Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात १५ जणांना सुवर्णपदक प्रदान
प्रतिनिधी / नाशिक

ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या कोल्हापूरच्या संदीप कुराडेसह एकूण १५ विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती एस्. सी. जमीर यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या दीक्षान्त सोहळ्यात गौरविण्यात आले. या सोहळ्यात ३५ पदविका, २० पदव्या, चार पदव्युत्तर पदविका, २० पदव्युत्तर पदव्या तसेच १८ विषयांतील विद्यानिष्णात आणि आठ क्षेत्रांसाठी विद्यावाचस्पती पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास कुलगुरू राजन वेळुकर, प्रकुलगुरू डॉ. पंडित पलांडे हेही उपस्थित होते.

नंदुरबारमध्ये आज प्रथम जिल्हा साहित्य संमेलन
वार्ताहर / शहादा

नंदुरबार जिल्ह्य़ातील साहित्य वर्तुळात गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची चर्चा होती, त्या प्रथम जिल्हा साहित्य संमेलनास बुधवारपासून येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात सुरूवात होत आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झालेले कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलनाची सुरूवात सकाळी साडेआठला पोलीस मैदानापासून निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष डॉ. पितांबर सरोदे यांनी दिली. पालखीत ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, महात्मा गांधी यांचे हिंद स्वराज्य आणि जोतिबा फुले यांचे शेतक ऱ्यांचा आसूड हे ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची सीमांकन निश्चिती महिन्याभरात
मालेगाव-नवापूर नियोजित रेल्वेमार्गालाही अनुकूलता

वार्ताहर / मालेगाव

मनमाड-मालेगाव-इंदूर या नियोजित रेल्वे मार्गाच्या सीमांकन निश्चितीचे (डिमार्केशन) काम महिन्याभरात सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याची माहिती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे मालेगाव-पिंपळनेर-नवापूर या नव्या रेल्वे मार्गाबाबतही रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अनुकूलता दर्शविली असून खात्याला प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी रेल्वे मंत्रालायने प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती. त्यानतंर मध्यप्रदेश सरकारने या खर्चातील आपला ३२६ कोटीचा हिस्सा रेल्वे मंत्रालयाला देण्याची हमी दिली होती.

पतंगोत्सवासाठी नंदुरबार नगरी सज्ज
वार्ताहर / नंदुरबार

मकरसंक्रातीला ठिकठिकाणी पतंग उडविण्यात येत असले तरी गुजरात-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या नंदुरबारच्या पतंगोत्सवाचे महत्व काही वेगळेच. गेल्या आठ दिवसांपासूनच शहर व परिसरात पतंगबाजी सुरू झाली असून मकरसंक्रातीच्या दिवशी या खेळाचा आनंद परमोच्च बिंदू गाठतो. संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हे नंदुरबारच्या पतंगबाजीचे वैशिष्टय़े म्हणावे लागेल.
सभोवतालच्या परिस्थितीत वेगाने बदल होत असतांनाही नंदुरबारकरांनी मकरसंक्रातीला पतंगोत्सव साजरा करण्याच्या पध्दतीत कसलाही बदल केलेला नाही. त्यामुळेच या दिवशी शहरातील सर्व मोकळी मैदाने, घरांचे धाबे, बंगल्यांचे टेरेस यांच्यावर आबालवृध्दांची गर्दी उत्साहाने पतंगबाजीच्या खेळात सामील झालेली दिसते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेनेचे नांदगाव येथे धरणे आंदोलन
वार्ताहर / नांदगाव

तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची थकीत रक्कम त्वरीत मिळावी, तालुक्यात सिंगल फेज योजना राबवावी, नांदगाव-मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत मका खरेदी केंद्र सुरू करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी तालुका शिवसेनेच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार गोविंद शिंदे यांना सादर करण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता म्हणाले की, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत शिवसेनेने वेळोवेळी जनआंदोलन केले, परंतु शासनाला अद्याप जाग आलेली नाही. त्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलनासारखा मार्ग चोखाळण्यात आला आहे. त्यामुळे तरी मागण्या मार्गी लागतील अशी अपेक्षा असून येत्या पंधरा दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास संबंधीत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता कन्नमवार यांनी सांगितले की, तालुक्यातील ट्रान्सफार्मर (रोहित्र) बाबत निविदा काढण्यात आली असून त्याचेही काम थोडय़ाच दिवसात मार्गी लागेल. मोहेगाव येथील उपकेंद्राबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. सहायक निबंधक जे. बी. शेळके यांनी सांगितले, की मनमाड-नांदगाव येथील १८,९०८ शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट अखेर पाच कोटी ८७ लाख रुपये मागणी असताना दोन कोटी ५० लाख एवढेच अनुदान प्राप्त झाले. परिणामी, अद्याप अनेक जण त्यापासून वंचित आहेत. तथापि, अनुदान आल्यानतंर त्याचे वाटप तातडीने करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.