Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
अग्रलेख
अजितदादांचे सुधारगृह
 
अगदी अट्टलातला अट्टल गुन्हेगारही कधीकधी प्रामाणिकपणाच्या भावना व्यक्त करतो. त्याला असणारी समज मग राजकारण्यांमध्येही दिसत नाही. त्यातून निवडणुका तोंडावर आल्या, की राजकारणी मंडळींना सैरभैर व्हायला होते. मग ते गुंड प्रवृत्तीच्या, खुनशी मंडळींना हाताशी धरून आपल्या राजाकारणाचे फास आवळायला लागतात. असाच एक प्रकार अलीकडेच पुणे शहरात घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एका नामचीन गुन्हेगाराला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्याचा हार घालून सत्कारही साजरा झाला. त्यावर टाळ्या पडल्या. वाल्याचा वाल्मीकी होतो, तिथे आपल्या या ‘बाब्या’चे काय घेऊन बसलात, असा सवालही करण्यात आला. तो करणारे दुसरे तिसरे कुणी नव्हते, तर ते पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार होते. काकांच्या विमानातून काही गुंडांनी प्रवास केल्याने काही वर्षांपूर्वी या राज्यात हलकल्लोळ माजला होता, हे अजित पवारांना माहीत असणारच, म्हणून तर त्यांनी हा प्रवेशाचा सोहळा जमिनीवर आणि काही हजार जणांना साक्ष ठेवून पार पाडला. वृत्तपत्रांमध्ये हा गुंड कोण ते प्रसिद्ध झाले आणि मग पळापळ सुरू झाली. टीकेचे मोहोळ उठले आणि अखेरीस ‘अजित पवारांची बदनामी सहन न झाल्या’ने अडीच दिवसांपूर्वी ज्या पक्षात त्याने प्रवेश केला होता, त्या पक्षाला त्याने रामराम ठोकला. त्याने काढलेल्या पत्रकात जाता जाता सांगून टाकले, की कालपर्यंत आपल्या पक्षात या म्हणून आपल्याला बोलावणाऱ्यांनी आता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर टीका केली. या गुंडाने घातलेली टोपी कुणासाठी आहे, याचा शोध काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आपापल्या परीने घेऊ लागले आहेत. पुण्याचे काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांनी ‘आमच्या पक्षात कुठे आहेत गुन्हेगार?’ असा पत्रकारांनाच प्रश्न केला. पक्षाच्या दुय्यम पदाधिकाऱ्यांची त्यांना आजकाल बहुधा भीती वाटत नसावी. त्यामुळेही त्यांनी हे बोलण्याचे धाडस केले असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या मेळाव्यात या गुंडाचे झालेले स्वागत इतर पक्षातल्या त्याच्या साथीदारांना हुरहूर लावून गेले असे म्हणतात. ‘काहीजण मागल्या काळात चुकले असतील, तर त्यांना चुका दुरुस्त करायची संधी द्यायला पाहिजे’, असे अजित पवार त्यांच्या मेळाव्यात म्हणाले. बाबा बोडके या कुप्रसिद्ध गुंडाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करून घेताना त्यांचे हे भाषण झाले. या गुंडाच्या नावावर खून, खंडणी, अपहरण यांसारखे बरेच गुन्हे नोंदवले गेले आहेत. एका गुन्ह्य़ात तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्याला ‘मोक्का’ कायदा लावण्यात आला होता. सध्या तो जामिनावर असल्याने या संधीचा ‘राष्ट्रवादी’ने लाभ उठवला. ‘आपल्याला दिल्लीत जर पवारसाहेबांना शक्ती द्यायची असेल तर ‘यांच्यासारख्या’ कार्यकर्त्यांची गरज आहे’, असे प्रतिपादन अजित पवारांनी केले. या मेळाव्याला हजर असणाऱ्यांच्या मोटारी किती नानाविध बनावटीच्या होत्या, याविषयी पुण्याच्या वृत्तपत्रांमधून वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी बरीच माहिती प्रसिद्ध झाली. ज्या गुन्हेगाराचा हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पार पडला, तो पाहून अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली असल्यास नवल नाही. शिवसेनाप्रमुखांनी मागे एका जाहीर सभेत ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’, असे विधान केले होते, त्याच धर्तीवर अजित पवारांनी काँग्रेसला हे आव्हान दिले की काय, ते कळायला मार्ग नाही. पुणे शहर काँग्रेसच्या पाठीशी खासदार सुरेश कलमाडी यांनी अशा कित्येकांची शक्ती उभी केली आहे, ती चालते का, असा पोरकट प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते खुलेआम विचारत होते. कलमाडींनी