Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
लोकमानस
कोकण रेल्वेला सरकारी दावणीला बांधू नका
 
शां. म. गोठोसकर यांचा कोकण रेल्वेसंबंधी लेख (२७ डिसेंबर)वाचला. त्यांनी कोकण रेल्वेची सर्व पाश्र्वभूमी, खासकरून जॉर्ज फर्नाडिस समाजवादी विचारांचे असूनही त्यांनी वेगळी कोकण रेल्वे कंपनी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय याबाबत नेटकेपणाने लिहिले आहे. त्यांच्याआधी कुठल्याही मंत्र्याला तो निर्णय घेता आला नव्हता. स. का. पाटील तर कोकणात रेल्वे होण्याच्या चक्क विरोधात होते. कोकण रेल्वे ही वेगळी कंपनी असल्यामुळेच ती टॅक्स फ्री व्याजाचे बॉण्डस् काढून पैसे उभे करू शकली. प्रकल्प बजेटरी प्रोव्हिजन्सच्या जंजाळापासून बाहेर राहिला. जाफर शरीफ या रेल्वेमंत्र्यांनी या वेगळ्या कंपनीला छळण्याचा जंगी प्रयत्न केला. (लालूप्रसाद आता त्यांचीच गादी चालवत असावेत.)
मात्र कोकण रेल्वे तोटय़ात चालत असेल तर त्याची जबाबदारी अडवाअडवी करणाऱ्या रेल्वे बोर्डाची आहे. कोकण रेल्वेचे भाडे एसटीपेक्षा कमीच आहे. त्याहून स्वस्त भाडय़ाची सोय मिळवण्याच्या नादात आपण उत्पन्नाचे विविध मार्ग शोधणारी कंपनी, ‘एक्स्प्रेस वे’चे बोगदे ठराविक काळात पुरे करणारी कंपनी, रेल्वेच्या महाजालात का हरवावी? त्यात नोकरभरतीची खैरात करण्याची सोय व्हावी म्हणून रेलमंत्रालय वाटच पहात आहे. रेल्वेच्या तुलनेत एक दशांश नोकरांच्या संख्येत चालणाऱ्या कंपनीचे विलीनीकरण करण्यात काय आर्थिक समजदारपणा आहे?
कोकण रेल्वेची गोची ही भांडवलापेक्षा कर्जावर जास्त भर देण्यामुळे झाली आहे. वेगळी कंपनी ही फायदेशीर कल्पना आहे. तिच्या गळ्याला नख लावू नये. सरकार जमा केलेले तर कधीच परत करत नसते, मग कोकण रेल्वेची कर्जमाफी सरकारने केली तर बिघडले कुठे? इंडियन बँकेला भांडवल भरून सरकारने तारलेच ना?
डॉ. ल. ना. गोडबोले, गोरेगाव, मुंबई

म्हणे महाराष्ट्राची राजभाषा मराठी!
ल्ल महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी आहे. मराठीचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केले व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना पहिले अध्यक्ष म्हणून नेमले. सांप्रत हे पद ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक सांभाळत आहेत. मराठीबरोबर महाराष्ट्र शासनाने राज्यातील अल्पसंख्याक भाषकांसाठी हिंदी, उर्दू व सिंधी अकादमी स्थापन केल्या आहेत. मध्यंतरी या महाराष्ट्राच्या हिंदी अकादमीतर्फे अखिल भारतीय हिंदी लेखकांचे साहित्य संमेलन मुंबईत भरले होते. या संमेलनाला महाराष्ट्राबाहेरचे हिंदी साहित्यिक अध्यक्ष होते. आश्चर्य म्हणजे राजभाषेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांना या संमेलनाचे निमंत्रणही नव्हते. यातून असा गेला की महाराष्ट्राची राजभाषा हिंदी. याला काय म्हणावे?
ज. बा. कुलकर्णी, डोंबिवली

उन्हाळी सुट्टी हवीच
‘न्यायालयांना उन्हाळी सुट्टी नसावी’, या सुरेश देशपांडे यांच्या पत्रावर वसईच्या अ‍ॅड. नोएल डाबरे यांनी उन्हाळी सुट्टीचे केलेले समर्थन वाचले. वकिली करणाऱ्यांना माहीत आहे की, कोणाही न्यायाधीशाला संपूर्ण महिना सुट्टी नसते तर फक्त १५ दिवस उन्हाळी सुट्टी असते. कारण त्यानंतर वर्षभरात सात दिवस दिवाळीची आणि सात दिवस नाताळची सुट्टी मिळावयाची असते. मे महिन्यात प्रत्येक कोर्टात एक महत्त्वाचे काम चालते ते म्हणजे दिवाणी दाव्यांची तपासणी. सर्व दिवाणी दावे हिशेबात धरले जातात. कारण पक्षकार दाव्यात हजारो रुपये कोर्ट फी भरतात. दावे जिंकणाऱ्यांना कोर्ट फी परत मिळते. फौजदारी खटलेही तपासले जातात कारण त्यात आरोपी तुरुंगात असला तर त्याची सुनावणी लवकरात लवकर घ्यावयाची असते. तालुक्याच्या ठिकाणी आकस्मिक प्रकरणांचा विचार करून दोन न्यायाधीशांपैकी एका वेळी एकच रजेवर जातात.
माधवराव जोशी, ठाणे

