Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

अनिता उद्दैया अखेर घरी परतली!
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 
मुंबईवर हल्ला चढविणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी सहा जणांना समुद्रमार्गे बधवार पार्क येथे येताना सर्वप्रथम पाहणारी अनिता उद्दैया ही महिला रविवारी ज्याप्रमाणे अचानक बेपत्ता झाली. तेवढय़ाच अचानकपणे ती मंगळवारी मध्यरात्री घरीही परतली. अर्थात ती परतली असली तरी या संपूर्ण प्रकरणातील गूढ संपलेले नाही. अनिता रविवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली आणि मग उलटसुलट चर्चेला उधाण आले. गायब होण्याच्या आठवडाभर आधी तिने आपल्याला ‘कोणीतरी न्यायला येणार असून त्यांच्यासोबत मला जावेच लागेल’, असे सांगितल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला. तर या घटनेविषयी पोलिसांनी मौन बाळगल्याने पोलिसांनीच सुरक्षेच्या कारणास्तव तिला सुरक्षित स्थळी हलविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. इंग्रजी वृत्तपत्रांनी तर ती थेट अमेरिकेला गेल्याचा जावईशोध लावला आणि तशा बातम्याही प्रसिद्ध केल्या! ‘एफबीआय’चे अधिकारी तिला चौकशीसाठी अमेरिकेला घेऊन गेले आणि ते त्यासाठी तिला १० हजार डॉलर म्हणजे पाच लाख रुपये देणार होते, असे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र या तर्कवितर्काना फाटा देत अनिता मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक घरी परतली. तिच्या परतण्याचे वृत्त समजताच मीडिया तिच्या घरी पोहोचला. मात्र त्या आधीच पोलिसांनी तिचे घर गाठून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे ‘अनिताबाबत नेमके काय झाले होते’ हे निश्चित कोणालाही कळू शकले नाही. दरम्यान, अनिता बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी बाळगलेले मौन आज उघडत अनिताचे कोणीही अपहरण केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मीडियाच्या ससेमिऱ्यापासून सुटका करून घेण्यासाठी ती सातारा येथे आपल्या भावाकडे काही दिवसांकरिता निघून गेली होती आणि त्याला भेटून मंगळवारी परतली, असा खुलासाही केला. याप्रकरणी तिचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र अनिता रविवारी दुधाच्या टँकरमधून साताऱ्याला गेली आणि त्याच टँकरमधून मुंबईला परतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र तिने अशाप्रकारे प्रवास करण्याचे काय कारण होते, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.