Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘बचत गटांमुळे महिलांना आत्मसन्मान’
जळगाव / वार्ताहर

 

महाराष्ट्राच्या पुरोगामी धोरणांना अनुसरून स्वयंसहायता गटांची चळवळ सशक्त होण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचा चांगला उपयोग होत असून या चळवळीतून ग्रामीण महिलांना आर्थिक क्षमतेबरोबरच आत्मसन्मानही मिळाला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
जिल्हा बँकेच्या सभागृहात सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत बचत गटांना २००७ व २००८ चे तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवरील जिजाऊ राजमाता स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री डॉ. सतीष पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे, विभागीय आयुक्त डॉ. संजय चहांदे, जिल्हाधिकारी कुणाल कुमार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. रामास्वामी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य असल्याच्या अनुभवाचा फायदा मला आता मंत्री झाल्यावर होतो आहे. त्यामुळेच ग्राम विकास मंत्री म्हणून काम करताना प्रथम बचत गटांच्या अडचणी समजून घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक पंचायत समितीला लवकरच तालुका पातळीवरील बचत गटांसाठी २५ लाख रुपये तर जिल्हा पातळीवरील बचत गटांसाठी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. बचत गटांना सक्षम करणे व त्यांचा सर्वागीण विकास करण्याचा उद्देश यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बचत गटांच्या विकास कार्यक्रम आराखडय़ामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन आत्मविश्वास व त्यातून ग्रामविकास सहजपणे साध्य होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महिला बचत गटांना कमी व्याजदराने कर्ज मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठ पुरावा केल्यावर यश आले. त्यातूनच राज्यातील सर्व महिला बचत गटांना चार टक्के व्याजाने कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या हस्ते जळगावमधील जिजाऊ महिला स्वायंसहायता गट, पाचोरा तालुक्यातील लासलगाव येथील प्रगती महिला स्वयंसहायता गट तसेच भडगाव तालुक्यातील आशा महिला स्वयंसहायता गट यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
जिल्ह्य़ात स्वयंरोजगार योजनेत सात हजार ३८० बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्त्रोत प्राप्त झाला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ५० स्टॉलद्वारे जिल्हा बँक आवारात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही पाटील यांच्या हस्ते झाले. नाशिक विभागात सर्वप्रथम आयएसओ प्रमाणपत्र मिळविणाऱ्या जळगाव पंचायत समितीला या कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.