Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पतंगोत्सवासाठी नंदुरबार नगरी सज्ज
वार्ताहर / नंदुरबार

 

मकरसंक्रातीला ठिकठिकाणी पतंग उडविण्यात येत असले तरी गुजरात-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या नंदुरबारच्या पतंगोत्सवाचे महत्व काही वेगळेच. गेल्या आठ दिवसांपासूनच शहर व परिसरात पतंगबाजी सुरू झाली असून मकरसंक्रातीच्या दिवशी या खेळाचा आनंद परमोच्च बिंदू गाठतो. संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हे नंदुरबारच्या पतंगबाजीचे वैशिष्टय़े म्हणावे लागेल.
सभोवतालच्या परिस्थितीत वेगाने बदल होत असतांनाही नंदुरबारकरांनी मकरसंक्रातीला पतंगोत्सव साजरा करण्याच्या पध्दतीत कसलाही बदल केलेला नाही. त्यामुळेच या दिवशी शहरातील सर्व मोकळी मैदाने, घरांचे धाबे, बंगल्यांचे टेरेस यांच्यावर आबालवृध्दांची गर्दी उत्साहाने पतंगबाजीच्या खेळात सामील झालेली दिसते. ज्यांना पतंग उडविता येत नाही ते इतरांना प्रोत्साहन देण्यात आनंद मानतात. पतंगासाठी कोणता दोरा वापरायचा यावर प्रत्येक घरात चर्चा होते. ढील देऊन समोरच्याचा पतंग कापण्यासाठी कोणता दोरा योग्य ठरेल यावर अधिक खलबत केले जाते, मगच दोऱ्याची निश्चिती केली जाते. एखाद्या रणनिती इतकीच काहींसाठी ही पतंगनिती महत्वाची असते.
शहरात वावरतांना कानांवर दोरा, मांजा, पतंग, चक्री, फिरकी हे परवलीचे शब्द पडतात. गेंडा, सक्कल आठ, सक्कल दस, कोंबडा महासक्कल आठ, एके ५६ या आणि इतरही चित्रविचित्र नावांच्या दोऱ्यापैकी या वर्षी कोणता दोरा पाजून आणायचा याचा निर्णय कधीच होऊन दुकानदारांकडे आपला दोरा देऊन त्याचा तयार झालेला मांजा घरी नेण्याची धावपळ आता अंतीम टप्यात आहे. मांजा तयार करून देणारे कारागीर गेल्या कित्येक दिवसांपासून व्यस्त असून ही व्यस्तता अगदी मकरसंक्रातीच्या दिवसापर्यंत कायम असते. आपला मांजा वेळेवर मिळावा, यासाठी कारागिरांकडे आगाऊ आरक्षण करावे लागते. दुकांनामध्ये फिरल्यावर लाल, गुलाबी, पिवळा, निळा या रंगांचा तयार मांजाही लक्ष वेधून घेतो. दोरा चार हजार वार करावयाचा की पाच हजार वार हे आधीच ठरवावे लागते.
पतंगाची खरेदी हा एक वेगळा भाग होय. मकरसंक्रातीच्या दिवशी पहाटे अंधारातच पतंग उडविण्यास इथे सुरूवात होते. त्यातही पतंग उडवितांना स्पर्धा असणार हे प्रत्येकाने गृहित धरलेले असते. पतंग उडविण्यामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू नये यासाठी सर्वजण आधीच आपल्या सोयीनुसार रंगबेरंगी पतंगांची खरेदी करून त्यास आधीच जोतरंग बांधून तयार ठेवतात. कायम स्थिर राहण्यासाठी पतंगास कसे जोतरंग बांधावयाचे तसेच ढील दिल्यावर गोता खात खात जाणारा पतंग दोरा ओढल्यास सरळ वर यावा, यासाठी जोतरंग बांधण्याचे एक कौशल्य असते. पतंगोत्सवाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी पतंग उडविण्यात मग्न असणाऱ्यांसाठी लज्जतदार विविध पदार्थ घराघरातून बनविले जातात. या आनंदात भर टाकण्यासाठी तसेच उत्साह कायम राहाण्यासाठी ठिकठिकाणी संगीताचीही साथ असते. याच उत्साही वातावरणात काटाकाटीची रंगत काही और असते. दुसऱ्याचा पतंग काटला की ‘का..ट..है’ च्या आवाजाने परिसर दणाणून जातो. आसमंतात वाऱ्याशी खेळणारे पतंग तसेच कटलेले हेलकावे खात जमिनीकडे जाणारे पतंगही असतात. हे कटलेले पतंग मिळविण्यासाठी गल्लीबोळांतून उंचच उंच काठय़ा घेऊन धावणारेही दिसत असतात. पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नंदुरबार सज्ज असून या उत्सवास कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडूनही नियोजन करण्यात येत आहे.