Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
व्यक्तिवेध

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या मांदियाळीमध्ये रिअ‍ॅलिटी शोजचा क्रमांक वरचा लागतो आणि त्यातही सर्वात वरचा क्रमांक ‘आयडिया सारेगमप लिट्ल चॅम्पस्’ या कार्यक्रमाचा लागतो. या कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये कोणा एकाचेच श्रेय नाही तर संपूर्ण टीमलाच त्याचे श्रेय जाते. प्रत्येकाचे काम अगदी चोख. त्याचा परिणाम केवळ एकच आणि तो म्हणजे लोकप्रियतेचे शिखर पादाक्रांत करणे. पडद्याआड राहून अनेकांनी घेतलेली मेहनत त्यामागे आहे. त्यातील प्रमुख नावे घ्यायची झाली तर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक राजन डांगे आणि बिझनेस हेड निखिल साने. अर्थात आणखीही मंडळी त्यांच्या सोबत आहेतच. १९९७-९८ मध्ये झी न्यूजमध्ये असताना पत्रकारितेचे धडे गिरवणाऱ्या निखिल साने यांनी ‘सुरभि’ या कार्यक्रमाचे संपादन करणाऱ्या मंडळींमध्ये प्राथमिक धडे घेतले. झी मराठीपूर्वी अल्फा मराठीच्या अनेक कार्यक्रमांच्या संयोजनामध्ये त्यांनी उत्साहाने कल्पकता दाखवली आहे. ‘सारेगमप’च्या आरेखनामध्ये निखिल साने यांचा मुख्य वाटा आहे. सारेगमपच्या ‘फोर्टी प्लस’ या कार्यक्रमाची कल्पना निखिलची होती. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्वरित नेहमीचा कार्यक्रम न करता ‘शहिदांना सलाम’ करण्याची कल्पना निखिल यांचीच. संपूर्ण मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश दु:खात असताना आपण

 

नेहमीसारखा कार्यक्रम करावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हते आणि त्यातूनच ही कल्पना साकारली. या भागामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता अधिक उंचावली. त्यापूर्वी ‘दिवाळी स्पेशल’ कार्यक्रम करताना त्यांनी जी कल्पकता दाखवली होती ती तर अफलातूनच म्हणावी लागेल. सध्या झी टॉकीजच्या चित्रपटांच्या प्रसारणामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. निखिल साने यांची कल्पना नेमकी कशी उतरवायची त्याचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी राजन डांगे यांच्याकडे असते. आपल्या संपूर्ण गटाला मोटिव्हेट करणारे राजन डांगे तसे प्रसिद्धीपराङ्मुख. त्यांना कुठेही आपले नाव पुढे यावे असे वाटत नाही. मात्र त्यांना आपल्या कार्यक्रमाबाबत प्रचंड आस्था आहे. कार्यक्रम उत्तरोत्तर उंचावला पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवणारे डांगे झी वाहिनीच्या प्रवासात पहिल्यापासून आहेत. राजन डांगे असोत वा निखिल साने, दोघेही झी मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड अजय भावळणकर यांचे ‘फाइंड’ आहेत. हिंदीतील ‘सारेगमप’ हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय करण्यात राजन डांगे यांचा सिंहाचा वाटा आहे. ऑनलाइन एडिटिंग करण्यात राजन त्यांचा हातखंडा. कार्यक्रम उंचावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे डांगे तितकेच हळवेदेखील आहेत. लहान मुलांच्या निरागसतेला जपत, त्यांना हळुवारपणे सांभाळून त्यांच्याकडून सर्वोत्तमातील सर्वोत्तम करून घेणाऱ्या गटाचे नेतृत्व ‘राजन सर’ करीत असतात. या लहान कलावंतांच्या मनातच नव्हे तर त्यांच्या पालकांमध्येही आदराचे स्थान त्यांनी मिळवले ते त्यामुळेच. कार्यक्रमाचे चित्रीकरण संपले की सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे राजन डांगे कामाच्या वेळी अक्षरश: वेगळे रूप धारण करतात. झी मराठीच्या सारेगमपची धुरा अनेकांच्या मदतीने वाहताना प्रत्येक पर्व (आतापर्यंत त्यांची चार पर्व झाली आहेत) एक वेगळाच इतिहास रचत आहे. प्रथम पर्वापासून आताच्या पर्वापर्यंत लोकप्रियतेची कमान सतत उंचावणाऱ्या या ‘सारेगमप’मुळे अन्य वाहिन्यांना कार्यक्रमांची वेळ बदलावी लागली, हीच या कार्यक्रमाच्या यशाची पावती आहे.