Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

अलबेला कंठाचा मतवाला रंग
प्रजासत्ताकदिनी ‘इनडोअर आशा’चा दुर्लभ योग!

प्रशांत मोरे

अक्षरश अठरापगड भाषांत साडेअकरा हजारांपेक्षा जास्त गाणी गाऊन तब्बल पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अलौकिक आवाजाने जगभरातील संगीतप्रेमी रसिकांच्या मनात कायम रुणझुणत राहिलेल्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांचा इनडोअर परफॉर्मन्स अनुभविण्याची दुर्लभ संधी येत्या प्रजासत्ताकदिनी रसिकांना उपलब्ध झाली आहे. ‘अभंग प्रतिष्ठान’ या संस्थेने २६ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा भाग्ययोग जुळवून आणला आहे. सुरेश भटांनी कंठ अलबेला म्हणून ज्यांचे वर्णन केले तो आशाताईंच्या मतवाला रंग यानिमित्ताने पुन्हा एकदा रसिकजनांवर उधळला जाणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले यांना नुकताच अमेरिकेतील बृन्मुंबई मंडळाचा विश्वगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या जुलै महिन्यात अमेरिकेत त्यांना तो प्रदान करण्यात येईल. यानिमित्त एका आनंद सोहळ्यात आशाताईंच्या सत्कार व्हावा, या हेतूने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.

पुलंच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाने समाजमनात फुंकले प्राण !
डोंबिवली/प्रतिनिधी : विविध चिंता आणि व्याधींनी ग्रासलेल्या समाजमनाला प्रेरणा देण्याचे काम पुलंनी केले. शतपैलू असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक आनंदयात्रीच होते, असे प्रतिपादन पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. प्रकाश पाठक यांनी पुलोत्सवात ‘बहुरंगी पुलं’ या व्याख्यानात केले. हजरजबाबीपणा, सहजपणा, चपखलपणा, कुचेष्टा नसलेला विनोद आणि दांडगी स्मरणशक्ती ही पुलंची वैशिष्टय़े होती. भाबडेपणा हा त्यांचा स्वभाव गुणधर्म होता. समाजाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पुलंनी विविध समाज अंगांना स्पर्श करून आपले बहुरूपी व्यक्तिमत्त्व सिध्द केले. दरम्यान, ‘मुक्त संवाद’ कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि पुलंचा ५० वर्षांचा सहवास लाभलेले श्रीकांत मोघे यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली.

वैद्यकीय व्यवसायातील व्यावसायिकीकरण चिंताजनक - ए. पी. चित्रे
डोंबिवली/प्रतिनिधी

आपण जो व्यवसाय करतो, तो कठोर मेहनत घेऊन करा. कठोर मेहनत ही देवाला हात जोडून केलेल्या प्रार्थनेसारखी असते. वैद्यकीय व्यवसायाचे झालेले व्यावसायिकीकरण चिंताजनक आहे. या व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपला व्यवसाय करावा, असे आवाहन प्रसिद्ध शल्यविशारद ए. पी. चित्रे यांनी रविवारी येथे केले.

बदलापूरमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
बदलापूर/वार्ताहर

बदलापूर येथे हिंदुसम्राट चषक २००९ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा शिवसेना नगरसेविका मेघा गुरव आणि भाविसेना यांच्या वतीने भरविण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेविका मेघा गुरव यांनी दिली.शुक्रवार, १६ ते रविवार, १८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेमध्ये १२ पुरुष आणि १२ महिला संघ सहभागी होणार आहेत. गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात स्पर्धेचे उद्घाटन खा. आनंद परांजपे, उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आ. अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवारी होणाऱ्या स्पर्धा समारोपास शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे, कल्याणचे महापौर रमेश जाधव, अंबरनाथच्या नगराध्यक्षा संपदा गडकरी, संपर्कप्रमुख चंद्रकांत बोडारे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना ३० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती भाविसे जिल्हा सचिव अनिकेत गुरव यांनी दिली.

टीडीसी बँकेने दिले कोकण कृषी विद्यापीठाला फिरते कृषी चिकित्सालय
शहापूर/वार्ताहर : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या ‘फिरते कृषी चिकित्सालय’ प्रकल्पासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सात लाख ५३ हजारांचे ‘फिरते कृषी चिकित्सालय’ वाहनांचे हस्तांतरण नुकतेच केले. विद्यापीठाला फिरते कृषी चिकित्सालय वाहन देण्यासाठी टीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी प्रयत्न केले होते. दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आयोजित पालवी कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दशरथ तिवरे यांनी फिरते कृषी चिकित्सालय, वाहनाच्या चाव्या, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता यांना दिल्या व वाहनाचे हस्तांतरण सोहळा संपन्न झाला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत भुसार, सरव्यवस्थापक तानाजी घोलप उपस्थित होते. फिरते कृषी चिकित्सालयामार्फत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील मातीचे नमुने, पाणी नमुने, रोग, कीड याबाबत परीक्षण होणार असून, पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत होणार आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत नवनिर्माण गौरव सोहळ्याचे आयोजन
ठाणे/प्रतिनिधी

जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना नवनिर्माण करिअर अ‍ॅण्ड रीसर्च अकादमीतर्फे ‘नवनिर्माण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.गडकरी रंगायतनमध्ये १४ जानेवारी रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पुष्कर श्रोत्री, सुनील बर्वे, अभिजीत केळकर, सीमा देशमुख, नेहा जोशी आणि नीलम शिर्के आदी कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ओंकार माळी यांनी दिली.

यशवंत देव यांच्या उपस्थितीत संगीत कार्यशाळेचे आयोजन
ठाणे/प्रतिनिधी : सुप्रसिद्ध गायिका हेमा उपासनी यांच्या ‘ध्येय फाऊंडेशन’च्या वतीने गेल्या सहा दशकांपासून अनेक अवीट गोडीच्या गाण्यांचे रचनाकार, शब्दप्रधान गायिकीवरचा अभ्यास असणारे पं. यशवंत देव यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार सुगम संगीताचा एक वर्षांचा डिप्लोमा कोर्स ठाण्यात प्रथमच सुरू होत आहे. त्यानिमित्ताने १६ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पं. यशवंत देव यांचा सप्रयोग व्याख्यान कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून ख्यातनाम गायक पं. नाथ नेरळकर आणि वाहतूक पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने हेमा उपासनी यांच्या शिष्या पूजा इंदिसे, एम.एम. मानसी, एम.एम. मोनिषा यांचे गायन होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर करणार आहेत. सर्व रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य आहे. संपर्क- ९८१९५०६८००.

वाडय़ातील शिबिरात ५५ बाटल्या रक्त संकलित
वाडा/वार्ताहर : वाडा तालुका पत्रकार संघ व कॉटेज हॉस्पिटल जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने कुडूस येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषत: पोलीस दल, सरकारी कर्मचारी, तसेच विविध राजकीय पक्षांचे संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुडूस येथे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार दिलीप रायण्णावर, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धनंजय पष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. याच दिवशी संध्याकाळी वाडा ग्रामीण रुग्णालयात श्रमिक पत्रकार संघाच्या विद्यमाने सर्व रुग्णांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी वाडा ग्रामपंचायतीचे सरपंच गिरीश पाटील, आर. पी. आय.चे तालुकाध्यक्ष रमेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जयेश शेलार व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.

अभिजीत घोरपडे यांची आज डोंबिवलीत व्याख्याने
डोंबिवली/प्रतिनिधी : ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ प्रतिनिधी अभिजीत घोरपडे यांची डोंबिवलीत आज (ता.१४) जागतिक भूगोल दिनानिमित्त व्याख्याने आयोजित केली आहेत. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात सकाळी ११ वाजता घोरपडे यांचे ‘ग्लोबल वॉर्मिग’ विषयावर व्याख्यान होणार आहे. भूगोलविषयक प्रदर्शनही आयोजित करण्यातआले आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या राणा प्रताप भवनमध्ये दुपारी दोन वाजता घोरपडे व राजीव तांबे यांच्या ‘गोल गप्पा भूगोलाच्या’ विषयावर मुलांबरोबरचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

रस्त्यावरील मुलांनी घेतला श्रमसंस्कारांचा अनुभव !
ठाणे/प्रतिनिधी

महानगरी जीवनशैलीला भुलून, त्या स्वातंत्र्याच्या मोहाने घराबाहेर पडलेल्या आणि सार्वजनिक रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर एखाद्या कस्पटासमान जीवन जगणाऱ्या कोवळ्या जीवांना त्यांचे भरकटलेले आयुष्य सावरण्यास मदत करणाऱ्या समतोल फाऊंडेशन या संस्थेने अलिकडेच अशा मुलांच्या श्रमदानातून पाली येथील सुधागड परिसराची स्वच्छता केली.
भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या आणि रेल्वे स्थानकाच्या आश्रयाने राहणाऱ्या किशोरवयीन मुलांशी मैत्री करून त्यांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्द करण्याचे काम समतोल फाऊंडेशन गेली काही वर्षे नित्यनेमाने करीत आहे. अशा मुलांसाठी निवासी शिबिरे भरवून त्याद्वारे त्यांचे समुपदेशन केले जाते. अशाच एका शिबिरात ३ आणि ४ जानेवारी रोजी क्षितिज ग्रुपच्या सहयोगाने या मुलांना पाली-सुधागड स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. सात मुले, १० कार्यकर्ते आणि क्षितिज ग्रुपची टीम असे एकूण २० जण या मोहिमेत सहभागी झाले होते. शनिवारी पावणेबाराच्या सुमारास त्यांनी गडावर चढण्यास सुरुवात केली. दुपारनंतर प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली. गडाच्या बुरुजांवर वाढलेली झुडपे त्यांनी काढून टाकली. अशा प्रकारे पुन्हा आपल्या घरटय़ात परतण्याआधी या मुलांना श्रमसाफल्याचा आनंद मिळविला.

सहा लाखांची घरफोडी अखेर ठरला कांगावा
वाडा/वार्ताहर : वाडय़ात ७ डिसेंबर रोजी झालेल्या सहा लाख रुपयांच्या घरफोडीबाबतची तक्रार करणाऱ्या फिर्यादीने अचानक आपली तक्रार मागे घेऊन चोरी झाली नसल्याचे पोलिसांना लिहून दिल्याने चोरी झालेलीच नव्हती हे उघड झाले आहे. मात्र घरफोडीबाबतची तक्रार करून तब्बल पंधरा दिवस पोलिसांना वेठीस धरूनही पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकल्याने पोलीस फिर्यादीमध्ये ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ झाल्याची चर्चा वाडा शहरात सुरू झाली आहे.वाडा शहरातील संजय आंबवणे हे आपल्या कुटुंबियासह ६ डिसेंबर रोजी नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी नंदुरबार येथे गेले होते. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरटय़ांनी घराच्या मागच्या भागात असलेली सीमेंटची खिडकी फोडून घरामध्ये प्रवेश केला व शर्टाच्या खिशातील चावी घेऊन कपाटातील सहा लाख २० हजार रुपयांची चोरी करून पोबारा केला, अशी तक्रार आंबवणे यांनी ८ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात केली होती.जमीन विकून आलेल्या पैशाच्या वाटणीवरून कुटुंबातील व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचे शहरात बोलले जात असताना मात्र फिर्यादीने आपली तक्रार मागे घेताना आमच्या वयोवृद्ध आईने कपाटातून पैसे काढून अन्य ठिकाणी ठेवले होते, तिला विस्मृती झाल्याने ते आठवत नव्हते. आठ दिवसाने तिला आपणच पैसे अन्य ठिकाणी ठेवल्याचे सांगितले व हे सर्व पैसे परत मिळाल्याने आमची आता चोरीबाबत तक्रार नाही, असे पोलिसांना लिहून पोलिसांनी या चोरी प्रकरणावर पडदा टाकला आहे.