Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

पिंपरीत उद्योगधंदे मंदीत; गुन्हेगारी कारवाया मात्र तेजीत
तब्बल ५०० उद्योजकांकडून खंडणी वसुली?

िपपरी, १३ जानेवारी / प्रतिनिधी

गुन्हेगारी टोळ्यांचा शहरात सुळसुळाट असून उद्योजकांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत तब्बल ५०० लहान मोठे उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून गुन्हेगारांनी खंडण्या वसूल केल्याची धक्कादायक माहिती उद्योजकांनीच आज एका भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. तथापि, खंडणीची एकही तक्रार दाखल नसल्याचे सांगत पोलिसांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे खोडून काढले असून पेपरबाजी करुन वातावरण गढूळ न करण्याचे आवाहन केले आहे. िपपरी-चिंचवडचे प्रसिध्द उद्योजक अनिल भांगडिया यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद शहरातील उद्योग क्षेत्रात उमटले आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेची वाट लागल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

‘आदर्श पालकमंत्र्यांचे अभिनंदन’
कारभारात दरारा व प्रशासनावर वचक असल्याची बोलवा असणारे मंत्री पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदावर आहेत. कार्यक्षमता व स्पष्टवक्तेपणा या विषयीही त्यांचे नाव घेतले जाते. कार्यक्षमतेविषयीची त्यांचा हा आग्रह केवळ राजकीय पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, आपल्या पक्षातील कार्यकर्ते यांच्यापुरता मर्यादित नसून, समाजात कुप्रसिद्ध असणाऱ्या गुन्हेगारांविषयीही आहे हे नुकतेच स्पष्ट झाले. गुन्हेगारी क्षेत्रात चौफेर कर्तृत्व दाखविलेल्या एका ‘बाबा’चा त्यांनी नुकताच भला मोठा पुष्पहार घालून गौरव केला.

संशयित खुन्याच्या कुटुंबासह भावकीवर बहिष्कार
जेजुरीतील जातपंचायतीत निर्णय

जेजुरी, १३ जानेवारी/वार्ताहर

जेजुरीत वैदू समाजाच्या जात पंचायतीमध्ये खुनाचा संशय असलेल्या लातूरचा आरोपी हजर न झाल्याने त्याच्या कुटुंबासह भावकीलाच वाळीत टाकण्याचा आदेश दिला. सोमवारी दुपारी चार वाजता वैदू समाजातील तरुणांच्या कुस्त्या झाल्यावर पंचांनी जात पंचायतीच्या कामकाजास सुरुवात केली. मात्र या वेळी खुनाचा संशय असलेल्या लातूरचा आरोपी हजर झाला नव्हता. निरोप पाठवूनही तो न आल्याने मंगळवारी वातावरण एकदम तापले. मागच्या वर्षी या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला होता.

वीजकपातीत अध्र्या तासाने घट
पुणे, १३ जानेवारी/प्रतिनिधी

राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड भागात अध्र्या तासांनी वीज कपात कमी करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे. यानुसार पूर्वीच्या भारनियमन काळात अध्र्या तासाची कपात केली आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या पुणे परिमंडलाने कळविलेली आहे.

पुण्यासाठी र्सवकष विकास आराखडय़ाची गरज
संजय देशपांडे

माननीय मुख्यमंत्री यांस,
सादर प्रणाम
ई-मेल द्वारा संपर्काची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जास्तीत जास्त सामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळेल अशी आशा वाटते. माझ्या पिढीतील नागरिकांना अशा सुविधेची जरूर वाटतच होती. एखाद्या राजकारणी नेत्याबरोबर शहराच्या प्रश्नाविषयी ऊहापोह करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. राजकारणी मंडळी सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. अशीच सर्वाची भावना आहे. दूरवर, डोंगराच्या कडेकपारीत वसलेल्या देवाचे दर्शन घेणे कठीण आहे. परंतु शक्य आहे. उच्च प्रतिमा सत्तेची सूत्रे बाळगून असणारे राजकारणी नेते, जे खरोखरीच काहीतरी करू शकतात, ते सामान्यांना दुरापास्त आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसे राजकारणी नेत्यांच्या बाबतीत सावध झाली आहेत.

