Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
विशेष

(सविस्तर वृत्त)

एकच लक्ष्य..२००९!
 
नवं वर्ष उजाडलं आणि साऱ्या राजकीय पक्षांची सार्वत्रिक निवडणुकांसाठी धांदल सुरू झाली. मावळत्या वर्षांत काय कमावलं आणि काय गमावलं, याचा मेळ घालत असतानाच येणारं नवीन वर्ष सर्वार्थानं ‘समृद्धीचे आणि भरभराटीचं’ जाण्यासाठी माय-बाप जनतेला साकडं घालण्यासाठी साऱ्यांची धावपळ सुरू सुरू झाली आहे.
गेल्या वर्षांच्या उत्तरार्धात कोकणात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा जिल्हावार बैठका घेतल्या. पक्षाचे खासदार-आमदार आणि जिल्हा प्रमुखांना त्यापासून उद्धवनी दूर ठेवल्यामुळे या बैठका म्हणजे नेता आणि कार्यकर्ता यांच्यात खऱ्या अर्थाने ‘थेट-भेट’ किंवा ‘ग्रेट भेट’ होत्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावर्डे येथे जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांचं शिबीर आयोजित केले.तत्कालीन रत्नागिरी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अर्थात मध्यमवर्गीयांना भुरळवणारा ‘राष्ट्रवादी’चा मुखवटा आर. आर. पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख मंडळींनी हजेरी लावल्यामुळे हे शिबीर प्रभावी ठरलं. सावडर्य़ाच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार कै. गोविंदराव निकम यांचे चिरंजीव शेखर निकम यांनी केलेलं उत्कृष्ट आयोजनही पक्षनेत्यांना प्रभावित करून गेलं आणि रमेश कदम व भास्कर जाधव यांच्यापेक्षा हा नवा चेहरा बरा, अशी कुजबुजती चर्चा सुरू झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात तसं पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन खऱ्या अर्थाने ताकदवान राजकीय पक्ष असल्यामुळे या घटनांना राजकीय महत्त्व होतं. त्या तुलनेत युतीतील सेनेचा धाकटा भाऊ असलेल्या भाजपातर्फे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ऐन नवरात्राच्या मुहूर्तावर ‘घर चलो अभियाना’ चं पुढे नेमकं काय झालं, हे कोणालाच कळलं नाही. जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व ‘डॅशिंग’ नारायणराव राणे यांच्यामुळे थोडं-फार टिकून होतं. पण नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत झालेल्या अतिरेकी कारवायांपाठोपाठ सुसाट सुटलेल्या नारायणअस्त्राचा विलासराव देशमुखाच्या ‘ठंडा करके खाओ’ धोरणाने चाललेल्या गाडीला असा काही डॅश बसला की दोघेही सत्तेच्या ट्रॅकवरून बाजूला फेकले गेले आणि अशोकराव चव्हाण ‘फॉम्युर्ला नंबर वन’ बनले. त्यामुळे नव वर्ष सुरू होत असताना कोकणात राणेसमर्थक आणि काँग्रेस निष्ठावंत आपापल्या जखमा पुसण्यातच गर्क आहेत. आता नांदेड महापालिका निवडणुकीतील परस्पर मैत्रीला जागत चव्हाण-राणेंनी जमवून घेतल्यासारखं दिसत आहे. त्यामुळे कोकणातही मरगळलेल्या काँग्रेसला थोडं-फार अवसान आल्यासारखं वाटेल, पण ती मुख्यत्वे ‘राणे काँग्रेस’च राहणार आहे.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर गेल्या शनिवारी (१० जानेवारी) भाजपातर्फे रत्नागिरीमध्ये कोकण विभागीय संमेलन आयोजित करण्यात आलं. खरं तर या आधी २७ डिसेंबर हा या संमेलनासाठी मुहूर्त काढण्यात आला होता. पण विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अनपेक्षितपणे लांबल्यामुळे संमेलनाचे ‘स्टार’ त्रिमूर्ती मुंडे-गडकरी-तावडे नागपूरात अडकून पडले. त्यामुळे नव्या जोमाने जमवाजमव करून गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस संमेलन साजरं झालं. डिसेंबरातील नियोजन संमेलन रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात भरणार होतं, पण संमेलनासाठी झालेल्या पूर्वतयारीच्या तालुकावार बैठकांमधून प्रतिसाद वाढण्याचा अंदाज आल्यामुळे छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील खुल्या रंगमंचासमोर संमेलनासाठी खास मंडप उभारण्यात आला. भाजपातर्फे अशा स्वरुपाची विभागीय संमेलनं राज्यभर आयोजित करण्यात आली. त्याच मालिकेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं हे संमेलन असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सर्व प्रमुख नेतेमंडळी ठरलेल्या कार्यक्रमानुसार शनिवारी रत्नागिरीत दाखल