Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
विविध

‘काका’च्या जावयाच्या प्रिमिअरला बाबूमोशाय!
लंडन, १३ जानेवारी/पी.टी.आय.

अक्षयकुमारच्या बहुचर्चित ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटाच्या येथील प्रिमिअरला बिग बी अमिताभ बच्चन याने अचानक हजेरी लावल्याने दस्तुरखुद्द अक्षयकुमार यालाही आश्चर्याचा धक्का बसला.
एकेकाळी अमिताभ बच्चन आणि ‘काका’ अर्थात राजेश खन्ना यांच्यात ‘नंबर वन’ वरून स्पर्धा होती. अर्थात अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ने पाहता पाहता राजेश खन्नांच्या रोमँटिक सिनेमांना मागे टाकले आणि तो बॉलीवूडचा निर्विवाद सुपरस्टार झाला. त्यानंतर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्यामुळेच राजेश खन्ना याचा जावई असलेल्या अक्षयच्या चित्रपटाच्या प्रिमिअरला अमिताभ बच्चनने लावलेली हजेरी हा अक्षयसाठीही सुखद धक्का ठरला.

बुलेट ट्रेनमध्ये लालूजी!
नवी दिल्ली, १३ जानेवारी/पी.टी.आय.

रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा कारभार म्हणजे ‘बडा फास्ट’ ट्रेनच आहे. भारतामध्ये अतिजलद वेगाने धावणारी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न लालूजींनी उराशी बाळगले आहे. जपानच्या दौऱ्यावर असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी आज टोकियोमध्ये बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने लालूंनी पुढचा टप्पा गाठला असे या प्रवासाबद्दल म्हणायला हरकत नाही.
टोकियो येथे केलेल्या बुलेट ट्रेनमधील प्रवासात लालूप्रसाद यादव यांच्यासमवेत रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकारीही होते. ही बुलेट ट्रेन ताशी ३०० किमी वेगाने धावते. जपानमध्ये बुलेट ट्रेनला शिंकानसेन असे म्हणतात. लालूप्रसाद यांनी बुलेट ट्रेनमधून टोकियो ते क्योटो असा सुमारे ५१५ कि. मी. चा प्रवास केला.

मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकार नसावे : ब्रिटनचा नवा पवित्रा
नवी दिल्ली, १३ जानेवारी/पी.टी.आय.

गेल्या २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात असल्याची शक्यता ब्रिटनने फेटाळून लावली. या हल्ल्यामागे असलेल्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे खणून काढण्याची जबाबदारी मात्र पाकिस्तानची आहे, असेही ब्रिटनने स्पष्ट केले. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलीबँड यांच्याशी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी विस्तृत चर्चा केली.

डॉ. रंगनाथन यांचा गौरव
हय़ूस्टन, १३ जानेवारी/पी.टी.आय.

भारतीय-अमेरिकी प्राध्यापक डॉ. रामा रंगनाथन यांना २००९च्या एडिथ अँड पीटर ओडोनेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. द अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिन, इंजिनिअरिंग अँड सायन्स, टेक्सास या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. डॉ. रामा रंगनाथन हे टेक्सास विद्यापीठाच्या सिस्टीम्स बायॉलॉजी विभागाचे प्रमुख असून त्यांनी मानवी शरीरातील काही प्रथिने कृत्रिमरीत्या तयार करण्याच्या क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. दरवर्षी तरुण संशोधकांना विज्ञान, वैद्यक व अभियांत्रिकी या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. २५ हजार अमेरिकी डॉलरचे मानधन व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘द स्टोरी ऑफ इंडिया’ माहितीपटाला हिंदू संघटनेचा आक्षेप
न्यूयॉर्क, १३ जानेवारी/पी.टी.आय.

इतिहासकार मायकेल वूड यांच्या ‘द स्टोरी ऑफ इंडिया’ या माहितीपटाला अमेरिकेतील हिंदूू अमेरिकन फाऊंडेशन या संघटनेने आक्षेप घेतला आहे. हा माहितीपट दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असून, त्यात आर्याच्या स्थलांतराच्या सिद्धान्ताचे विपर्यस्त सादरीकरण झाले आहे, असा आक्षेप या हिंदुत्ववादी संघटनेने घेतला आहे.

गुजरातच्या पोलिस महासंचालकांची नियुक्ती रद्द करण्यास नकार
नवी दिल्ली, १३ जानेवारी/पीटीआय

कुठल्याही सरकारी नोकराची नेमणूक करणे हा कार्यकारी मंडळाचा विशेषाधिकार आहे असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने आज गुजरातचे पोलिस महासंचालक पी.सी.पांडे यांची नेमणूक रद्द करण्यास नकार दिला. गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींच्यावेळी कामात त्रुटी राहिल्याच्या कारणास्तव त्यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी याचिका एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती.
‘सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस’ या संस्थेची याचिका निकाली काढताना न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारी नोकराची किंवा अधिकाऱ्याची नेमणूक करणे हा सरकारचा विशेषाधिकार आहे. पोलिस महासंचालक पदी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा अधिकार सरकारचा आहे. न्या. मरकडेय काटजू व व्ही.एस शिरपूरकर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या कार्यकक्षेत राहूनच आम्हाला विचार करावा लागेल. त्यामुळे त्या नेमणुकीत न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. पांडे यांच्यावर जर काही शिस्तभंगाची कारवाई करायची असेल, तर तो सरकारचा प्रश्न आहे. सत्यशोधनाच्या कामात आम्ही पडणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

विप्रोची पाठराखण
नवी दिल्ली, १३ जानेवारी/पी.टी.आय.

भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील ‘विप्रो’शी आगामी चार वर्षे कोणतेही व्यवहार करण्यास जागतिक बँकेने बंदी घातली असली तरी विप्रोच्या पाठीशी ‘असोचेम’ संघटना मात्र ठामपणे उभी आहे. विप्रोने कोणताही गैरव्यवहार केला नाही असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यंनी म्हटले आहे.विप्रोच्या प्रतिनिधींनी २००० साली मुख्य माहिती अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने थेट सहभाग योजनेत सहभागाची ऑफर दिली होती. त्या बदल्यात या कर्मचाऱ्यांना विप्रोचे अमेरिकन डिपॉजिटरी रिसिप्ट प्राथमिक समभाग विक्रीच्या किमतीला देऊ केले होते असा आरोप आहे. त्यामुळे जागतिक बँकेने विप्रोशी कोणतेही व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे.विप्रो, टीसीएस, इन्फोसिस सारख्या ख्यातनाम कंपन्या व्यावसायिक मूल्ये पाळतात, असे नमूद करून असोचेमचे सरचिटणीस रावत यांनी म्हटले आहे की, भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची आमच्या देशातील उद्योगजगत कायम पाठराखणच करील. सत्यम कॉम्प्युटरमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळा हे अपवादात्मक प्रकरण असून त्याचा तपास सुरू आहे.