Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची सीमांकन निश्चिती महिन्याभरात
मालेगाव-नवापूर नियोजित रेल्वेमार्गालाही अनुकूलता
वार्ताहर / मालेगाव

 

मनमाड-मालेगाव-इंदूर या नियोजित रेल्वे मार्गाच्या सीमांकन निश्चितीचे (डिमार्केशन) काम महिन्याभरात सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याची माहिती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे मालेगाव-पिंपळनेर-नवापूर या नव्या रेल्वे मार्गाबाबतही रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अनुकूलता दर्शविली असून खात्याला प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी रेल्वे मंत्रालायने प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती. त्यानतंर मध्यप्रदेश सरकारने या खर्चातील आपला ३२६ कोटीचा हिस्सा रेल्वे मंत्रालयाला देण्याची हमी दिली होती. त्यानुसार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद केल्यानंतर आपला हिस्सा रक्कम मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणार आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गासाठी ४१२ कोटी रुपये एवढा हिस्सा उचलला जाणार असल्याचेही गोटे यांनी सांगितले.
वर्धा-नांदेड आणि मनमाड-इंदूर या दोन रेल्वे मार्गाना एकाच वेळी मंजुरी मिळाली असताना तसे राज्य सरकारने या दोन्ही मार्गासाठीच्या खर्चाच्या आपल्या हिस्स्याची रक्कम एकत्रितरित्या दिली असताना वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाचे आदेश निघाले. परंतु, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे काम अडगळीत पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या मध्यस्थीने आपण रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांची नुकतीच नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्याविषयी सविस्तर कल्पना दिली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या ९ जानेवारीला झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी महिनाभरात इंदूर रेल्वे मार्गाच्या डिमार्केशनचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्याचा दावाही त्यांनी केला. मालेगाव पासून गुजरातला रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या मालेगाव-पिंपळनेर-नवापूर या रेल्वे मार्गाची मागणी देखील गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. १९८१ मध्ये त्याचे प्राथमिक सव्‍‌र्हेक्षण झाले मात्र नंतर त्याकडे साफ दुर्लक्ष झाले. त्यामुळे हा मार्ग होण्यासाठीही रेल्वे मंत्र्यांना आपण साकडे घातल्याचे ते म्हणाले. नाशिक तसेच धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी व मागास भागाच्या प्रगतीस त्यामुळे मोठा हातभार लागेल याकडेही मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता त्यांनी सदर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे गोटे यांनी सांगितले. दरम्यान, लोकसंग्राम पक्षातर्फे आपण धुळे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून निवडून आल्यास हे दोन्ही रेल्वेमार्ग साकारणाऱ्या पक्षास आपला पाठींबा राहील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.