Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
राज्य

अध्र्या जिल्हय़ाचा विकास, तर अर्धा भकास!
पश्चिम भागात मुबलक पाऊस, तर पूर्वेला दुष्काळी परिस्थिती असलेल्या सांगली जिल्हय़ात अनेक समस्या आहेत. मोठा उद्योग नसणे व ताकारी-म्हैसाळ-टेंभू या सिंचन योजना अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हय़ातून कृष्णा नदी बारमाही वाहात असली तरीही एकाच भागाचा विकास होत असल्याने जिल्हय़ात विद्वेषाचे वातावरण निर्माण होते. राजकारणात जबरदस्त इच्छाशक्ती असलेले नेतृत्व सांगली जिल्हय़ाला सातत्याने लाभले आहे. सहकारी साखर कारखानदारी कृष्णाकाठीच उभी राहिल्याने या भागातील शेतकऱ्यांना भरपूर पाणी उपलब्ध झाले. पण नेतृत्वाकडे जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी व तासगाव या दुष्काळी तालुक्यांत पाणी नेण्याची इच्छाशक्ती नव्हती. भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर ताकारी, म्हैसाळ, टेंभू हे कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले व दुष्काळी भागाला दिलासा दिला. मात्र, नंतरच्या राज्यकर्त्यांचे चुकीचे नियोजन व फसव्या घोषणांमुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्याला झालेला नाही.

शिक्षण महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या कुवतीबाहेर
राज्यपाल जमीर यांची खंत

नाशिक, १३ जानेवारी / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पारंपरिक शिक्षण पध्दती नाकारत २ लाख ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना दोनशे चोविस हून अधिक शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत. सर्वसामान्यांना मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात आणल्याशिवाय देशाचा विकास सर्वसमावेशक किंवा टिकाऊ स्वरूपाचा होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल एस्. सी. जमीर यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. शिक्षण महाग झाल्याने ते सामान्यांच्या कुवतीबाहेर जात असून त्यामुळे ज्ञानासंदर्भात आहे रे आणि नाही रे वर्गात दरी निर्माण होत आहे. सर्वाना परवडणाऱ्या दरात शिक्षण उपलब्ध करून देऊन शिक्षणाची समान संधी देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरजही राज्यपालांनी व्यक्त केली.

लाखो भाविकांच्या साक्षीने सिध्देश्वर यात्रेत अक्षता सोहळा
प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सोलापूर, १३ जानेवारी/प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी सिध्देश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साही आणि मंगलमय वातावरणात नंदीध्वजांचा ‘अक्षता सोहळा’ पार पडला. नऊशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या या यात्रेत अक्षता सोहळा पार पडताच श्री सिध्देश्वराच्या जयजयकाराने अवघे आसमंत दुमदुमून गेले.
दुपारी उशिरा श्री सिध्देश्वराच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर अक्षता सोहळ्याला प्रारंभ झाला. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, खासदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार उत्तमप्रकाश खंदारे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर अरुणा वाकसे यांचा अक्षता सोहळ्यात प्रामुख्याने सहभाग होता.

‘स्पर्धाजिंकण्याची जिद्द मी बाळगली आहे’
कोल्हापूर, १३ जानेवारी / प्रतिनिधी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दर शुक्रवारी आणि शनिवारी सादर केल्या जाणाऱ्या ‘इंडियन आयडॉल ४’ या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमात भाग घेताना मी महाराष्ट्राचे तसेच कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतो आहे. महाराष्ट्राने तसेच कोल्हापूरने माझ्यावर उदंड प्रेम दाखविले आहे. या प्रेमाच्या शिदोरीवरच ‘इंडियन आयडॉल ४’ ही स्पर्धाजिंकण्याची जिद्द मी बाळगली आहे, असे प्रसेनजीत कोसंबी याने आज आपली कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. सोनी एन्टरटेन्मेंटच्या वतीने हॉटेल व्हिक्टर पॅलेस येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

महिंद्राची ‘झायलो’ बाजारात दाखल
नाशिक,१३ जानेवारी / प्रतिनिधी

जागतिक मंदीच्या काळातही भारतीय बाजारावर विश्वास ठेवत महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्र यांनी येथे ‘झायलो’ या नव्या मोटारीचे अनावरण केल्यानंतर झोकात ही नवी गाडी बाजारात दाखल झाली. मंदीच्या काळातही ग्राहकांना कमीतकमी किंमतीत चांगली गाडी मिळत असेल तर ग्राहक नक्कीच तिला आपलीशी करतील असे सांगत वर्षभरात या २० हजार गाडय़ा विकल्या जातील, असाही दावा महिंद्र यांनी यावेळी केला आहे. आजच्या घडीला बाजारातील इतर गाडय़ांपेक्षा ग्राहकांना आरामदायी व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी ही गाडी असून भारतीय बाजारात ६ लाख २४ हजार ५०० रुपयांपासून ती उपलब्ध आहे. आठ प्रवासी क्षमता असलेली ही गाडी चार प्रकारांमध्ये आठ वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. खास वैशिष्टे म्हणजे फ्लॅट बेट, डिजीटल ड्राईव्ह सिस्टीम, फोल्ड करता येण्याजोगे फ्लाईट ट्रे, दुहेरी एसी, आरामदायी आसने ही या गाडीची खास वैशिष्टय़े आहेत. संपूर्णत: ग्राहक हिताचा विचार करून तयार करण्यात आलेल्या झायलोची क्षमता ११२ बीएचपी असल्याची माहिती महिंद्र अॅन्ड महिंद्र लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी दिली. भारत, जपान, अमेरिका व जर्मनी आदी देशांमधील आघाडीच्या विक्रेत्यांनी झायलोच्या विकासामध्ये महत्वाची कामगीरी पार पाडल्याचेही ते म्हणाले. जानेवारीमध्ये देशभरातील महिंद्रच्या ५७ निवडक विक्रेत्यांकडे झायलो उपलब्ध होणार असून फेब्रुवारी मध्ये ती अजून ४४ विक्रेत्यांकडे मिळणार आहे.

