Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
विशेष

(सविस्तर वृत्त)

कोटय़वधी रुपये खर्चून तयार होणारे चित्रपट मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या सामान्य नागरिकांना जगण्याची चेतना देतील, अशी शक्यता नाही. पण उपाशीपोटी गाणे करणारे आणि तेच आपले सर्वस्व मानणारे यांना या सगळय़ा व्यवहारात स्थान कुठे आहे? जगण्याच्या कल्पना बदलत असताना मूल्यांमध्ये जे बदल झाले, ते माणसाला कलांकडे आकृष्ट करत राहिले. त्यामुळेच तर दूरचित्रवाणीवर केवळ करमणुकीला वाहिलेल्या वाहिन्यांची चलती सुरू झाली. करमणूक हा आता माणसाच्या, निदान विकसनशील आणि विकसित राष्ट्रांमधील माणसांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ‘गजनी’च्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे एवढेच!
 
आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटाने प्रथम खेळाच्या उत्पन्नाचा उच्चांक केला, ही बातमी मंदीच्या काळात उत्साहवर्धक आहे. बाजारात उत्पादने नसली, तरी चित्रपटांच्या बाजारात सगळे काही हाऊसफुल्ल आहे. प्रेक्षकांना मंदीचा फटका विसरायला लावणारा हा करमणुकीचा खेळ माणसाच्या संस्कृतीचे दर्शन घडवतो. गाणे-बजावणे करणे हे आपल्या संस्कृतीत एकेकाळी हीनपणाचे मानले जात असे. ज्या कलांच्या उगमांमुळे मानवी आयुष्य सर्वार्थाने संपन्न बनत होते, त्या कलांकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलायला फार काळ जावा लागला. अभिजात कलांच्या बाबतही हेच चित्र होते आणि लोकप्रिय कलांकडे तर नेहमीच खालच्या दर्जाने पाहिले जाते आहे. फार पूर्वी नाही, पण अगदी चित्रपटाच्या आरंभीच्या काळात त्यामध्ये काम करणे हे सामाजिकदृष्टय़ा फारसे मानाचे मानले जात नव्हते. माणसाने इतरांना उपयुक्त होईल, असे काही तरी करणे म्हणजे त्याचे जीवन सार्थकी लागते, असा त्या काळातील सार्वत्रिक समज होता. चित्रपटांच्या आरंभीच्या काळात ज्याला गाता येते, तोच अभिनेता बनू शकत होता, कारण त्या काळात पाश्र्वगायनाचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. नट आणि नटी हे प्रकरण त्या काळात जरा हलक्या आवाजातच हाताळले जात होते. त्यापूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या संगीत नाटकांमध्ये ‘स्त्री-पार्ट’ करायला कोवळय़ा मुलांची मदत घ्यावी लागत असे. नाटकात काम करणे म्हणजे जीवनात वाया जाणे असा समज त्या काळात होता. त्या काळात नाटकात काम करणे सभ्यपणाचे का वाटत नव्हते आणि आता त्याला सामाजिकदृष्टय़ा एवढे महत्त्व का आले, याची समाजशास्त्रीय चिकित्सा कुणी केली नाही. समाज बदलतो, म्हणजे त्याची मूल्यव्यवस्था बदलते आणि ही नवी व्यवस्था त्याच्या जगण्याचे आशयही बदलते. संपन्नतेचे निकष त्यामुळे बदलतात आणि जगण्याचे अर्थही बदलतात. संगीत नाटकात भूमिका करणाऱ्या सगळय़ा पुरुषांना समाजात फारसे मानाचे स्थान नव्हते. कारण तेव्हा जगण्याचे साधन म्हणून नाटक या व्यवसायाला मान्यता नव्हती. गाणाऱ्यालाच समाजात फारसे महत्त्व नव्हते, तर नाटकात गाणाऱ्याला ते कुठून मिळणार? भारतीय संगीताची परंपरा काहीशे वर्षांची असली, तरी तिला समाजमान्यता मिळायला फार उशीर