Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

नंदुरबारमध्ये आज प्रथम जिल्हा साहित्य संमेलन
वार्ताहर / शहादा

 

नंदुरबार जिल्ह्य़ातील साहित्य वर्तुळात गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची चर्चा होती, त्या प्रथम जिल्हा साहित्य संमेलनास बुधवारपासून येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात सुरूवात होत आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झालेले कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलनाची सुरूवात सकाळी साडेआठला पोलीस मैदानापासून निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष डॉ. पितांबर सरोदे यांनी दिली. पालखीत ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, महात्मा गांधी यांचे हिंद स्वराज्य आणि जोतिबा फुले यांचे शेतक ऱ्यांचा आसूड हे ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्य़ाचे लोकजीवन प्रकट करणारे लोकनृत्य, गरबा, यावेळी सादर करण्यात येणार असून सुमारे एक हजार विद्यार्थी यांचा दिंडीत सहभागी असेल. दिंडीच्या अग्रभागी स्वत: ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत. संमेलनात खान्देशातील साहित्यिकांची उपस्थिती अधिक राहणार असली तरी राज्यातील इतर भागातूनही मान्यवर साहित्यिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. सरोदे यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळा दुपारी ११ ते एकदरम्यान होईल. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे असतील. यावेळी मान्यवरांसह स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे मार्गदर्शन करतील, असे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी सांगितले. दुपारी दोन ते तीन दरम्यान दुसरे सत्र होणार असून डॉ. मु. ब. शहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘माझ्या सहित्याच्या प्रेरणा’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. डॉ. विश्वास पाटील, उज्ज्वल कुलकर्णी, प्रा. अनिल सोनार, वहारू सोनवणे, डॉ. पितांबर सरोदे, प्रा. दत्ता वाघ, प्रा. जीवन जगदाळे, प्रा. नंदकुमार कुलथे हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. संमेलनात केवळ वैचारिकतेचा डोस अधिक होऊ नये, यासाठी दुपारी तीन ते चार दरम्यान उज्ज्वल कुलकर्णी यांच्या अध्यतेखाली कथाकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनघा जोशी, दिनकर मोरे, निंबाजी बागूल, डॉ. संजयकुमार शर्मा, जयवंत देशमुख (पुणे) हे आपल्या कथा सादर करतील. सायंकाळी साडेचार ते सहा दरम्यान काव्य संमेलन रंगणार असून जिल्ह्य़ातील सुमारे ६० कवी या संमेलनात आपल्या कविता सादर करतील. काव्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश चव्हाण असतील. रात्री साडेसात ते दहाच्या दरम्यान सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्य़ाचे प्रतिबिंब उमटेल असे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ात प्रथमच होणाऱ्या या साहित्य संमेलनास साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी केले आहे. स्वागत समितीचे कार्याध्यक्ष पुखराज जैन, उपाध्यक्ष राजू पाटील, किशोरभाई वाणी, संदीप चौधरी तसेच जिल्हा साहित्य अकादमीचे निंबाजी बागूल, विश्राम वळवी, विलास पवार, प्रा. दत्ता वाघ, रमेश चव्हाण, शाहीर हरीभाऊ पाटील, रमाकांत पाटील हे संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.