बाबा बोडके याचा अखेर ‘राष्ट्रवादी’चा राजीनामा
‘अजित पवार, पक्षाची बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा’
पुणे, १३ जानेवारी/प्रतिनिधी

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शनिवारी प्रवेश केलेल्या कुख्यात गुंड बाबा बोडके याने अखेर पक्षाचा राजीनामा दिला असून अजित पवार व राष्ट्रवादीची बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा देत असल्याचे बोडके याने राजीनामापत्रात म्हटले आहे.

‘निर्मितीमागील गुणवत्तेचा शोध घेण्यात रस’
पुणे, १३ जानेवारी / प्रतिनिधी

दादासाहेब फाळके यांचे चरित्र वाचल्यानंतर त्यांनी देशातील पहिल्या चित्रपटाची केलेली निर्मिती हा एक स्वतंत्र चित्रपटकथेचा विषय असल्याचे जाणवले. परंतु केवळ निर्मितीच्या सुरस कथेने भारावून न जाता त्यामागील गुणवत्तेचा शोध घेण्यात मला अधिक रस होता, असे सांगत ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाचे लेखक/ दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या भारतातील पहिल्या चित्रपटानिर्मितीवर आधारित ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट काल पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. त्यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत मोकाशी बोलत होते. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते श्रीरंग गोडबोले, छायाचित्रकार अमलेंदू चौधरी, प्रमुख कलाकार नंदू माधव आणि विभावरी देशपांडे, वेशभूषाकार मृदुल पटवर्धन, जब्बार पटेल, अजय सरपोतदार आदी उपस्थित होते. या वेळी या चित्रपटाशी संबंधित सर्वानी स्वत:चे अनुभव सांगितले. दादासाहेब फाळके हे सर्वसामान्यांना केवळ त्यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्कारापुरतेच माहीत असल्याने त्यांच्या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी ही इच्छा चित्रपट बनविण्यामागे होती, असे मोकाशी यांनी सांगितले. नंदू माधव यांनी हा आपला ‘ड्रीम रोल’ असल्याचे सांगितले तर फाळकेंच्या पत्नीची समर्पकता भावल्याचे विभावरी देशपांडे यांनी सांगितले. संहितेत असणारा साधेपणा चित्रणातही जपण्यासाठी प्रयत्न केल्याचे चौधरी यांनी नमूद केले. तर काळाशी साधम्र्य साधण्यासाठी वेशभूषेतील साडय़ा हातमागावर तयार करून घेतल्याचे पटवर्धन म्हणाल्या.

‘परंपरागत शेतकऱ्यांचाही समावेश इतर मागासवर्गात करावा’
हडपसर, १३ जानेवारी/वार्ताहर

शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून किमान शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरी आदी क्षेत्रात आर्थिक निकषावर महाराष्ट्रातील परंपरागत शेतकऱ्यांचाही इतर मागासवर्गात (ओबीसी) समावेश करावा, अशी मागणी क्रांती शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.
वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून आपली उपजीविका करणारा गरीब शेतकरी शासनाच्या सर्वच ध्येयधोरणापासून वंचित राहात असल्याने आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याने कुटुंबच उद्ध्वस्तीचे मार्गक्रमण करीत असल्याने ते रोखण्यासाठी शासनाने किमान या वंचित गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करून शिक्षण, उद्योग, नोकरी आदी क्षेत्रात आर्थिक निकषांवर यांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी क्रांती शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे, सचिव अमोल बहिरट, अमोल ठाणगे, राहुल भुजबळ, नवनाथ तुपे, पवन शेवाळे, राहुल तुपे आदींनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने कुणबी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला. त्या निकषावर महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना आरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही एका पत्रकान्वये केली आहे.

