Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

जामा मशिदीच्या सल्लागार कौन्सिलचे सदस्य अंजारियांकडून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना बांगडय़ांचा आहेर
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध दिल्लीच्या जामा मशिदीच्या सल्लागार कौन्सिलचे सदस्य आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते अब्दुर रहेमान अंजारिया यांनी वेगळ्याच पद्धतीने केला आहे. त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी, पंतप्रधान युसुफ गिलानी आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रमुख तसेच ‘आयएसआय’च्या मुख्य अधिकाऱ्यांना बांगडय़ांचा आहेर पाठवून हा निषेध केला आहे. सर्व उर्दू प्रसारमाध्यमांनी अंजारिया यांनी केलेल्या या निषेधाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, भारतातील मुस्लिम समाज राष्ट्रभावनेशी पूर्णपणे समरस झालेला आहे.
मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारत सरकारने या हल्ल्यातील सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर केले. मात्र तरीही पाकिस्तानाचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते पुरावे स्वीकारण्यास तयार नाहीत. उलट दहशतवादी आपल्याला जुमानत नाहीत, असे झरदारींचे म्हणणे आहे. झरदारींच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आपले नियंत्रण पाकिस्तानी सैन्यावर, पंतप्रधान यांच्यावर तसेच दहशतवाद्यांच्या गटांवर नसेल तर चक्क हातात बांगडय़ा भरा, असे अंजारिया यांना सुचवले असून त्यासाठी बांगडय़ांचा हा आहेर त्यांनी नवी दिल्लीतील पाकिस्तानी राजदूतांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
आहेरासोबत पाठविलेल्या खरमरीत पत्रातून अंजारिया यांनी आपल्या तीव्र भावनाही व्यक्त केल्या आहेत. मुंबईवरील या हल्ल्यानंतर भारत सरकारने अद्याप कोणतेही कठोर पाऊल उचलले नसले तरी हा भारताचा दुबळेपणा समजू नये. भारत याची तुम्हाला अद्दल घडेल, असे उत्तर देऊ शकतो. निशस्त्र आणि निरपराध नागरिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारणे हे कृत्य इस्लाम आणि माणुसकीला काळीमा आणणारे कृत्य आहे. आपले सासरे आणि बेनझीर भुत्तो यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांनी भारताबरोबर एक हजार वर्षे युध्द करण्याची भाषा केली होती. मात्र त्याचे परिणाम काय झाले ते आपणास माहिती असलेच, याचे स्मरणही अंजारिया यांनी झरदारी यांना या पत्रात करून दिले आहे.
या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानचीच असल्याचे अंजारिया यांनी झरदारी यांना ठणकावून सांगितले असून पाकिस्तान हा हिंदूुस्तानचा शत्रूच आहे. हे शत्रुत्व गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून दोन्ही देशांमध्ये तीन युद्धेही झाली आहेत. या प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभवाची नामुश्की पत्करावी लागली असून थेट युद्धात पाकिस्तान हिंदूुस्थानला हरवू शकत नाही. त्यामुळेच आपण हा दहशतवादाचा मार्ग पत्करला असून निरपराध नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सभ्यतेचा मुखवटा टराटरा फाटला असून पाक सरकार दहशतवादी आणि खुनी आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्याचा हिंदूुस्तानला पुर्ण हक्क असल्याचेही अंजारिया यांनी या पत्रात म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर महिन्यात) मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात आला. जगभरासह भारतातही ठिकठिकाणी विविध संघटना आणि नागरिकांनी आपापल्या स्तरावर निषेध मोर्चे काढून आपला हा राग व्यक्त केला. यात आता नवी दिल्लीतील जामा मशिदीची भर पडली आहे. जामा मशिदीतूनच असा निषेध केला गेल्यामुळे पाकिस्तानी राजदूतावासही गडबडून गेले आहे. जगातील मुस्लिम समाजात दिल्ली येथील जामा मशिदीला विशेष श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. आणि त्यामुळेच या निषेधामुळे जगभरातील मुस्लिमांची भावना व्यक्त होत आहे.