Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
क्रीडा

झुंजार झहीरचा उत्तर प्रदेशला तडाखा
धवल- झहीरमुळे मुंबईच्या ४०० धावा पूर्ण

हैदराबाद, १३ जानेवारी/ वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव ही काय चीज असते, हे आज झहीर खानच्या अष्टपैलू कामगिरीने आज सर्वाना दिसून आले. झहीरने सुंदर फलंदाजी करीत मुंबईला चारशे धावांचा टप्पा गाठून तर दिलाच, पण त्याचबरोबर १३ षटकांत १० निर्धाव षटके टाकीत फक्त ११ धावा देत तन्मय श्रीवास्तव आणि कर्णधार मोहम्मद कैफला तंबूत धाडीत सामन्याचे पारडे मुंबईच्या बाजूने झुकविण्यात सिंहाचा वाटा उचलला. झुंजार झहीरने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर उत्तर प्रदेशला ताडाखा दिला असून त्यांची दिवसाखेर ४७ षटकांत ३ बाद ९१ धावा अशी नाजूक परिस्थिती झाली आहे.

हेडनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
ब्रिस्बेन, १३ जानेवारी / पीटीआय

मॅथ्यू हेडनचे काय करायचे, असा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीपुढे पडला असतानाच आपल्या १५ वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीला त्याने पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध ५९च्या सरासरीने धावा कुटणाऱ्या हेडनने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून त्याच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यानंतर हेडनचे ऑस्ट्रेलियन संघातील स्थान डळमळीत झाले होते. पण तरीही त्याने अ‍ॅशेस मालिकेपर्यंत खेळत राहण्याचे निश्चित केले होते. मात्र आज अखेरीस त्याने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडनला सलाम
ब्रिस्बेन, १३ जानेवारी/पी.टी.आय.

बॅगी ग्रीम कॅप परिधान करणारा डावखुरा सलामीवीर मॅथ्यू हेडन हा ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिन महान फलंदाज असल्याचे आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या सुवर्णकाळात हेडन हा संघाचा अविभाज्य घटक होता, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन जॅक क्लार्क यांनी म्हटले आहे. डावाची सुरुवात करताना १०३ कसोटीत ५० च्या सरासरीने धावा करणे ही मोठी गोष्ट असून त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये त्याचा समावेश असल्याचे क्लार्क यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कालखंडात हेडनची कामगिरीही मोलाची आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग यानेही हेडन हाच ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम सलामीचा फलंदाज असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात प्रचंड बुद्धिबळ - विश्वनाथन आनंद
पुणे, १३ जानेवारी/ क्री. प्र.

कारकीर्दीतील पहिली राष्ट्रीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धा मी पुण्यात जिंकली व तेव्हापासून या प्रकारात माझा आत्मविश्वास उंचावला. त्यामुळे पुणे शहरास माझ्या हृदयात स्थान आहे हे उद्गार आहेत. विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचे! एनआयआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या केलेल्या माईन्ड्स अकादमी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आनंद आज पुण्यात आला होता. पत्रकारांशी दिलखुलासपणे गप्पा करताना त्याने पुण्यातील बुद्धिबळपटूंविषयी कौतुकास्पद भाव व्यक्त केले. पुण्यासह महाराष्ट्राने भारतास अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. या राज्यामध्ये बुद्धिबळासाठी मुबलक नैपुण्य उपलब्ध आहे. येथे अकादमी स्थापन करण्याचा सध्या तरी विचार नसला तरी वरचेवर येऊन येथील खेळाडूंना मी मार्गदर्शन करणार आहे.

गेलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा मालिका विजय
नॅपिअर, १३ जानेवारी / एपी

पावासाच्या व्यत्ययाने गाजलेल्या अंतिम लढतीत आज न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमानुसार ५ गडय़ांनी पराभव केला आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-१ ने सरशी साधली. वेस्ट इंडिजच्या ९ बाद २९३ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने ३५ षटकात ५ बाद २११ धावांची मजल मारली असता जोरदार पावसामुळे पुढचा खेळ शक्य झाला नाही. त्यावेळी डकवर्थ-लुईस नियमानुसार न्यूझीलंड संघाने सात धावा अधिक केल्या होत्या. या मालिकेतील दोन लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे निकाल शक्य झाला नाही. आजच्या लढतीत पावसाला सुरुवात झाली त्यावेळी डकवर्थ-लुईस नियमानुसार न्यूझीलंडला विजयासाठी ५ बाद २०३ धावांची गरज होती. ३३व्या षटकात पावसाला सुरुवात झाली त्यावेळी न्यूझीलंड पिछाडीवर होता. विजयासाठी ३४व्या षटकात न्यूझीलंडला गडी न गमावता ९ धावांची गरज होती.

ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर मात
ब्रिस्बेन, १३ जानेवारी / पीटीआय

कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या माईक हसीने (५३) आज सूर गवसल्याचे संकेत देत झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सहा गडय़ांनी पराभव केला आणि दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मालिका २-० नेजिंकली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ५ बाद १५७ धावात रोखले आणि विजयासाठी आवश्यक धावा चार गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. हसीने कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि कॅमरुन व्हाईट यांच्यासोबत दोन अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. त्याआधी, जेन पॉल डय़ुमिनीच्या (६९) अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

‘हसे झाले तरी जगात नाव झाले’
बॉयकॉट यांची इंग्लंड क्रिकेट मंडळावर टीका

लंडन, १३ जानेवारी / पीटीआय

इंग्लंड क्रिकेट संघ जगातला सर्वोत्तम संघ नाही. त्यामुळे पीटर्सनच्या राजीनामा नाटय़ाने का होईना इंग्लंड क्रिकेट मंडळाचे नाव जगात अजून प्रसिद्ध झाल्याची खरमरीत टीका माजी खेळाडू जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे. ‘हसं झाले असले तरी जगात नाव तर झाले’ असा टोला बॉयकॉट यांनी ‘द डेली टेलिग्राफ’ मधील आपल्या स्तंभात लगावला आहे.

तापमान खाली घसरल्यास मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमचा पारा उंचावेल
मुंबई, १३ जानेवारी / क्री. प्र.

तीन वर्षांपूर्वी केनियाच्या डॅनियल रोनोने नोंदविलेला दोन तास, १२ मिनिटे व तीन सेकंदांचा मुंबई मॅरेथॉनमधील विक्रम यावर्षी मोडण्यासाठी तापमान अनुकूल असण्याची गरज आहे. जर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत तापमान चार अंशांनी कमी झालेले असेल तर हा स्पर्धा विक्रम नक्कीच मोडता येईल, असा विश्वास मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना वाटतो आहे.

सोमदेव ऑस्ट्रेलियन ओपन पात्रता फेरीत अमृतराजशी झुंज
नवी दिल्ली, १३ जानेवारी / पीटीआय

नुकत्याच झालेल्या चेन्नई ओपनमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारून भारताची शान उंचावणारा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याची उद्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्याय प्रकाश अमृतराजशी लढत होणार आहे. १२८ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सोमदेवचे मानांकन २८वे आहे. त्यातील १६ खेळाडू पुरुषांच्या मुख्य फेरीत प्रवेश करतील. भारताच्या सोमदेव व प्रकाश यांच्यापैकी एकालाच ही संधी मिळेल.

पीटरसन व मूर्सची इंग्लंडच्या संघाला गरज - फ्लिन्टॉफ
लंडन, १३ जानेवारी / पीटीआय

इंग्लंड क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा केविन पीटरसन याने तर मूर्स यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने फ्लिन्टॉफला दु:ख झाले आहे. पीटर्सन व मूर्स यांच्यातील वादाची परिणती दोघांनीही राजीनामा देण्यात झाली होती. दोघांनीही या पदावर राहणे आवश्यक असल्याचे मत अष्टपैलू खेळाडू फ्लिन्टॉफ याने व्यक्त केले आहे.
पीटरसनने कर्णधारपदा पुन्हा स्वीकारावे अशी विनंती करतानाच फ्लिन्टॉफने प्रशिक्षकपदासाठी मूर्सच आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ‘डेली मिरर ’ शी बोलताना तो म्हणाला, ‘पीटर्सनने अशा पद्धतीने राजीनामा देणे दु:खद आहे. मूर्स यांच्यासमवेत असलेल्या वादाची चर्चा पीटरसनने भारत दौऱ्यावर असताना माझ्याशी केली होती.’ भारत दौऱ्यावर खरी कसोटी लागली असे सांगत फ्लिन्टॉफ म्हणाला, खडतर परिस्थितीतही पीटरसनने चांगले प्रदर्शन केले आहे.

राष्ट्रीय खो-खोपटू रंजन कोळी यांचे निधन
मुंबई, १३ जानेवारी / क्री. प्र.

अष्टपैलू खो-खोपटू म्हणून कारकीर्द गाजविलेले राष्ट्रीय खेळाडू रंजन काशीनाथ कोळी यांचे अलीकडेच छोटय़ाशा आजारानंतर आकस्मिक निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेला महिनाभर आजारी असलेल्या कोळी यांना हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले होते. तेथे १० जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माधवी आणि तीन अविवाहित कन्या आहेत. माहीमच्या सरस्वती मंदिर शाळेचे विद्यार्थी असलेले रंजन कोळी यांची खो-खोपटू म्हणून कारकीर्द शाळेच्याच सरस्वती स्पोर्टस क्लबमध्ये दिवंगत खो-खो प्रशिक्षक विश्वास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घडली. हरिणासारखा वेगवान धावणारा खेळाडू म्हणून रंजन कोळी खो-खो विश्वात प्रसिद्ध होते. १९७९ साली रंजन कोळी यांनी मोरारजी मिल खो- खो संघाचे व्यावसायिक गटात प्रतिनिधित्व केले. तर १९८१ साली बँक ऑफ इंडियात रुजू झाल्यानंतर कोळी बँकेच्या संघातून विविध स्पर्धा खेळले. पुण्यात १९८५ - ८६ साली झालेल्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेसाठी रंजन कोळी यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. याच दरम्यान कोळी यांनी ठाण्यातील आनंद भारती खो-खो संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. जवळजवळ दहा वर्षे आनंद भारती संघाचे खो-खोपटू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळले. वायुदूत खो-खो संघ स्थापण्यातही कोळी यांचा पुढाकार होता तसेच ठाणे जिल्हा खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.रंजन कोळी यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरस्वती स्पोर्टस क्लबच्या आजी - माजी खेळाडूंची सभा १७ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानावर आयोजिण्यात आली आहे.

चेंबूर क्रीडा केंद्राचा अनपेक्षित पराभव
कबड्डी
मुंबई, १३ जानेवारी/क्री.प्र.

चेंबूर क्रीडा केंद्र हा उपनगर जिल्ह्य़ातील एक मातब्बर संघ मानला जातो. सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या संघाला ओम भारत क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून पहिल्या फेरीत बाद व्हावे लागले. जोगेश्वरीच्या चेतना संघाने या बलवान संघाला ३४-२५ असे चकित केले. सागर नार्वेकरची गैरहजेरी या संघाला खूपच महागात पडली.
सागरच्या अनुपस्थितीचा पुरेपूर लाभ चेतनाच्या रवि मंचेकर (मंचेकर), संदेश चव्हाण, योगेश कांबळी आणि शशिकांत घाडगे या चार प्रमुख शिलेदारांनी उठविला. हे चौघेही तडफेने खेळले. चेंबूरच्या दत्ता जाधवने अखेरच्या दहा मिनिटांत चार गुण मिळविले, पण त्याआधीच सामन्याची सूत्रे चेतनाच्या हाती गेली होती.
वसंतराव कोलगावकर स्मृती चषकासाठी चालू असलेल्या पुरुषांच्या दुसऱ्या एका एकतर्फी सामन्यात नवमहाराष्ट्र बोरिवली संघाने जॉली स्पोर्टस् क्लबचा ३०-११ असा पराभव करताना किरण देवाडिगाने एकंदर चौदा गुम मिळविले. त्यातील पहिल्या एका हल्ल्यात चार गडी टिपण्याचा पराक्रम केला. यज्ञेश खानविलकर व विदूर हळदणकर यांनी आपल्या लौकिाकाला साजेशा चढाया केल्या.
ओम भारत व शिवसेना शाखा क्र. ९० च्या वतीने चालू असलेल्या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महिलांचाही एक सामना झाला. त्यात पार्ले स्पोर्टस् क्लबने पोयसर जिमखाना या नवोदित संघाचा ६२-२१ असा सरळसरळ पराभव केला. विजेत्या संघाकडून नयना कावणकर हिने चौफेर चढायांबरोबर उत्कृष्ट पकडीही केल्या.

मुंबई श्री शरीरसौष्ठव
स्पर्धा १७ जानेवारीला
मुंबई, १३ जानेवारी / क्री. प्र.

ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ वी ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा शनिवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा ५०, ५५, ६०, ६५, ७०, ७५ आणि ७५ किलो वरील वजनी गटात होणार आहे. नौदल व सेनादल वगळता सर्व शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धेची तिकिटे शिवाजी मंदिर येथे १३ जानेवारीपासून उपलब्ध होणार असीन अधिक माहितीसाठी नंदू खानविलकर ९७६९८७९८२८ , प्रमोद हळदणकर ९८१९२४५३४८ यांच्याशी संपर्क साधावा .

विन्सेंट डिसोझाला सुवर्ण
बुद्धिबळ
मुंबई, १३ नोव्हेंबर/क्री.प्र.

मुंबई बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने नगर भुवनमध्ये झालेल्या मीरा-भाईंदर क्रीडा महोत्सव २००९ मध्ये खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विन्सेट डिसोझा याने ५ फेऱ्यांमध्ये साडेचार गुणांसह किशोर झा बरोबर आघाडी कायम राखली. परंतु प्रगत गुणांच्या आधारे विन्सेट डिसोझाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका संगीता म्हात्रे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच किशोर झा याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ९ वर्षांखालील गटात विजेता अजय शर्मा, उपविजेता नितीश सिंग १२ वर्षांखालील गटात विजेता आदित्य मोदी आणि उपविजेता साजिद शेख १८ वर्षांखालील गटात विजेता राज अगरवाल आणि उपविजेता अमन बंगारिया यांना पदके देऊन गौरविण्यात आले.