झाला. पोट भरण्यासाठी अन्न मिळवणे हेच जेव्हा माणसाचे प्रथम आव्हान होते, त्या काळात अन्नाशिवाय जगण्याची काही ठिकाणे असतात, हे त्याच्या लक्षात यायचे कारण नव्हते. धान्य पिकविण्याच्या पद्धतींचा शोध हा माणसाला जगण्याचे इतर प्रांत शोधण्यासाठी कारणीभूत झाला असावा. (पोट भरल्यानंतर काय करायचे, हा प्रश्न त्याला भेडसावू लागला असेल आणि त्यातून करमणूक नावाच्या गोष्टीचा उगम झाला असेल!) पुरेसे धान्य निर्माण करण्यासाठी निसर्गात असलेल्या सगळय़ा घटकांचा पुरेपूर वापर करता करता त्याच्या जवळ असलेल्या अग्नी या साधनाने त्याचे जगणे अधिक सुकर केले असले पाहिजे. अग्नीमुळेच अन्न शिजवता येऊ लागले आणि त्यामुळे चावण्याची प्रक्रिया सुकर झाली. एकूण माणसाला कष्ट कमी पडू लागले. शिकार करून खाण्याचे दिवस संपले आणि निसर्गत: निर्माण होत असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे त्याच्या मेंदूची भूकही वाढू लागली. कलांचा उगम आधीच झाला असला, तरी त्या कशाशी खायच्या याचा शोध मात्र नंतर लागला! गाणे असो वा नाटक, त्याचा मानवी व्यवहारांशी फारसा जवळचा संबंध नव्हता. त्यामुळे नाटकात काम करणे किंवा नाटक करणे याला समाजमान्यता नव्हती. सांगलीच्या विष्णुदास भाव्यांनी नाटक केले, तेही महाराजांच्या आशीर्वादामुळे! संगीत नाटक आले तेही समाजातील शैथिल्यामुळे! मनोरंजन करण्याची माणसाची गरज फार अलीकडची! ते त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होण्याची घटना तर त्याही नंतरची! ‘गजनी’च्या पहिल्या खेळाला प्रचंड प्रतिसाद मिळतो, याचे कारण चित्रपट हा आपल्या संस्कृतीतील एक प्रतिष्ठित घटक झाला. (आता चित्रपटात जाण्यासाठी प्रचंड धडपड करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. केवळ ‘सेलिब्रिटी स्टेटस’ आणि त्यातून मिळणारे पैसे यासाठी.. सेलिब्रिटी हेच जीवनमूल्य झाल्याचे हे एक ढळढळीत उदाहरण!) नाटक हे मराठी माणसाचे एकेकाळचे वेड असेल, तर ते केवळ करमणुकीपुरते मर्यादित नव्हते. त्यात जगण्याच्या संपन्नतेचाही संबंध होता. भूतलावरील इतर प्राणिमात्रांप्रमाणे मानवाने करमणुकीला आपल्या जगण्यात स्थान दिले, तेव्हाच तो त्यांच्यापासून वेगळा झाला. संगीत, नाटक, चित्रपट, खेळ, गप्पा, विनोद, लेखन, वाचन या सगळय़ा गोष्टी मानवाला समस्त प्राणिमात्रांपासून अलग असल्याचे सिद्ध करतात. खेळ खेळण्याने बौद्धिक आनंद मिळतो की नाही, यापेक्षा त्यामुळे मन प्रसन्न होते, ही महत्त्वाची गोष्ट ठरली. संगीताने चित्तवृत्ती उल्हसित होतात की नाही, यापेक्षा त्यामुळे आपल्याला संपन्नतेचा अनुभव मिळतो, हे महत्त्वाचे! विनोदाने माणसाच्या मनाला आराम मिळतो की नाही, यापेक्षा त्यामुळे त्याला जगण्याची आकांक्षा राहते, हे महत्त्वाचे! नाटक पाहिल्याने त्याला आपल्याच किंवा आपल्या परिसरातील कुणाच्या जगण्याचा तटस्थ अनुभव मिळतो का, यापेक्षा त्यामुळे त्याच्या विचाराला चालना मिळते, हे महत्त्वाचे! चित्रपट पाहताना आपण काहीतरी अनपेक्षित अनुभवतो आहोत की नाही, यापेक्षा आपल्या लौकिक जगात नसल्याची सुखद जाणीव महत्त्वाची असते. लेखन करण्याने किंवा ते वाचण्याने मेंदूमध्ये होणारी प्रक्रिया