झाली आणि लगेच मुंडे-गडकरी पत्रकारांना सामोरे गेले. पण अलिकडे इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे विविध ताज्या राजकीय विषयांवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या चर्चा आणि वाद-विवाद दिवस-रात्र झडत असतात. त्यामुळे ही पत्रकार परिषद म्हणजे औपचारिकताच ठरली. नाही म्हणायला, कोकणवासियांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांबाबत बोलताना, पर्यावरणीय बाबींचा अभ्यास आणि स्थानिक जनतेचं समाधान करून सरकारने हे प्रकल्प राबवावेत, असं सांगून मुंडेंनी प्रकल्पांच्या बाजूने आपलं दान टाकलं. हे गुहागर व रत्नागिरी या दोन ‘भाजपाप्रवण’ आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे खदखदत असलेल्या तालुक्याच्या दृष्टीने नोंद घेण्यासारखं होतं. आगामी निवडणुकांमध्ये राज्यात फक्त शिवसेनेशीच युती राहील, असं नि:संदिग्ध शब्दात स्पष्ट करून मनसे ते नारायण राणेपर्यंतच्या सर्व चर्चांना विराम दिला.
छत्रपती शिवाजी स्टेडियमवरच्या शामियान्यात नेतेमंडळींचं आगमनं झालं तेव्हा जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सर्वजण मनोमन संतुष्ट झाले. दोन-अडीच हजार महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी मंडप फुलून गेला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पहिली तोफ डागली. बदलत्या काळानुसार भाजपाचं स्वरूप आणि राजकीय कार्यकर्त्यांची बदललेली मानसिकता याचं मार्मिक विश्लेषण करत ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ ही प्रतिमा जपण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि मग काँग्रेस राजवटीवर ते शब्दश: तुटून पडले. विशेषत: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या कारकिर्दीत राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करून बिल्डरांना विकण्यात आल्याच्या आरोपाचा गडकरींनी पुनरुच्चार केला आणि युतीचं सरकार आल्यास ही प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे आपला पक्ष मुस्लिमांविरोधी नसल्याचा निर्वाळा देत सत्तेवर आल्यास मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं. आगामी निवडणुका भाजपाच्या भवितव्यापेक्षा देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याचेही गडकरींनी आवर्जून सांगितलं आणि जमलेल्या पक्षकार्यकर्त्यांना या परिवर्तनासाठी अथक परिश्रमाचं आवाहन केलं. संपूर्ण वक्तव्याला नैतिकची धार, हे गडकरींच्या भाषणाचं मुख्य वैशिष्टय़ राहिलं. प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी हाच धागा पकडत कार्यकर्त्यांचं जाळं उभारून सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा गाव आणि वाडय़ा-वस्त्यावर वाचण्याची सूचना केली. मेळाव्याचं स्टार अ‍ॅट्रॅक्शन असलेले गोपीनाथ मुंडे बोलायला उभे राहिले तेव्हा मंडपात उत्सुकता शिगेला पोचली. मुंडेंनी काही स्थानिक प्रश्नांचा उल्लेख करून त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी नेहमीच्या स्टाइलमध्ये प्रश्नोत्तररूपी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण तो फारसा परिणामक झाला नाही, त्यानंतर दहशतवाद, महागाई आणि वीज टंचाई हे नेहमीचेच मुद्दे चघळून मुंडे खाली बसले.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात सध्या भाजपाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. डॉ. विनय नातू (गुहागर) आणि अजित गोगटे (देवगड) हे दोघे वगळता १९९९ मध्ये जिंकलेली रत्नागिरीची जागा बाळ माने यांनी मागील निवडणुकीत भाजपा-सेनेतील फंदफितुरीमुळे गमावली. आगामी निवडणुकीसाठी पक्षातर्फे त्यांनाच तिकीट मिळणार असल्याचं मुंडे यांनी आपल्या भाषणात मानेंचा, ‘भावी आमदार’ असा उल्लेख करून जवळजवळ जाहीरच करून टाकलं. तसं पाहिलं तर कोकणात युतीला नेहमीच अनुकूल वातावरण राहिलं आहे. पण त्याचा पुरेपूर लाभ उठलण्यात गेल्या दोन निवडणुका युतीचे उमेदवार अपयशी ठरले आहेत. भाजपा संमेलनात व्यासपीठावरील फलकावर ‘एकच लक्ष्य..२००९!’ असं ठळकपणे उद्घोषित केलं होतं. पण हे लक्ष्य साधण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मानसिकदृष्टय़ा तयार झालेले अजून दिसत नाहीत.