निधडय़ा छातीचे विनोद घाडगे
२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विनोद घाडगे यांनीआपले धाकटे बंधू बाळासाहेब घाडगे यांच्यासह धरमतर ते गेटवे पोहत जाण्याचे ठरवले. मात्र त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यांनी या बेधडक व्यक्तीला जवळून पाहिले आहे, त्यांच्या स्मृती या प्रसंगाने दाटून आल्या.
दादरला राहत असताना भावंडांबरोबर रस्त्यावर हातरुमाल विकून त्यांनी स्वत:चे व भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. स्वत: पोलीस शिपाई होऊन त्यांनी १३ वर्षे काम केले. नंतर स्वबळावर विक्रीकर अधिकारी झाले. त्यांचे बंधू बाळासाहेब घाडगे हे पोलीस अधिकारी झाले व त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय खाडय़ा पोहून पार केल्या. एखाद्याला पाण्यात न उतरता नुसत्या कडक नजरेने पोहायला शिकवायचे विनोद यांना चांगलेच अवगत होते. एकदा एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात सचिन तेंडुलकर मुंबई विमानतळावरून येत असताना त्याच्या मागे संरक्षणासाठी एक पोलीस अधिकारी होता. लोकांना सचिन लक्षात राहिला पण त्याच्या मागे उभा असलेला पोलीस अधिकारी बाळासाहेब घाडगे हा एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे हे कोणाला माहीत नव्हते!
विनोद यांना अनेक बक्षिसे मिळाली होती. पण त्यांना त्यांची अपूर्वाई नव्हती. ब्रूस लीचे चाहते असलेले विनोद यांना ज्युडो कराटेचीसुद्धा आवड होती. आता छत्रपती पुरस्कार घ्यायला विनोद हयात नाही. समाजाकडून काहीही न मागता समाजाला फक्त द्यायचेच त्यांना माहीत होते.
तुषार कोठारी, दादर, मुंबई
(यंगझिंगारो ट्रेकर्स)

गुरूचे महत्त्व जाणावे
विद्याधर ओक यांचा ‘दैव x कर्म = आयुष्य’ हा लेख (४ जानेवारी) वाचला. या संदर्भात काही प्रश्न उद्भवले.
१) ओक यांनी आपल्या लेखात कुठेही गुरूचा उल्लेख केला नाही, असे का? असे म्हणतात की, नियंता भेटला की, नियती बदलू शकते आणि याची अनेक उदाहरणे आहेत. खरे तर गुरूच आपल्या शिष्याची आतुरतेने वाट पाहत असतो याचे उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनानेच नरेंद्र विवेकानंद झाले, निवृत्तीनाथांमुळेच ज्ञानदेव परिपूर्ण झाले. गहनीनाथांमुळेच निवृत्तीनाथ पूर्ण झाले. अर्थात चांगला गुरू भेटण्यासाठी चांगले कर्म हेच आवश्यक आहे पण तरीही गुरूचे महत्त्व लेखात यायला हवे होते.
२) जन्माच्या वेळची आंतर्बाह्य परिस्थिती आपण न मागता आपल्याला मिळते असे लेखकांनी म्हटले आहे. यात आंतर्परिस्थिती न मागता मिळते. पण बाह्य आपण मागितलेली असते. फरक एवढाच आहे की, ते आपल्याला आठवत नाही. आपण जन्म कुठे घ्यायचा, कुणाच्या पोटी घ्यायचा हे आपणच ठरवत असतो. फक्त ते गेल्या जन्मी ठरवल्याने आपल्याला या जन्मी ते स्मरत नाही. याचीही अनेक उदाहरणे आपल्याला माहीत असतीलच आणि म्हणूनच आपण देणी-घेणी फेडण्यासाठी पुन:पुन्हा एकत्र येत असतो.
विचार फक्त एका जन्माचा असूच शकत नाही. हा प्रवास पहिल्या जन्मापासून सुरू झाला आहे आणि तो मुक्ती मिळेपर्यंत सुरू आहे. त्यामुळे जीवन हे एका जन्माचे नाही. ही एक साखळी आहे. जन्म-मृत्यू हे त्यातले अंक आहेत. नाटक पूर्ण पाहायला हवे. एका अंकानंतर त्याबद्दल लिहिणे कदाचित चूक ठरू शकेल. तसेच जन्माबद्दल म्हणता येईल. त्यामुळे कर्म आणि फक्त कर्मच महत्त्वाचे आहे. ईश्वराकडून आपण काय, कसे आणि किती घेऊ शकतो ते महत्त्वाचे आहे.
श्रीपाद जोशी, ठाणे