Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात १५ जणांना सुवर्णपदक प्रदान
प्रतिनिधी / नाशिक

 

ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या कोल्हापूरच्या संदीप कुराडेसह एकूण १५ विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती एस्. सी. जमीर यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या दीक्षान्त सोहळ्यात गौरविण्यात आले. या सोहळ्यात ३५ पदविका, २० पदव्या, चार पदव्युत्तर पदविका, २० पदव्युत्तर पदव्या तसेच १८ विषयांतील विद्यानिष्णात आणि आठ क्षेत्रांसाठी विद्यावाचस्पती पदव्या प्रदान करण्यात आल्या.
विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास कुलगुरू राजन वेळुकर, प्रकुलगुरू डॉ. पंडित पलांडे हेही उपस्थित होते. संदीप कुराडे विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांंमध्ये प्रथम आल्याने त्यास सुवर्णपदकाव्यतिरिक्त पुण्याच्या डॉ. शां. ग. महाजन सत्कार समितीतर्फे प्रायोजित एक हजार रूपयांचे डॉ. शां. ग. महाजन पारितोषिक देण्यात आले. नाशिकच्या के. जे. मेहता ज्युनिअर कॉलेज या अभ्यासकेंद्रातील वैशाली क्षीरसागर (वाणिज्य), के. के. वाघ महाविद्यालय केंद्रातील तरूण देशमुख (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग) यांच्यासह जळगावची वैशाली पाटील (बी.ए.), धुळ्याची प्रज्ञा चिकणे (बी.ए.), महेश तोडणकर, वसुंधरा मिरजे, अमर लोढय़ा, अश्विनी मोरे, दमयंती बारोट, गणेश चव्हाण, मोनिका भोळे, सुशांत नलावडे, राजेश कुमारसिंग, मानसी गणपुले, महेंद्रराज वर्मा व फितर खुशुम यांनाही सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. याशिवाय पैठण, नागपूर, कोल्हापूर या बंदीगृहातील एकूण २० कैद्यांनी कला शाखेत पदवी मिळविल्याने प्रातिनिधीक स्वरूपात या तिन्ही ठिकाणच्या प्रत्येकी एका कैद्यास राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
दीक्षान्त सोहळ्यानिमित्ताने कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, रत्नागिरी, पुणे, मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाचे आवार फुलून गेले होते. सामान्यत पदवीदान समारंभ म्हटला की डोळ्यांसमोर युवावर्ग येतो. मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात मात्र युवावर्गासह पन्नाशी गाठलेल्यांचीही मोठय़ा प्रमाणावर गर्दी होती.
सोहळ्यात प्रारंभी प्रमुख पाहुणे राज्यपाल एस. सी. जमीर, कुलगुरू डॉ. राजन वेळुकर आणि विविध शाखांमधील संचालक पदवीदान मंडपाजवळ पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी सर्वजण आपआपल्या जागी उभे होते. कुलसचिवांनी मानदंडधारण करीत व्यासपीठाकडे आगेकूच केली. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आसनस्थ झाल्यानंतर मानदंड सन्मानपूर्वक ठेवण्यात आला. या कालावधीत ‘ज्ञानगंगा घरोघरी’ ही विद्यापीठाच्या बोधवाक्याची धून एका बाजूला सुरू होती. ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना’ हे विद्यापीठ गीत कैद्यांनी सादर केले.
यावेळी राजेंद्र वडनेरे, डॉ. रमेश वरखेडे, प्रकुलगुरू डॉ. पंडित पलांडे, डॉ. अनंत जोशी, डॉ. प्रकाश अतकरे, डॉ. मनोज किलेदार, रामचंद्र तिवारी, डॉ. शाम अष्टेकर, डॉ. प्रमोद बियानी हे उपस्थित होते. पदवीदान सोहळ्यानंतर कुलपती व राज्यपाल यांनी पदवीधारकांना आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करत आई, वडील, गुरूवर्य यांचा आदर करा असा उपदेश केला. यावेळी
कुलगुरूंनी विद्यापीठाच्या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांचा अहवाल सादर केला. सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली.