Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

धुळे जि. प. विषय समित्यांवर युतीचे वर्चस्व
धुळे / वार्ताहर

 

जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने त्यांच्या सदस्यांसाठी ३० मते मिळवून सर्वच समित्यांवर वर्चस्व राखले आहे. काँग्रेसच्या गटाला २५ मते मिळविता आली. त्यामुळे भाजप-सेना युतीने पाच मते अधिक मिळवून विषय समित्यांवर निर्विवाद वर्चस्व राखले.
जिल्हा परिषदेवर युतीने राष्ट्रवादी सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. यानंतर विषय समित्यांवरही युतीनेच वर्चस्व राखल्याने जिल्ह्य़ातील विशेषत: ग्रामीण भागात युतीचे कामकाज खऱ्याअर्थाने पोहोचू शकणार आहे. विषय समिती निवडणुकीसाठी हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात युती मित्र पक्षाच्या सदस्यांना ३० मते मिळाली तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटाच्या सदस्यांना २५ मते मिळाली. यात जिल्हा परीषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीनंतर विषय समित्यांच्या निवडणुकीत एका मताने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. विविध विषय समितीच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. ते सर्वच वैध ठरल्यानंतर पार पडलेल्या निवड प्रक्रियेत महिला व बालकल्याण सभापतीपदाची माळ रजनीबाई घरटे यांच्या तर समाजकल्याण सभापतीपदाची माळ सुका बुधा चव्हाण यांच्या गळ्यात पडली. कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी प्रा. अरविंद जाधव आणि बांधकाम सभापतीपदी जितेंद्र हिम्मत बिरारीस यांची निवड झाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग आणि स्थायी समिती तर उपाध्यक्ष भारत ईशी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य सभापतीपद राहणार आहे. परंतु यासंदर्भात अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी गायत्रीदेवी जयस्वाल यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी केली होती. याशिवाय समाजकल्याण सभापती पदासाठी शरद भील व इतर सर्वसाधारण गटासाठी सचिन बेडसे व संगिता देसले यांनी उमेदवारी केली. त्यांचा पाच मतांनी पराभव झाला. सर्वसाधारण गटात ललीत देसले यांनी माघार घेतल्याने सरळ लढत झाली.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. विलास अवचट, भाजपचे आ. जयकुमार रावल, माजी महापौर भगवान करनकाळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख हिलाल माळी, साक्री पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर नागरे, सुरेश पाटील, अ‍ॅड. संभाजी पगारे, सुरेश पाटील, डॉ. सुभाष भामरे, डॉ. महेश घुगरी यांच्यासह पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोटय़ा संख्येने उपस्थित होते.