Leading International Marathi News Daily                                 गुरुवार, १५ जानेवारी २००९

स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात ‘जोधा अकबर’ने मारली बाजी
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी
सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक (आशुतोष गोवारीकर ) आणि सवरेत्कृष्ट अभिनेता (हृतिक रोशन) असे तीन पुरस्कार पटकावत स्टार-स्क्रीन पुरस्कारांमध्ये ‘जोधा अकबर’ चित्रपटाने बाजी मारली. ऐश्वर्या बच्चनला याच चित्रपटासाठी सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीचा आणि ए. आर. रेहमानला सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीताचा पुरस्कार मिळाला. साजिद खान, फराह खान आणि श्रेयस तळपदे यांचे खुमासदार सूत्रसंचालन आणि दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, बिपाशा बासू आणि प्रियांका चोप्रा यांच्या दिलखेचक सादरीकरण यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आज १५ व्या स्क्रीन पुरस्कार सोहळा रंगला. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नीरज पांडे (वेन्सडे) यांनाही गौरविण्यात आले तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियांका चोप्रा (फॅशन) मिळाला. मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘मेड इन चायना’ सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार अरूण नालवडे (बाई माणूस), सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मकरंद अनासपुरे (दे धक्का) तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार शिल्पा नवलकरने (बाई माणूस) पटकाविला.

‘युद्धाचा पर्यायही भारताला खुला’
नवी दिल्ली, १४ जानेवारी/खास प्रतिनिधी

भारतीय लष्कराला दहशतवादी हल्ले आणि अंतर्गत सुरक्षेला उत्पन्न होणाऱ्या धोक्यांसह कुठल्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सदैव सर्वोच्च स्तराची सज्जता ठेवावी लागते. पण अशा सज्जतेचा अर्थ युद्ध पुकारणे असा होत नाही. युद्ध करण्याचा निर्णय हा राजकीय असतो, असे मत लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी आज व्यक्त केले.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हापासूनच भारताचे लष्कर सदैव सज्ज स्थितीत आहे. आम्ही आमचे सर्व पर्याय खुले ठेवले आहे. पण युद्धाचा उन्माद निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असे कपूर म्हणाले. पाकिस्तानने आपले लष्कर आदिवासी भागातून भारताच्या सीमेवर हलविले आहे. भारताच्या लष्करी नियोजनात या बाबीचा समावेश झालेला आहे. आम्ही सज्ज आहोत. डिसेंबरच्या सुमाराला भारत-पाक सीमेवर लष्कराची जमवाजमव ही सामान्य बाब आहे. पण आम्ही पाकिस्तानच्या बाबतीत सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. मुत्सद्दीगिरी आणि आर्थिक पर्यायांसह भारतापाशी युद्ध करणे हा शेवटचा पर्याय असेल, असे मत कपूर यांनी व्यक्त केले.

‘मुन्नाभाई’वर प्रिया दत्त नाराज!
मुंबई, १४ जानेवारी/प्रतिनिधी

संजय दत्त याने समाजवादी पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केल्याचा निर्णय मला रुचलेला नाही, असे मत वायव्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांनी व्यक्त केले. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी प्रिया दत्त यांना प्रत्युत्तर दिले असून, अभिनेते सुनील दत्त जिवंत असताना संजयने रामपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार जयाप्रदा यांचा प्रचार केला होता व त्यांनी त्या वेळी संजयला अडवले नव्हते, समाजवादी पक्षाबाबत त्यांच्या मनात आकस नव्हता, त्यामुळे संजयने समाजवादी पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यात गैर काहीच नाही, असे अमरसिंग यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. प्रिया दत्त यांनी पोटनिवडणुकीच्यावेळी समाजवादी पक्षाची मदत मागितली होती अशा गौप्यस्फोटही अमरसिंग यांनी केला. संजयने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर संजयने निवडणूक लढवणे आपल्या वडिलांना (सुनील दत्त) आवडले नसते, असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. संजूबाबाच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करताना प्रिया दत्त यांनी सांगितले, की नाराजी साहजिक आहे, कारण आम्ही नेहमीच काँग्रेसबरोबर राहिलो आहोत. समाजवादी पक्षाची उमेदवारी स्वीकारणे हा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. आमच्यात कुठलेही कौटुंबिक वाद नाहीत. काँग्रेस पक्षाशी माझी वचनबद्धता आहे. संजय दुसऱ्या पक्षाबरोबर आहे.