जवानावर प्राणघातक हल्ला
इचलकरंजी, १३ जानेवारी / वार्ताहर

विवाहासाठी सुट्टीवर आलेल्या कबनूर येथील सैनिकावर रात्री अज्ञात इसमांनी खुनी हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. जितेंद्र एरडोले (रा. गांधी विकासनगर कबनूर) हा सैन्यदलामध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. १७ जानेवारीस त्याचा विवाह निश्चित झाल्याने तो २२ डिसेंबर रोजी गावी आला होता. काल रात्री दहाच्या सुमारास मित्रांसमवेत इचलकरंजी येथील लायकर चित्रपटगृहाजवळील मोहिते यांच्या खानावळीत जेवण्यास आला होता. तेथून शहापूर येथील मित्रास भेटण्यास जातो असे सांगून तेथून एकटाच स्प्लेंडर मोटर सायकलवरून निघून गेला. रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान चंदूर रोडवरील बरगे मळ्यात रस्त्याकडेला गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे तेथून जाणाऱ्या एका मित्रास आढळून आले. त्याने अन्य तिघा मित्रांना एकत्र करून जखमी जितेंद्रला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. जितेंद्रची प्रकृती बिघडत असल्याने त्याला निरामय या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. धारधार हत्याराने हल्ला झाल्याने त्याच्या गळ्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर खोल जखमा झाल्या आहेत. या हत्यामागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. इशारा करून त्याने तिघांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पुण्यातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन
पुणे, १३ जानेवारी/प्रतिनिधी

रायगड येथील पेण एज्युकेशन सोसायटी तर्फे संस्थेच्या शताब्दी वर्षांच्या निमित्ताने येत्या १८ जानेवारी रोजी पुण्यातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीचे संचालक सुधीर जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी श्रीकांत देवकर, वि. ज. साठे आदी उपस्थित होते. कोथरूड येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअिरग येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित राहतील. या शताब्दी वर्षांत संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी या वेळी सांगितले.

वाडा येथील शहीद स्मारकाचे उद्या भूमिपूजन
ठाणे, १३ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबई शहरावरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात हल्लेखोरांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा शहीद स्मारक समितीतर्फे वाडा येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य शहीद स्मारकाचा कोनशिला समारंभ गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी आजही माहिती दिली. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत शर्मा यांनी जिल्ह्यात असे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.
वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर संस्थेने स्मारकासाठी जमीन देऊ केली आहे. संस्थेचे संमतीपत्र मिळताच शहीद स्मारकाच्या भूमिपूजन समारंभ गुरुवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजस्थानमधील धोलपुरी व मार्बलच्या कोरीव बांधकामात हे देखणे स्मारक उभारण्याची तयारी सुरू आहे. फेब्रुवारी अखेपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे शर्मा यांनी सांगितले. भूमिपूजन समारंभाला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहीद स्मारक समितीने केले आहे.

कुपोषित मुले व मातांसाठी खास पोषण आहार योजना
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, १३ जानेवारी

लांजा तालुक्यातील वाडीलिंबू परिसरातील १० कुपोषित बालकांना त्यांच्या मातांसह तीन आठवडे खास पोषण आहार देऊन कुपोषणमुक्त करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा शुभारंभ वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला व बालकल्याण सभापती स्वरूपा साळवी यांच्या हस्ते झाला. या केंद्रामध्ये दाखल बालके व मातांना दररोज विशिष्ट प्रकारचा आहार दिला जाणार असून, या काळात संबंधित मातांच्या बुडणाऱ्या रोजगारापोटी दररोज ५० रुपये दिले जाणार आहेत. या माता-बालकांच्या आरोग्यविषयक नोंदीचा दैनंदिन तक्ता ठेवण्यात येणार असल्याचेही केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पी. व्ही. काळे यांनी नमूद केले. रत्नागिरी जिल्ह्यात अशा स्वरूपाचा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तीन आठवडय़ांनंतर संबंधित बालकांच्या प्रकृतीमध्ये किती प्रमाणात फरक पडतो, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ निरीक्षणे नोंदवून अहवाल सादर करणार आहेत.