अशा कितीजणांना पावन करून घेतले, हे महाराष्ट्राला आणि विशेषत: पुणेकरांना ठाऊक आहे, पण आज कलमाडींना आणि काँग्रेसला संपवायचे म्हणून आणि शरद पवारांना दिल्लीत ताकद द्यायची म्हणून पुण्यात आणि महाराष्ट्रात गुंडांची फौज उभी केली जाणार असेल तर मग राज्यात यादवी माजल्याशिवाय राहणार नाही. गुंडगिरीच्या ताकदीवर पंतप्रधानपद मिळवावे, असे पवारांनाही वाटत असेल, असे नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्ष महापालिकेच्या सत्तेत सहभागी आहे. या पक्षाच्या एका नेत्याला निगडीत ठार करणारे कोण होते आणि पिंपरी-चिंचवड भागात सर्वाधिक गुंडगिरी कोणत्या पक्षाची आहे, याचा विचार करण्याएवढी बुद्धिमत्ता भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक वा राज्य पातळीवरील नेत्यांकडे असेल, असे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा बोडके याला प्रवेश दिल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी तर ‘गुंडगिरीची व्याख्या करायची गरज आहे,’ असे प्रतिपादन केले. त्यांची ही लाचारी सत्तेच्या चतकोरासाठी आहे. चार आण्यांची अफू घेतली, की माणसे कशी बरळू लागतात, त्याचे हे उदाहरण आहे. राजकारणातली सौदेबाजी ही त्यांच्या दृष्टीने अफूच आहे. हल्ली राजकारणात टिकून राहायचे असेल, तर सत्तेची गरज असते. सत्तेसाठी पैसा हवा असतो. पैसा हा गुन्हेगारीतून उभा राहतो. तो सरळ मार्गाने मिळवायचा तर या गुन्हेगारांच्या पिढय़ान्पिढय़ांचे एकत्रित आयुष्यही त्यांना पुरे पडणार नाही. मग त्यांच्यापैकी काहीजण दुसऱ्याचा काटा काढायचे, त्याला आयुष्यातून उठवायचे किंवा काटा न काढायचे, असे विविध दर जाहीर करतात. त्यांची ही वेगळ्या तऱ्हेची दुकानदारी सर्रास चालते. त्यांच्या मागणीनुसार पुरवठा केला गेला नाही, तर त्यांचा हिशेब चुकता झालाच म्हणून समजा. अशा गुन्हेगारांमागे जर राजकारणी नेते उभे असतील, तर पोलीस त्यांना हात लावायला धजावणार नाहीत. गुंडांची सारी धडपड त्यासाठी तर असते. म्हणून ते फोटोतही संधी मिळेल तिथे नेत्यांमागे घुसत असतात. हल्ली पुणे, मुंबई आणि अन्य मोठय़ा शहरांमध्ये जमिनी बळकावायचा धंदा जोरात आहे, त्यात बऱ्याच अंशी राजकारणी आहेत. अनेक राजकारणी बिल्डरांच्या धंद्यातच थेट भागीदार आहेत. बिल्डरांना संरक्षण आणि पैसा या दोन्ही गोष्टी पुरवणारे पुन्हा राजकारणीच आहेत. पुण्यात अलीकडेच दुसऱ्या एका गुंडाने एकूण सहा फ्लॅट स्वत:साठी बळकावले. इतर गुंडांनी आणखी काय काय हैदोस घातले ते वेळोवेळी प्रसिद्ध होत असतेच. या सर्वाना सुधारायची संधी अजित पवार देणार आहेत काय? तसे असेल तर त्यांनी बारामतीला गुंडांचे सुधारगृहच चालवावे. हे सर्व गुंड राजकारण्यांच्या राजाश्रयाखाली सध्या फोफावत आहेत. गुन्हेगारांना या राज्यात मोकळे रान मिळते आहे. पोलिसांच्या दफ्तरी ज्याची फरारी म्हणून नोंद होती, त्याच्या मांडीला मांडी लावून या आधीचे गृहमंत्री बसत होते. त्यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांनी त्याच्याविरुद्ध कोणतेही पाऊल उचलले नाही. हल्ली कित्येक मोटारींवर राष्ट्रवादीचे घडय़ाळाचे चिन्ह असते, हेतू हा, की कुणी म्हणजे कुणीही आपल्याला अडवायची हिंमत करू नये. यांच्या मोटारी ‘नो एन्ट्री’तून घुसल्या तरी पोलीस त्यांना थोपवायला धजावत नाहीत. त्याशिवाय मोटारीवर ‘दादा’, ‘भाऊ’ ‘आबा’ लिहिले असल्यास पोलीस त्यांच्याकडे पाठ करूनच उभे राहतात. गुन्हे नोंदवायचे आणि जनतेच्या विस्मृतीत एकदा का ते गेले, की त्या नोंदींना केराची टोपली दाखवायची, असे पोलिसांचेही जगावेगळे तंत्र आहे. सांगायचा मुद्दा हा, की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीही काही बाबांना या पुढल्या काळात प्रवेश देतील, त्यांना उद्या निवडणुकीत प्रचारप्रमुख नेमले जाईल आणि कदाचित विधानसभेची उमेदवारीही दिली जाईल. ‘आपला तो बाब्या’, ही त्यांची धारणा असू शकते, पण अशाने काळ सोकावणार आहे. काँग्रेसने केले ते चालते का, असे विचारणाऱ्यांनी या स्थितीत निदान फुले-शाहू-आंबेडकर ही नावे तरी उच्चारू नयेत.