Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

उमेदवारीकरिता २५ लाखांची मागणी करणारा निरीक्षक उद्धव ठाकरे यांच्या सापळ्यात!
मुंबई, १४ जानेवारी/प्रतिनिधी

 
विधानसभा निवडणुकीकरिता करमाळा मतदारसंघातून उमेदवारी हवी असल्यास २५ लाख रुपयांची मागणी करणारे शेअर बाजार स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस व शिवसेनेने नियुक्त केलेले विशेष निरीक्षक राजा जाधव यांना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सापळा रचून दादर येथील जिप्सी हॉटेलमधून रंगेहाथ पकडले. जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने शिवसेनेत प्रचंड खळबळ व अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शिवसेनेने राज्यातील २८८ मतदारसंघांकरिता विशेष निरीक्षक नियुक्त केले आहेत. या निरीक्षकांनी थेट कार्याध्यक्ष ठाकरे यांना अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा आहे. जाधव यांच्याकडे करमाळा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असून गेले तीन महिने ते या मतदारसंघाला भेटी देत आहेत. करमाळा मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील हे मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारीकरिता इच्छुक होते, अशी माहिती तेथील पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या जयवंत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली व ते निवडून आले. जगताप यांना उमेदवारी मिळाली तरी सूर्यकांत पाटील यांनी बंडखोरी केली नाही. मात्र जगताप हे शिवसेनेशी एकनिष्ठ न राहिल्याने त्यांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नसल्याने नव्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. जाधव यांनी करमाळ्यातील आपल्या दौऱ्यांत सूर्यकांत पाटील यांचा व मेव्हण्याचा जमीनजुमला पाहिला. पाटील यांना बोलावून जाधव यांनी आपल्या अहवालास शिवसेनेत वजन असून तुमची उमेदवारी माझ्याच अहवालावर अवलंबून असल्याचे सांगितले व २५ लाख रुपयांची मागणी केली.
दहा ते पंधरा लाख रुपयांत तडजोड करण्याची विनंती पाटील यांनी करून पाहिली. परंतु जाधव त्यांचे ऐकायला तयार झाले नाहीत. तुम्ही पैसे दिले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारायण पाटील यांना करमाळ्यातून उमेदवारी देण्याचा अहवाल देण्याची धमकीवजा इशारा जाधव यांनी पाटील यांना दिला.
जाधव यांनी पैसे देण्याकरिता पाटील यांच्याकडे आग्रह धरल्यावर अखेरीस त्यांनी सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. बर्डे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला व तक्रार केली.
ठाकरे यांची सूर्यकांत पाटील यांनी भेट घेतली व झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला. मग ठाकरे यांनी आपल्या एका विश्वासू कार्यकर्त्यांला पाटील यांचे नातलग असल्याचे भासवून जाधव यांना पैसे देण्याकरिता दादर येथील जिप्सी हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. जाधव व तो तोतया नातलग करमाळ्याचे ‘डील’ करीत असताना जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्यावतीने नियुक्त होणारे निरीक्षक कोण ठरवते, त्याबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही का, याबाबत शिवसैनिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.