Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

आता ‘निवडक चिन्ह’ प्रसिद्ध होणार!
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 
‘चिन्ह प्रकाशन’तर्फे येत्या २५ जानेवारी रोजी ‘निवडक चिन्ह’ हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. १९८७, ८८ आणि ८९ अशा तीन वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘चिन्ह’च्या सुरूवातीच्याच तिन्ही अंकातून निवडलेले साहित्य या ग्रंथात प्रसिद्ध केले जाणार आहे.
राजा रवी वर्मापासून हुसैनपर्यंत आणि चित्रकार हिटलरपासून मोनालिसापर्यंत असा चित्रकार आणि चित्रकलेच्या विविध अंगांचा, आठवणी-आत्मकथने, लेख, व्यक्तिचित्रे, मुलाखती अशा विविध माध्यमातून घेतलेला परामर्श हे या ‘निवडक चिन्ह’चे वैशिष्टय़ आहे. याशिवाय भरत दाभोळकर, वसंत बापट, प्रिया तेंडुलकर, एस. एम. पंडित, दीप्ती नवल, ललिता लाजमी, रामदास फुटाणे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अंबिका धुरंधर , बाबुराव सडवेलकर यांच्यासारख्या ३५ नामवंतांच्या गाजलेल्या लेखांचा या ‘निवडक चिन्ह’मध्ये समावेश करण्यात आला आहे. हुसैन, बेंद्रे, रा. चि. ढेरे, अनिल धारकर यांच्या मुलाखती, चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या डायरीतील नोंदी तसेच जेजेतल्या दिवसांविषयी प्रमिला दंडवते, दामू केंकरे, मोहन वाघ, रघुवीर तळाशिलकर, मंगेश कुलकर्णी, पुरूषोत्तम बेर्डे, नाना पाटेकर अशा नामवंतांनी सांगितलेल्या आठवणीही या ‘निवडक चिन्ह’चे खास वैशिष्टय़ आहे. ‘निवडक चिन्ह’ची मूळ किंमत सहाशे रुपये असून १७ जानेवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये नोंदणी करणाऱ्या वाचकांसाठी तो ४०० रुपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. आयडियल, मॅजेस्टिक, मॅजेस्टिक एजन्सी, जवाहर, शब्द, पीबीएच, अक्षरधारा, रसिक साहित्य इत्यादी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर इत्यादी प्रमुख ग्रंथ विक्रेत्यांकडे वाचकांना या योजनेची नावनोंदणी करता येईल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९००४०३४९०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.