Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांची सोनियांशी जागावाटपावर प्राथमिक चर्चा
नवी दिल्ली, १४ जानेवारी/खास प्रतिनिधी

 
मकर संक्रांतीचे पर्व साधून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे १०, जनपथ गाठून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये जागावाटपावरील चर्चा ‘गोड गोड बोलणी’त सुरु करण्याचा प्रयत्न केला. ही प्राथमिक स्वरुपाची चर्चा होती, असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
पंधरावी लोकसभा निवडणुकांसाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने महाराष्ट्राबाहेर किमान १५ जागांवर दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने अव्वल क्रमांकाचा पक्ष म्हणून ४८ पैकी २६ जागांवर हक्क सांगितला आहे. याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी आज शरद पवार यांनी आपल्या खासदार कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह १०, जनपथ गाठून जागा वाटपाच्या चर्चेला स्वतहून सुरुवात केली. केंद्रातील युपीए सरकारमधील मित्रपक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाची चर्चा सुरु करणारा पहिलाच पक्ष ठरला आहे.
आज सायंकाळी पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या कारमधूनच १०, जनपथ गाठले आणि सोनिया गांधी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. पाच वर्षांपूर्वी सोनिया गांधी संक्रांतीच्या काळातच पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणीचा प्रस्ताव घेऊन पोहोचल्या होत्या. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने लोकसभेच्या २६ जागांवर दावा केला असला तरी प्रत्यक्षात २२ जागा पदरी पाडून घेण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. याशिवाय मेघालय, गोवा, लक्षद्वीप, बिहार, ओरिसा, आसाम, मणिपूर, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून जागा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पवार यांनी आजची चर्चा या मुद्यांवरच केंद्रीत केली होती, पण त्यात नेमक्या आकडय़ावर चर्चा केली नाही, असे समजते. मेघालयमध्ये संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा आणि बिहारमध्ये तारीक अन्वर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापकांच्या जागांवर पवार यांचा सुरुवातीपासूनच दावा असून त्याच्या जोडीला आणखी १२-१३ जागा मागून काँग्रेसवर दबाव आणण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा पदरी पाडण्यासाठी ही दबावनिती असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससाठी महाराष्ट्रात १८ जागा सोडल्या होत्या. पण आता बरोबरीचा भागीदार म्हणून काँग्रेसने किमान २२ जागा सोडाव्या, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. त्यामुळेच स्वतहून पुढाकार घेत आज पवार यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली. ही प्राथमिक स्वरुपाची चर्चा होती आणि त्यात संख्येवर चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.