Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

चालुक्यांची बदामी
इतिहासाच्या पानांतून भेटलेली चालुक्यांची राजधानी बदामी दीड हजार वर्षांनंतर वर्तमानात कशी असेल या मनातील उत्सुकतेशी चाळा करतच बदामीत दाखल झालो. इतिहासातील काही ठळक तर काही पुसटशा खुणा अंगा-खांद्यावर बाळगणारी बदामी आज बागलकोट जिल्ह्य़ातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. विजापूरपासून साधारण सव्वाशे कि.मी. व बागलकोटपासून जेमतेम अध्र्या तासाच्या अंतरावर असलेले बदामी ग्रामीण-शहरी तोंडवळ्याचा संमिश्र चेहरा असलेले गाव. कधी-काळी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रवर सत्ता गाजविणाऱ्या चालुक्यांच्या राजसत्तेचे केंद्र असणारे बदामी आपली ती ओळख केव्हाच हरवून बसले आहे. चालुक्यांच्या पतनानंतर अनेक राजवटी बदलल्या, सत्ताकेंद्रे बदलली तसे काळाच्या ओघात बदामीचे सत्ताकेंद्र म्हणून असलेले महत्त्वही कमी झाले. कन्नड साहित्य व शिलालेखात पाचव्या शतकापासूनचा उल्लेख असलेल्या बदामीचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील चालुक्यन शैलीतील लेणी. बदामीतील डोंगर आडव्याऐवजी सरळसोट उभा पसरलेला असल्याने येथील चारही लेणी एकावर एक अशा पद्धतीने सहाव्या ते आठव्या शतकात कोरलेल्या आहेत. बदामीतील लेण्यांची रचना सोपी आहे. उत्तर व दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव लेण्यावर आढळतो. उभ्या डोंगरात ही लेणी कोरलेली असल्याने बहुतेक लेण्यांची खोली जास्त नाही. विशाल प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंडप तोलणाऱ्या खांबावर विविध शिल्पकाम केले आहे.

हमिंगबर्ड आणि पोस्टाची तिकिटे
‘हमिंगबर्ड’ हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा खूप वेगळा, पण तितकाच आकर्षक असतो. या ‘मधुमक्षी’ पक्ष्याचा आकार, त्याचे आकर्षक रंग, त्यांच्या पंखांची अतिजलद हालचाल, या हालचालीच्या साहाय्याने हवेत स्थिर राहण्याची आणि फुलातील मध फुलाला इजा न पोहोचवता शोषून घेण्याची त्याची क्षमता, अशा अनेक गोष्टींमुळे हा पक्षी आपल्यासारख्या सामान्यजनांना आणि पक्षी शास्त्रज्ञांनाही मोहवून टाकत असतो. हे पक्षी फुलासमोर हवेत स्थिरावतात आणि त्यांच्या लांब चोची आणि जिभेनं कण्र्याच्या आकाराच्या फुलांमधून फुलाच्या तळाशी असलेला मध ते शोषून घेतात. अशावेळी त्यांच्या जिभेची गुंडाळी होते. ती गुंडाळी जिभेच्या लांबीवर म्हणजे जिभेच्या दोन्ही कडा आत वळून होते. यामुळे जिभेची शीतपेय पिण्यासाठी आपण जी नळी वापरतो तशी एक नळी तयार होते. या नळीच्या साहाय्याने या मधुमक्षी पक्ष्याला मध शोषून घेणे सहज शक्य होत असते. या फुलातील रसाबरोबर -याला पुष्परस (नेक्टर) म्हणायला हवं, कारण खऱ्या अर्थाने तो मध नव्हे- त्यातील परागकण आणि छोटे कीटकसुद्धा मधुमक्षी पक्ष्याच्या पोटात जातात. हा पक्षी हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत एका जागी स्थिर राहतो. वर-खाली, पुढे-मागे करू शकतो. हेलिकॉप्टरच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून म्हणजे गेली काही लक्ष वर्षे तो या हालचाली करत आला आहे. पक्ष्यांच्या दुसऱ्या कुठल्याही गटात अशा तऱ्हेनं अन्न मिळवणारे पक्षी आढळत नाहीत. फक्त काही कीटक आणि मधुमक्षी वाघुळेच अशा तऱ्हेनं अन्न मिळवतात. त्यातही वाघुळं स्थिर राहू शकत नाहीत किंवा यांच्याप्रमाणे हालचालीही करू शकत नाहीत.