जामा मशिदीच्या सल्लागार कौन्सिलचे सदस्य अंजारियांकडून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना बांगडय़ांचा आहेर
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध दिल्लीच्या जामा मशिदीच्या सल्लागार कौन्सिलचे सदस्य आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते अब्दुर रहेमान अंजारिया यांनी वेगळ्याच पद्धतीने केला आहे. त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी, पंतप्रधान युसुफ गिलानी आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रमुख तसेच ‘आयएसआय’च्या मुख्य अधिकाऱ्यांना बांगडय़ांचा आहेर पाठवून हा निषेध केला आहे. सर्व उर्दू प्रसारमाध्यमांनी अंजारिया यांनी केलेल्या या निषेधाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, भारतातील मुस्लिम समाज राष्ट्रभावनेशी पूर्णपणे समरस झालेला आहे.
मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारत सरकारने या हल्ल्यातील सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर केले. मात्र तरीही पाकिस्तानाचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते पुरावे स्वीकारण्यास तयार नाहीत. उलट दहशतवादी आपल्याला जुमानत नाहीत, असे झरदारींचे म्हणणे आहे.

उमेदवारीकरिता २५ लाखांची मागणी करणारा निरीक्षक उद्धव ठाकरे यांच्या सापळ्यात!
मुंबई, १४ जानेवारी/प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीकरिता करमाळा मतदारसंघातून उमेदवारी हवी असल्यास २५ लाख रुपयांची मागणी करणारे शेअर बाजार स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस व शिवसेनेने नियुक्त केलेले विशेष निरीक्षक राजा जाधव यांना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सापळा रचून दादर येथील जिप्सी हॉटेलमधून रंगेहाथ पकडले. जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने शिवसेनेत प्रचंड खळबळ व अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पवारांची सोनियांशी जागावाटपावर प्राथमिक चर्चा
नवी दिल्ली, १४ जानेवारी/खास प्रतिनिधी

मकर संक्रांतीचे पर्व साधून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे १०, जनपथ गाठून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये जागावाटपावरील चर्चा ‘गोड गोड बोलणी’त सुरु करण्याचा प्रयत्न केला. ही प्राथमिक स्वरुपाची चर्चा होती, असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. पंधरावी लोकसभा निवडणुकांसाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने महाराष्ट्राबाहेर किमान १५ जागांवर दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने अव्वल क्रमांकाचा पक्ष म्हणून ४८ पैकी २६ जागांवर हक्क सांगितला आहे.

निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..

बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..

अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
पण अचूक उत्तरं देणाऱ्या निवडक वाचकांना
त्यांचं या अंदाजांमागचं विश्लेषणवजा मनोगत आमच्याकडे पाठवायची, आम्ही ते प्रसिद्धही करणार आहोत..

१) कोण होईल पुढचा पंतप्रधान?
-------------------------------------------

२) कुठल्या राजकीय पक्षांची आघाडी सरकार बनवू शकेल?
--------------------------------------------

३) सरकार एकपक्षीय नसेल, तर सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष कोणता असेल?
--------------------------------------------

नाव-----------------------------------------
पत्ता-----------------------------------------
दूरध्वनी--------------------------------------

या तीन प्रश्नांची उत्तरे १५ फेब्रुवारीपर्यंत आमच्याकडे पाठवायची आहेत..
आमचा पत्ता
‘तुमची लोकसभा’, लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८