ससूनच्या टेलिमेडिसीन केंद्रासाठी सहा लाखांचा निधी
पुणे, १३ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) ससून रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या टेलिमेडिसीनसाठी सहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेच्या केंद्र उभारणीसाठी रुग्णालयातील मेडिसीन विभागात प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच हे केंद्र उभे राहण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सुमारे २४ ठिकाणी टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यात औंधपाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील केंद्राचा समावेश आहे. जागेअभावी रुग्णालयातील टेलिमेडिसीन केंद्रास मान्यता मिळाल्यानंतरही विलंब होत होता. मात्र आता रुग्णालय प्रशासनाने जागेसाठी हिरवा कंदील दाखविला. यासंदर्भात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निर्मला बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘‘ ससून रुग्णालयात टेलिमेडिसीन केंद्रासाठी जागा उपलब्ध क रून देण्यात आली आहे. त्यासाठीचा निधीही प्राप्त झाला असून सहा लाख रुपये त्याकरिता मिळाले आहेत. मात्र या विभागाच्या जागेची पाहणी क रण्यासाठी ‘एनआरएचएम’ मधील अधिकारी येण्याची आम्ही वाट पाहात आहोत. अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच या केंद्राच्या पुढील कामास प्रारंभ होईल.’’ याबाबत एनआरएचएमचे मिशन संचालक डॉ. मधुकर चौधरी म्हणाले, आम्हाला टेलिमेडिसीन केंद्रासाठी रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक जागा हवी आहे. ससून रुग्णालयाने ती उपलब्ध करून दिली असेल तर आमची काहीच हरकत नाही. त्यासाठी आम्ही यापूर्वीच निधी मंजूर केला आहे.
ससून-बीजेसाठी आता संकेतस्थळ
ससून रुग्णालय आणि बीजे महाविद्यालयाचे संकेतस्थळ असावे, यासाठी एका वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण खात्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला अद्याप मान्यता मिळाली नव्हती. त्यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येत आहे. या संकेतस्थळ निर्मितीसाठी सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महाविद्यालयाच्या ‘पीएलए’ (स्वयं प्रपंजी खाते) मधून करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

‘मंदी, दहशतवाद, हवामान बदलावर दीर्घमुदतीच्या उपाययोजना आवश्यक’
पुणे, १३ जानेवारी/प्रतिनिधी

आíथक मंदी, दहशतवाद व हवामान बदल या समस्यांवर विचार करुन तातडीने दीर्घमुदतीच्या उपाययोजना करणे हे भारत व जगासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ‘मंदी, दहशतवाद व राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे परिणाम’ या विषयावर देसरडा यांनी अभ्यास केला असून या समस्या कायम स्वरुपी सोडविण्याच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. देसरडा म्हणाले, की अमेरिका, युरोप व अन्य औद्योगिक राष्ट्रात आíथक मंदीचे सावट पसरल्यामुळे तेथील विविध वस्तूंची मागणी कमी होताच आपल्याकडे चलबिचल सुरु झाली व मोटार वाहन उद्योगात मागणीचा वेग मंदावेल म्हणून सरकारने अन्य उद्योगास प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे ही मंदी आपत्ती नसून इष्टापत्ती आहे, असे मानून आपल्या देशातील विकासाचे फेरनियोजन करणे हे शहाणपणाचे होईल. तसेच देशातील विषमता ही दहशतवादाला पोषक आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडविण्यासाठी या अभ्यासात अनेक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, या अभ्यासाचा अहवाल पंतप्रधानांना पाठविला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बार असोसिएशनसाठी ३३ जणांचे अर्ज
पुणे, १३ जानेवारी / प्रतिनिधी

पुणे बार असोसिएशनच्या होत असलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण सतरा जागांसाठी ३३ जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जातील वैध अर्जदारांची यादी पंधरा तर उमेदवारांची अंतिम यादी १७ जानेवारीला जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. बिपीन पाटोळे यांनी ही माहिती दिली. अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. अध्यक्षपदाच्या एका पदासाठी पाच, उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी सात, सचिवसाठी पाच जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. खजिनदारपदासाठी दोन, ऑडिटरसाठी चार तर कार्यकारिणीसाठी दहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ वकील अॅड. मोहनराव देशमुख, अॅड. मिलिंद पवार, अॅड. राम पाटोळे, अॅड. राजेंद्र जगताप आणि अॅड. किरण पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. सचिव पदासाठी अर्चना भोंडवे, काळूराम भुजबळ, किशोर पाटील, विजयराज दरेकर आणि सूर्यकांत नळे यांनी अर्ज भरला आहे, अशीही माहिती अॅड. पाटोळे यांनी दिली.