संहारक सागरी शैवाल
वनस्पतीसृष्टीतील शैवाल (अल्गी) हा एक महत्त्वाचा घटक आहे. ओलसर जमीन, दलदलीचा, पाणथळ भाग, दमट प्रदेशांतील वृक्षांची खोडे, भिंती यावर भरपूर हरितद्रव्य असणाऱ्या अनेकविध शैवालांचे सर्वप्रकार फायदेशीर असतात. नदी, विहिरी, तळी यातील गोडय़ा पाण्यात किंवा सागरांच्या खारट, क्षारयुक्त पाण्यातही शैवालांचे अनेक प्रकार वाढतात. शैवाल कोणत्याही परिसरात वाढत असले तरी ते उपयुक्त असतात. कारण हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाशसंश्लेषण क्रियेमार्फत अन्ननिर्मिती करतात. प्रथिनांची निर्मिती केल्याने शैवालांचे शाकाहारी प्राणी अन्नासाठी भक्षण करतात.
शैवाल स्वच्छ करून, त्यांच्यापासून विविध प्रकारच्या भाज्या तयार करणे, शैवाल उकडून त्याच्यापासून सूप तयार करणे, त्यांना सुकवून प्रथिणयुक्त पीठ करणे, काही शैवालांपासून ‘कॅराजीनान’ घटक मिळवून त्याचा वापर आईस्क्रिम तयार करण्यात मोठय़ा प्रमाणात केला जातो.
अशाप्रकारे अनेक स्वरुपांत उपयुक्त ठरणारी शैवाल वनस्पती त्रासदायक, संहारक प्रकारचे कार्य करते असा धक्कादायक शोध नुकताच कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधक प्रा. जेनिफर स्मिथ यांनी सप्रमाण सिद्ध केला आहे. अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडीज विभागांतर्फे स्मिथ यांच्या मार्गदर्शनानुसार एक संशोधक तुकडी सागरी शैवालांवर गेली तीन वर्षे संशोधन करीत आहे. हवाई बेटांमधील ओहू भाग, किरबाती, टोंगा, सालोमन बेटे या स्वतंत्र छोटय़ा राष्ट्रांमधील मत्स्योत्पादन खात्यांतर्फे गेली दोन वर्षे तक्रार नोंदविली जात आहे. त्यानुसार या राष्ट्रांच्या किनारपट्टीवरील माशांचे प्रमाण कमी कमी होत आहे.
या बदलत्या परिस्थितीवर संशोधन करण्यासाठी प्रा. स्मिथ यांनी विविध साहित्यांच्या मदतीने लक्ष केंद्रित केले. किनाऱ्याजवळ सागरांच्या अंतरंगात ठिकठिकाणी प्रवाळांच्या (कोरल्स) वसाहती असतात. प्रवाळांच्या वसाहती सागरतळाशी मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या असतात. त्या वसाहतींच्या आडोशाने खाचाखळगीत माशांचे मोठय़ा प्रमाणात पुनरुत्पादन अंडय़ांमार्फत होते. नैसर्गिक संरक्षण मिळते. परंतु अशा वसाहतींच्या जवळपास माशांचे प्रमाण लक्षात येण्याइतके घसरले आहे आणि प्रवाळांच्या वसाहती दुभंगल्या जात आहेत. ठिसूळ होत आहेत, असे संशोधकांच्या लक्षात आले आणि संशोधनाला निश्चित दिशा प्राप्त झाली.
पॅसिफिक अटॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या छोटय़ा बेटांच्या भागात अनेक वर्षे मासेमारी करणाऱ्या हेन्री टोती नावाच्या मच्छीमार संघटनेच्या प्रमुखाने आपल्या अनुभवांचे कथन स्मिथ यांच्या तुकडीकडे नोंदविले. त्याच्या सागंण्यानुसार, निरीक्षणांवर आधारित ब्यूटारीतारीपर्यंतच्या प्रदेशांत मासेमारीचे प्रमाण तीस टक्क्य़ांनी घसरले आहे. सुमारे पन्नास मच्छीमार कुटुंबानी माशांचे उत्पादन घटल्यामुळे स्थलांतर केले आहे. अनेक ठिकाणच्या प्रवाळांच्या वसाहतीजवळ जाळे टाकल्यास खूप भुकटी पाण्यात मिसळते. अशा प्रकारे सर्व संदर्भ लक्षात घेऊन संशोधक तुकडीने सागराच्या अंतरंगात शिरकाव करून छायाचित्रण करून वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रवाळांच्या वसाहतीच्या भागात ‘ईच्यूडमा डेंट्रीक्यूलाटम’ आणि ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ नावाच्या दोन सागरी शैवालांची प्रचंड वाढ लक्षात आली. आश्चर्य म्हणजे त्या शैवालामार्फत प्रवळांमधील क्षारयुक्त घटक शोषून घेतले जातात. याचा परिणाम
म्हणजे वसाहतीमध्ये जास्त भेगा निर्माण होतात. वसाहतींचा भाग ढासळतो. वसाहतींमधील खाचाखोचा नष्ट झाल्याने माशांचे संरक्षण कमी होऊन त्यांची संख्याही घटली आहे.
जास्त संशोधन करताना फिलीपाईन्स झांझीबार, कोरिआ, इंडोनेशिया या देशांच्या परिसरात सुद्धा या संहारक, हानिकारक, शैवालांची वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. संपूर्णपणे स्वत: अन्न निर्मिती करण्यासाठी, दुसऱ्यावर कोणत्याही प्रकारे अवलंबून नसणारी, स्वयंपोषी असे गुणधर्म असणाऱ्या शैवालांमध्ये अशा प्रकारचे आगळे गुणधर्म का निर्माण झाले याचे शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आहे. संपूर्णपणे मासेमारीवर अवलंबून रहाण्यापेक्षा उपयुक्त प्रकारच्या शैवालाची लागवड करावी, संरक्षण करावे म्हणून मच्छीमारांना प्रोत्साहन देण्यासाठी किरबाती नॅशनल सीवीड (सागरी वनस्पती) कंपनी स्थापन करण्यात आली. १९९१ पासून त्यांनी विविध प्रकारे मदतकार्य केले. पंरतु या नवीन संशोधनामुळे त्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का पोहोचला आहे. निसर्गात उत्परिवर्तनामुळे प्राण्यांप्रमाणेच वनस्पतीमध्ये सुद्धा गुणधर्म बदलतात, असे उदाहरण सिद्ध झाले आहे.
अनिल दांडेकर