अपेक्षित धरण्यात आलेल्या कर्जानेही महापालिकेस यावर्षी गुंगारा दिल्याने मागील वर्षीच्या सगळ्या योजना पुढच्या वर्षांत जशाच्या तशा मांडण्यावाचून आता आयुक्त विजय नाहटा यांना पर्याय राहिलेला नाही.

नवी मुंबईकरांना दिलासा
मालमत्ता करात वाढ नाही

नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेने येत्या वर्षांतही नवी मुंबईकरांवर कोणत्याही स्वरूपाची करवाढ लादायची नाही, असा निर्णय घेतला आहे. येत्या महिनाभरात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील मालमत्ता तसेच उपकराच्या रकमेत कोणतीही वाढ करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मल्हार’च्या स्वागतासाठी रस्त्यांना मलमपट्टी
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलमधील बहुसंख्य शरपंजरी रस्त्यांना नगरपालिका प्रशासनाने अचानक डांबरीकरणाचे इंजेक्शन दिल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या ‘मल्हार’ महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवरच ही मलमपट्टी केल्याची चर्चा जोर धरत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक नामदार पनवेल नगरीत पायधूळ झाडत असल्यानेच महोत्सव सुरू होण्यापूर्वी पालिकेने घाईघाईने हे पॅचवर्क केले, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

‘शेकाप नेत्याने घेतले रिलायन्सकडून १२ कोटी!’
पनेवल/प्रतिनिधी : पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीने लागू केलेल्या सक्तीच्या स्वेच्छानिवृत्ती विरोधात मौन बाळगणाऱ्या शेकापच्या नेत्याने या कंपनीकडून १२ कोटी रुपये घेतले व हेच पैसे ग्रामपंचायत निवडणुकीत वापरले, असा गंभीर आरोप नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी आमदार विवेक पाटील यांचे नाव न घेता केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसतर्फे विजयी झालेल्या, तसेच निसटता पराभव झालेल्या सदस्यांचा सत्कार तालुका काँग्रेस समितीतर्फे नुकताच पनवेल येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेता श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, अरुण भगत आदी नेते, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकाप करोडपतींना घाबरत नाही, असा शाब्दिक हल्ला आमदार विवेक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्या हल्ल्याला प्रशांत ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. रिलायन्समध्ये पाटील यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटना आहे, मात्र या कंपनीने अन्यायकारक अशी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करून शेकडो कामगारांना एका रात्रीत घरी बसविले. रिलायन्सच्या या अनावश्यक कृतीबद्दल जिल्ह्यातील कामगारवर्गात भयंकर संताप आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशांत ठाकूर यांनी केलेला आरोप महत्त्वपूर्ण ठरला आहे. रिलायन्सने सक्तीची स्वेच्छानिवृत्ती जाहीर करूनही या कंपनीतील कामगार संघटना ताब्यात असणाऱ्या शेकापच्या नेत्याने कंपनीविरोधात साधे पत्रकही काढले नाही. कामगारांना काहीच मदत केली नाही. उलटपक्षी या सोयीस्कर मौनापोटी १२ कोटी रुपये घेतले, असा सनसनाटी आरोप ठाकूर यांनी केला.

डी.वाय. पाटील विद्यापीठात ‘डायनामिक युथ गेम्स’ची सुरुवात
बेलापूर/वार्ताहर

नेरुळ येथील डी.वाय. पाटील विद्यापीठात ऑलिम्पिकच्या धर्तीवर ‘डायनामिक युथ गेम्स’चे उद्घाटन मंगळवारी मोठय़ा दिमाखात झाले. याप्रसंगी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष विजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.‘डायनामिक युथ गेम्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील १४० महाविद्यालये व विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, कराटे, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, थ्रो बॉल आदी क्रीडांचा समावेश आहे. मॅरेथॉन शर्यतीने या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. ऑलिम्लिकच्या धर्तीवर जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल आदींचे कोर्ट विद्यापीठ आवारात निर्माण करण्यात आले आहेत. १८ जानेवारी रोजी समारोपाप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमासह बक्षीस समारंभ व प्रथितयश खेळाडूंच्या प्रदर्शनीय स्पर्धा होणार आहेत. यामध्ये महंमद अझरुद्दीन, धनराज पिल्ले, वरुण बडोला, मानव गोहील आदी सहभागी होणार आहेत. या क्रीडा स्पर्धांमध्ये अन्य शैक्षणिक संस्थांनीही सहकार्य केल्याने विजय पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या विनामूल्य दर्शनी सामन्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.