Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

किरकोळ वादाला सामाजिक स्वरुप न देण्याचे आवाहन
मनमाड / वार्ताहर

 

युवकांच्या दोन गटात झालेल्या वैयक्तीक वादाला सामाजिक स्वरुप देऊ नये. हा वाद थांबवावा व सर्वानी शांतता-सुव्यवस्था राखावी, असे आवाहन आठवडे बाजारात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत मान्यवरांकरवी करण्यात आले.
शहरातील आठवडे बाजार इदगाह परिसरात युवकांच्या दोन गटात मागील भांडणाच्या कुरापतीतून वाद होऊन तुंबळ हाणामारीची घटना घडली. सध्या आठवडे बाजारात सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. मात्र पुन्हा असे प्रकार घडू नये, शांततेचे वातावरण कायम रहावे यासाठी शहर पोलीस ठाण्यातर्फे आठवडे बाजारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संजय पवार, नगराध्यक्ष गणेश धात्रक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, प्रभारी पोलीस उपअधीक्षक रतनकुमार शर्मा आदी उपस्थित होते. उपनिरीक्षक सत्यजित आमले यांनी प्रास्तविकात बैठकीचा उद्देश विषद केला. नगरसेवक संदीप घुले, नगरसेवक सादिक पठाण, अ‍ॅड. सुधाकर मोरे, सागर शिरसाठ, विठ्ठल नलवाडे, राजू पवार आदींनी या भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन दोन्ही बाजूंनी वाद संपवून शांतता राखण्याचे आवाहन केले.
आठवडे बाजारातील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छता गृहास संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने सुरू केले जाईल, नागरिकांनी वाद न करता शांतता राखावी असे आवाहन नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी केले. वादाचे आणि हाणामारीचे परिणाम गोरगरीबांच्या व्यवसायावर होतात असे प्रतिपादन आ. पवार यांनी केले. शहराच्या हितासाठी वाद वाढवू नका असे आवाहन माजी आमदार देशमुख यांनी केले. दरम्यान, शांतता समितीची सभा सुरू असतानाच एका वक्तव्यावरून भर सभेत वाद निर्माण झाला व सभेला जमलेले नागरिक उठून पळू लागले. मात्र कार्यकर्ते व दोन्ही गटातील लोकांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर सभा सुरळीत पार पडली. दोन गटात होणाऱ्या वैयक्तिक वादाला सामाजिक वादाचे स्वरूप देऊ नये, वादाचे मुख्य कारण शोधावे, शहरात एकात्मतेच्या उज्ज्वल परंपरेला तडा जाऊ देऊ नये. सर्व धर्मियांनी सामंजस्य ठेवावे आदी सूचना या बैठकीत करण्यात आल्या. समाजातील ज्येष्ठ नागरिक व पालकांनी आपल्या तरूण मुलांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा पोलीस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहेत. सर्वानी शांतता ठेवावी, पोलिसांना सहकार्य करावे असे सहाय्यक पोलीस अधीक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले.