Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग

‘एसबीआय मॅग्नम टॅक्सगेन’ योजनेचा पाच वर्षांत २५.०८ टक्क्यांचा वार्षिक परतावा
व्यापार प्रतिनिधी: भारतातील सर्वात मोठी शेअर बाजाराशीसंलग्न बचत योजना (ईएलएसएस) म्हणून ख्याती असलेल्या ‘एसबीआय मॅग्नम टॅक्स गेन १९९३’ या गुंतवणूक योजना ही आता गेल्या पाच वर्षांतील अव्वल मानांकित योजनाही बनली आहे. ३१ डिसेंबर २००८ पर्यंतच्या पाच वर्षांत योजनेने वार्षिक सरासरी २५.०८ टक्के असा भरीव परतावा आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. अशा फंडांसाठी निश्चित केल्या गेलेल्या ‘बीएसई १००’ या (बेन्चमार्क) मानदंडाने याच कालावधीत दिलेला परतावा सरासरी १०.१५ टक्के असून, या योजनेने त्यापेक्षा कितीतरी सरस कामगिरी करून दाखविली आहे.

विश्वासार्हताच धोक्यात येईल इतक्या नफेखोरीचा मोह टाळा
‘सत्यम महाघोटाळ्या’च्या पाश्र्वभूमीवर ‘नॅसकॉम’चा सल्ला
व्यापार प्रतिनिधी:

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमध्ये अधिकाधिक नफेखोरीच्या मागे लागून ग्राहक कंपन्यांना जाळ्यात ओढण्याचा मोह आय.टी. कंपन्यांनी टाळावा, असा सबुरीचा सल्ला ‘नॅसकॉम’ने दिला आहे. अशा प्रयत्नांमधून भारतीय आय.टी. उद्योगाची विश्वासार्हता धोक्यात येत आहे, असेही ‘नॅसकॉम’ने स्पष्ट केले आहे.सत्यम कॉम्प्युटरमधील घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर ‘नॅसकॉम’चे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी पुण्यात बोलताना वरील सूचक सल्ला दिला. नैतिकता सोडून नफा कमाविण्याचा मोह टाळण्याइतके देशातील आय.टी. उद्योग परिपक्व आहेत, असा विश्वास व्यक्त करून नटराजन म्हणाले की, ‘सत्यममधील प्रकरणाविषयी केंद्र सरकारने उचलेल्या पावलांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कंपनीचे नुकतेच स्थापन झालेले संचालक मंडळ यापुढील काळात गुंतवणूकदार, ग्राहक आणि आय.टी. क्षेत्राचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करतील, याची आम्हाला खात्री आहे.’सत्यममधील प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय आय.टी. उद्योगाचा भारतीय कंपन्यांवरील विश्वास कमी होणार नाही, याची खातरजमा करणे हा सध्याच्या घडीला आमचा प्राधान्याचा विषय आहे, असेही नटराजन म्हणाले.

कोणत्याही काळात अस्तित्व टिकवून धरण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबविणे महत्त्वाचे- प्रमोद चौधरी
व्यापार प्रतिनिधी: नवकल्पना (इनोव्हेशन्स) ही केवळ काहीजणांना मिळालेली दैवी देणगी नसून समस्या सोडविणे व प्रगती करणे यासाठीचा तो पद्धतशीर शास्त्रीय दृष्टिकोन आहे. उद्योग, उद्योजक व त्यातील कर्मचारी यांनी कोणत्याही काळात आपले अस्तित्व टिकवून धरण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी येथे केले. भारतातील कल्पक संशोधकांना त्यांनी बनविलेली अभिनव उत्पादने वा विकसित केलेल्या प्रक्रिया शास्त्रज्ञ, उद्योग, गुंतवणूकदार व समाजासमोर सादर करण्याची संधी देणाऱ्या ‘इनोव्हेशन्स २००९’ या कार्यक्रमाचे उद्घाटन पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीतील देवांग मेहता सभागृहात झाले. त्याप्रसंगी चौधरी बोलत होते. आयआयटी मुंबई माजी विद्यार्थी संघटनेचा पुणे विभाग व टीआयई ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्राज इंडस्ट्रीज व पर्सिस्टंट सिस्टिम्स यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवकल्पनांचा आविष्कार सर्जनशीलतेशी संबंधित असतो. ही सर्जनशीलता एखादी व्यक्ती प्रकट करते, तेव्हा त्यातून नवे शोध लागतात व उद्योजकता (आंत्रप्रेन्युअरशिप) वाढीस लागते. परंतु एखाद्या संघटनेतील कर्मचारी नवकल्पना, संशोधन, वेगळी व्यवसाय प्रारूपे, कौशल्ये या माध्यमांतून स्वत:चा व संघटनेचा विकास करतात, त्यातून सामूहिक उद्योजकता (इंट्राप्रेन्युअरशिप) वाढीस लागते, म्हणूनच निरंतर प्रगतीत नवकल्पनांचे स्थान अनन्यसाधारण आहे, असेही चौधरी म्हणाले.

‘आकृती सिटी फाऊंडेशन’तर्फे गुजरातमध्ये खासगी विद्यापीठासाठी ९०८ कोटींची गुंतवणूक
व्यापार प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात खासगी उद्योगसमूहांच्या प्रवेशाचा आदर्श पायंडा ठरेल, असा पुढाकार पश्चिम भारतात स्थावर मालमत्ता व पायाभूत सुविधांच्या विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मुंबईस्थित आकृती सिटी लिमिटेड या कंपनीने घेतला असून, गुजरातमध्ये राज्यस्तरीय खासगी विद्यापीठ स्थापले जाणार आहे. आकृती सिटी फाऊंडेशन या कंपनीशी संलग्न ना-नफा तत्त्वावरील प्रतिष्ठानाला गुजरात सरकारने विद्यापीठ स्थापनेला अलीकडेच मंजुरी दिली आहे. गुजरातमधील सध्याच्या व भविष्यातील औद्योगिक गुंतवणुकीला व येऊ घातलेल्या प्रकल्पांना साजेशा शैक्षणिक तसेच व्यावसायिक कौशल्यांच्या विकासाला पूरक अभ्यासक्रम या विद्यापीठात असतील. विशेषत: पायाभूत सोयी-सुविधांचा विकास, स्थावर मालमत्ता, किनाऱ्यांचा विकास, आरोग्यनिगा, ऊर्जा व्यवस्थापन, हॉस्पिटल मॅनेजमेंट वगैरे विषयांवर या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात भर दिला जाईल. आकृती सिटी लि.चे संस्थापक अध्यक्ष हेमंत शाह, व्यवस्थापकीय संचालक विमल शाह आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. के. एन. वैद या विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळावर असतील.

बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे नवीन ‘हेल्थ प्लॅन्स’
व्यापार प्रतिनिधी : देशातील तब्बल दोन लाख कोटी रुपयांच्या घरात जाणाऱ्या आरोग्यसेवा उद्योगाचा लाभ घेण्यासाठी बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (बीएसएलआय)ने दोन योजनांच्या माध्यमातून आरोग्य विमा व्यवसायात पदार्पण केले आहे. बीएसएलआय हेल्थ प्लान आणि पीएसएलआय युनिव्हर्सल हेल्थ प्लान या दोन योजनांची कंपनीने देशातील महत्त्वाच्या केंद्र आणि राज्यामध्ये सुरुवात केली आहे. भारतात फार मोठय़ा टक्केवारीच्या लोकांनी आरोग्य विम्याचे संरक्षण घेतलेले आहे. परंतु सध्याचा कल असा आहे की, कित्येक व्यक्ती सध्या त्याच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक होत आहेत. सन लाइफ फायनान्शिअल बीएसएलआय संयुक्त कंपनीतील भारतातील सहकारी यांनी केलेल्या आशियाई बाजारपेठेच्या अभ्यासात भारतातील ६४ टक्के व्यक्ती ५ वर्षांपूर्वी जितक्या प्रमाणात होत्या त्याहून आज आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक झाल्या आहेत. अभ्यासात असे दिसून आले आहे की, आरोग्य सेवेचा ७० टक्के खर्च व्यक्तिगत पातळीवर सोसला जातो. हे घटक त्यामुळे आरोग्य विमा बाजारपेठेला असलेली विकासाची संभाव्य संधी दर्शवितात. बीएसएलआय आरोग्य योजनेचे आरेखन ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणे आणि अतिशय आवश्यक असलेले आरोग्य संरक्षण पुरविणे या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे, असे बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सच्या हेल्थ बिझनेसच्या प्रमुख अंजना ग्रेवाल यांनी सांगितले. आरोग्य योजना सादर करून आम्ही आमच्या ग्राहकांच्या विस्तृत प्रकारच्या गरजा पूर्ण करीत आहोत. या योजनेत स्वत:साठी रु. १५,००० पर्यंत आणि वरिष्ठ नागरिक आईवडील असलेल्या व्यक्तीसाठी रु. २०,००० पर्यंत कर बचत लाभदेखील मिळतो.

इट्झ कार्डचे ‘मुंबई ७७’ आणि ‘होम शॉप १८’शी सामंजस्य
व्यापार प्रतिनिधी: रु. १०४७ कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या ईट्स कॅश कार्ड लि., या भारतातील पहिल्या ‘‘मल्टी पर्पज प्रीपेड कॅश कार्ड’ ने वेगळ्या प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी ‘मुंबई ७७ डॉट कॉम आणि होम शॉप १८ डॉट कॉम’सह एकत्रितपणे सुरू केलेल्या कामामुळे, मुंबईकरांचे आयुष्य अधिकच सुकर होण्यास मदत होईल. मुंबई ७७ डॉट कॉममुळे प्रवाशांना मुंबईच्या लोकल ट्रेनविषयीची माहिती समजेल. प्रवाशांना तात्कालिक डिरेक्टरी सेवा देता यावी याकरिता ईट्झ कॅश कार्डने मुंबई ७७ डॉट कॉमसह हातमिळवणी केली आहे. प्रवाशांना मुंबई रेल्वेचे टाइमटेबल त्यांच्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करून घेता येईल जे सध्या प्रायोगिक तत्त्वावर मोफत दिले जात आहे. या सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी ग्राहकांना फक्त एकदाच भरावे लागणारे शुल्क अदा करावे लागेल. होम शॉप १८ या नेटवर्क १८ ग्रुपच्या विश्वासार्ह शॉपिंग ब्रँडने केलेल्या इट्स कॅश कार्डशी केलेल्या हातमिळवणीमुळे केबल आणि सॅटेलाईट टीव्ही, ई कॉमर्स पद्धती आणि डायरेक्ट मार्केटिंग उत्पादने या सगळ्यांची घरबसल्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पूर्ण समाधानकारक सेवा मिळेल. या वाहिनीद्वारे दुकानदाराकडून घरापर्यंत सात दिवसांच्या आत माल पोहोचवला जाऊन, कोणत्याही वेळेला खरेदीची सोयही असेल. ग्राहकांना आता ईट्झ कॅश कार्ड वापरून कोणतीही वस्तू कोणत्याही वेळेला खरेदी करता येईल. ईट्झ कॅश कार्ड ही रु. १०० पासून रु. १०,००० पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत.

दीपक फर्टिलायझर्स: २१ जानेवारीला संचालक मंडळाची बैठक
व्यापार प्रतिनिधी: दीपक फर्टिलायझर्स लि. संचालक मंडळाची बैठक २१ जानेवारी ०९ रोजी होणार आहे. या बैठकीत ३१ डिसेंबर ०८ अखेर संपलल्या या आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक उलाढालीवर चर्चा होऊन त्याला मान्यता देण्यात येणार आहे. असे कंपनीच्या पत्रकात नमूद करण्यात आल आहे.