माणसाला अधिक सुखकारक असते, असा अनुभव आपण सगळेच घेतो. पण लेखन आणि वाचन हे मानवी संस्कृतीत पहिल्यापासूनच अभिजात आविष्कार होते. कारण त्याचा समावेश करमणूक या सदरात झालेला नव्हता. करमणुकीच्या इतर साधनांच्या विकासाबरोबर लेखन आणि वाचन याही गोष्टी त्यात अंतर्भूत झाल्या ही गोष्ट निराळी! पण आपल्याला विरंगुळा हवा आहे, याची जाणीव माणसाच्या मेंदूला जेव्हा झाली, तेव्हा तो पुरेसा खुशाल होता. पण त्याच्या त्या काळातील मूल्यव्यवस्थेत विरंगुळय़ाला प्राधान्य नव्हते. एवढेच नव्हे तर विरंगुळा किंवा करमणूक ही जगण्याच्या सर्वात शेवटच्या पायरीवर होती. पोटासाठी अन्न मिळवणे प्राधान्यक्रमामध्ये पहिले असल्यामुळे बाकी सगळे त्यानंतर असणे स्वाभाविक होते. पण पोट भरण्याची सोय सातत्याने होऊ लागल्यानंतर त्याला इतर गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटू लागल्या. पण केवळ विरंगुळय़ावर समाधान मानण्यापेक्षा बौद्धिक आनंद त्याला अधिक आकर्षित करू लागला. हे सारे बदल किती अलीकडचे आहेत, हे आपल्या सहज लक्षात येईल. संगीत नाटकांमुळे होणारी करमणूक जेव्हा स्वातंत्र्यलढय़ाचे शस्त्र बनली, तेव्हा त्याच्या रसिकप्रियतेला वेगळे परिमाण लाभले, हे लक्षात घ्यायला हवे. गायनातून मिळणारा आनंद जेव्हा माणसाला विरंगुळय़ाच्या वरच्या पातळीला नेऊ लागला, तेव्हाच त्यात अभिजातता मिसळली जाऊ लागली. असे असतानाही अतिशय हलाखीत जीवन कंठत अनेक कलावंतांनी आपले सर्वस्व कलांसाठी अर्पण केले. त्या कला त्या कलावंतांना दोन वेळच्या जेवणाचीही हमी देत नसताना हे कलावंत आपले सारे जीवन त्या कलांच्या विकासाकरता पणाला लावत होते. कला हाच त्यांच्या जगण्याचा प्राणवायू होता आणि तेच त्यांचे साध्य होते. कलेचा आस्वाद घेणारे आणि ती निर्माण करणारे यातील हा फरक महाराष्ट्रातील समाजाने कधी लक्षात घेतला नाही. त्यामुळे मंदीच्या सावटातही करमणुकीकडे वळणारा वर्ग कमी होण्याची शक्यता दिसत नाही. उद्योगधंदे आणि व्यापारउदीम यांना मंदीचा विळखा बसायला लागल्याची जाणीव एव्हाना सगळय़ांना होऊ लागली आहे. बाजारातील ग्राहकांचा उत्साह मावळू लागला आहे आणि उत्पादक कंपन्यांपुढे भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मालाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे बाजार मंदावला असला तरी त्याचा परिणाम कलांवर होण्याची शक्यता दिसत नाही. कोटय़वधी रुपये खर्चून तयार होणारे चित्रपट मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या सामान्य नागरिकांना जगण्याची चेतना देतील, अशी शक्यता नाही. पण उपाशीपोटी गाणे करणारे आणि तेच आपले सर्वस्व मानणारे यांना या सगळय़ा व्यवहारात स्थान कुठे आहे? जगण्याच्या कल्पना बदलत असताना मूल्यांमध्ये जे बदल झाले, ते माणसाला कलांकडे आकृष्ट करत राहिले. त्यामुळेच तर दूरचित्रवाणीवर केवळ करमणुकीला वाहिलेल्या वाहिन्यांची चलती सुरू झाली. करमणूक हा आता माणसाच्या, निदान विकसनशील आणि विकसित राष्ट्रांमधील माणसांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ‘गजनी’च्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे एवढेच!
mukundsangoram@gmail.com