Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

वनविभागातर्फे नियंत्रण कक्षाची सुविधा आता २४ तास
प्रतिनिधी / नाशिक

 

बिबटय़ांसारख्या वन्य प्राण्यांबाबतची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी तसेच घायाळ झालेले पक्षी, जखमी अवस्थेतील प्राणी याबाबतही लोकांना माहिती कळविता यावी, या उद्देशाने वन विभागामार्फत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाचे २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक सुद्धा सुरू करण्यात आला असल्याची माहिती नाशिक पश्चिम वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक अरविंद विसपुते यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
परिसरातील बिबटय़ांच्या संख्येत वाढ झाली असून बिबटय़ांनी थेट मानवी वसाहतींमध्ये संचार करण्याच्या घटना अलीकडे सातत्याने घडत आहेत. शहरात घुसखोरी करणाऱ्या बिबटय़ांमुळे त्या त्या भागातील लोकांमध्ये जसे भितीचे वातावरण निर्माण होते, तसेच बिबटय़ाला पकडणे व त्यावेळी तेथे जमणाऱ्या बघ्यांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे या बाबी वनविभागासाठी डोकेदुखी ठरतात.
हे लक्षात घेता या विभागातर्फे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील, त्याबाबत विचार मंथन सुरू झाले असून जगजागृतीपर मोहीमेबरोबरच अशा प्रकारे नियंत्रण कक्षाची गरज असल्याचे निष्पन्न त्यातून झाले. शिवाय, २४ तास अशाप्रकारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवल्यास त्यापासून इतरही प्रसंगी मदत पुरवणे शक्य होईल.
अनेकदा विविध कारणांमुळे पक्षी, प्राणी जखमी होत असतात. अशा वेळी त्यांच्याबाबत नेमके काय करावे, कुणाशी संपर्क साधावा, याची माहिती सर्वसामान्यांना नसल्याने अडचण निर्माण होते. ती दूर होण्यासाठी देखील या माध्यमातून हातभार लागू शकेल. तसेच कुठे साप निघाला अथवा कुणी तो पकडला तरी त्याची माहिती कळविण्यासाठी आणि नोंद ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, वन विषयक गुन्ह्य़ांची माहिती मिळविण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्याकामी सुद्धा हा कक्ष महत्त्वाचा ठरणार आहे. अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची हत्या, तस्करी, प्राण्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवणे त्याबरोबरच वन्य प्राण्यांमार्फत जनतेस होणाऱ्या उपद्रवाबाबतची माहिती, संकटात सापडलेले वन्यप्राणी, पक्षी अशी सर्व माहिती कुणालाही या नियंत्रण कक्षाला देता येईल.
त्यासाठी या कक्षात १५५३१४ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि वन्य प्राण्यांविषयक गुन्ह्य़ांची अथवा इतर माहिती या क्रंमाकावर तातडीने कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या क्रमांकावर वन्य प्राण्यांसदर्भातील माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.