एलआयसीच्या ‘जीवनआस्था’ची आता ‘पॉलिसीबझार डॉट कॉम’वर ऑनलाइन खरेदी
व्यापार प्रतिनिधी: आयुर्विमा तसेच सर्वसाधारण विमा योजनांच्या विक्रीचे दालन असलेल्या ‘पॉलिसीबझार डॉट कॉम’वर आता भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ची नवीन ‘जीवनआस्था’ पॉलिसीची ऑनलाइन विक्री खुली झाली आहे. एलआयसीकडून इंटरनेटद्वारे विक्री होत असलेली ही पहिलीच पॉलिसी आहे. येत्या २१ जानेवारी २००९ पर्यंत खुली असलेली ‘जीवनआस्था’ ही मृत्यू किंवा मुदतपूर्तीपश्चात निश्चित लाभाची हमी देणारी सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. शिवाय गुंतवणूक रकमेवर कलम ८० सी अन्वये तसेच मुदतपूर्ती लाभांवरही कलम १० (१०डी) अन्वये दुहेरी कर-वजावटीचा लाभ ही योजना प्रदान करते. येत्या काळात ‘पॉलिसीबझार’च्या ऑनलाइन व्यासपीठाचा वापर करून अन्य अनेक योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा आपला संकल्प असल्याचे एलआयसीच्या क्षेत्रीय संचालिका डॉ. तनुजा कुमार यांनी सांगितले.

क्वांटम आणि आयडीबीआय इन्टेक यांच्यात सामंजस्याचा करार
व्यापार प्रतिनिधी: क्वांटम इन्फोट्रेनर्स अ‍ॅण्ड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आयडीबीआय बँकेची उपकंपनी असलेल्या आयडीबीआय इन्टेक या कंपनीबरोबर करार केला आहे. ‘आयडीबीआय इन्टेक’ ही आयडीबीआय बँक लिमिटेडची उपकंपनी आहे. आयडीबीआय इन्टेक लिमिटेडने कोअर बँकिंग प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र इत्यादी सुरू केलेले अभ्यासक्रम आर्थिक संस्थांत अतिशय लोकप्रिय असून, त्यांचा आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत जास्त प्रसार केला जाईल. शिक्षण आणि विकासासाठी विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी ही अतिशय रास्त पद्धत ठरेल.

महिद्रा ट्रॅक्टर्सचे साक्षरता प्रसारासाठी ‘प्लॅनेटरीड’ला साहाय्य
व्यापार प्रतिनिधी: महिंद्रा फार्म इक्विपमेंट विभागाने आपल्या सामाजिक बांधिलकी धोरणा काली पॅनेटरीड या अशासकीय संस्थेला त्यांच्या साक्षरता प्रसार कार्याला साहाय्य करण्याचे जाहीर केले आहे. हिंदी चित्रपटातील गाण्यांना उपशीर्षके देण्याचा (सेम लेंग्वेज सब टायटलिंग) एक प्रकल्प या संस्थेने प्रथमच साक्षर होणारांसाठी राबविण्याचे ठरवलेले आहे. कंपनी या कार्याला जानेवारी ते जून २००९ या कालखंडात प्रायोजक या नात्याने रु. १० लाख देणार आहे. दूरदर्शन हिंदी चित्रपट गीतांचा रंगोली नामक सप्ताहिक कार्यक्रम करते.ही घोषणा करते समयी फार्म इक्विपमेंट विभागाचे प्रेसिडेंट अंजनिकुमार चौधरी म्हणाले की शिक्षणातून सदासर्वकाळ जीवन समृद्ध होत असते. सेम लँग्वेज सब - टायटलिंग (एसएलएस) हे साक्षरता प्रसाराचे अभिनव साधन झाले आणि त्यासाठी प्लॅनेटरीडला करत असलेल्या आमच्या मदतीने आम्ही देशातील सर्व स्तरातील शिक्षणाचा दर्जा उंचावत आहोत असे ते म्हणाले.

व्यापार संक्षिप्त
बँक ऑफ बडोदाच्या मुखर्जी यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचे महासंचालक (मनुष्यबळ व मार्केटिंग) दीपांकर मुखर्जी यांना वर्ष २००८च्या राजीव गांधी सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजीव गांधी फाऊंडेशनशी संलग्न असलेल्या ओरिसाच्या राजीव गांधी फोरमकडून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. बँकिंग क्षेत्रातील असामान्य कामगिरी आणि विशेषत: मार्केटिंग क्षेत्रातील मुखर्जी यांच्या योगदानाची पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. भारतातील सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात बँक ऑफ बडोदाने सर्वप्रथम ब्रँडिंग उपक्रमांना सुरुवात केली, त्यातही मुखर्जी यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
टाटा इंडिकॉमची व्हॉईस एसएमएस सेवा
व्यापार प्रतिनिधी: टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड या कंपनीने व्हॉईस एसएमएस क्षेत्रातही जोरदार आघाडी मारत पहिले स्थान पटकावले आहे. आज टीटीएमएलने आपली अनोखी व्हॉईस एसएमएस ऑफर सुरू केली. ही आकर्षक, नवीन सेवा ग्राहकांना सादर करण्याकरिता जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपन्या कीरूसा व क्वालकॉम यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता फोनग्राहक त्यांच्या स्टोअरड् कॉन्टॅक्ट्स / फोनबुकमधून थेट व्हॉईस एसएमएस पाठवू शकतात. व्हॉईस एसएमएस पाठविण्याची पद्धत टेक्स्ट एसएमएससारखीच आहे. फरक एवढाच, की व्हॉईस एसएमएसमध्ये तुम्हाला तुमचा मेसेज टाईप करत न बसता तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचा आहे.
सेंट्रल बँकेकडून प्रधान ऋणदरात कपात
व्यापार प्रतिनिधी: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या प्रधान ऋण दरात (बेन्चमार्क प्राइम लेंडिंग रेट) पाऊण टक्क्यांची कपात केली आहे. ज्यामुळे बँकेचा बीपीएलआर विद्यमान १३.२५ टक्क्यांवरून, १२ जानेवारी २००९ पासून १२.५० टक्के लागू होईल.
एलजीचा नवीन ‘केपी ५००’ हँडसेट
व्यापार प्रतिनिधी: एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया या कंपनीने भारतीय बाजारात एलजी केपी ५०० (कुकी) हा हँडसेट दाखल केला आहे. आकर्षक किंमत असलेल्या या फुल टच स्क्रीन हँडसेटमध्ये अत्याधुनिक टच टेक्नॉलॉजी आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फुल टच स्क्रीन हँडसेटमधील वैशिष्टय़े आहेत. स्टायलिश आणि उत्कृष्ट हँडसेट बनवण्याचा एलजीचा अनुभव लक्षात घेता एलजी केपी ५०० देखील लक्ष वेधून घेईल. स्लीम आणि हलका असलेला एलजी केपी ५०० हँडसेट अत्यंत आकर्षक, तपकिरी रंगाचा आहे. एलजी केपी ५०० याला कुकी असे टोपणनाव आहे. जगभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना आवडेल असा हा हँडसेट आहे. एलजी कुकी सर्वाना परवडणारा, वापरण्यास सोपा आणि अनेक वैशिष्टय़े असलेला आहे. एलजी केपी ५०० (कुकी) हँडसेटची किंमत १३ हजार ५०० रुपये आहे.
विप्रो सेफवॉश
व्यापार प्रतिनिधी: विप्रो सेफवॉश हा लिक्विड डिर्टजट आता नीमच्या गुणधर्मासह बाजारात आला असून, एका विशेष ऑफरअंतर्गत एकावर एक पूर्णत: मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. एकावर एक मोफत ही ऑफर विप्रो सेफवॉशच्या १ किलो, ५०० ग्रॅम आणि २०० ग्रॅमच्या पॅककरिता लागू आहे. हिवाळय़ात लोकरीचे कपडे रोगजंतूंपासून मुक्त ठेवता यावेत, याकरिता नीमचे नैसर्गिक गुणधर्म असलेले हे उत्पादन उपयुक्त आहे.