Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्याच गाडीची!चोरी
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 

मुंबईत गाडय़ा चोरीचे प्रमाण वाढलेले असून या गाडी चोरांचा अतिरिक्त पोलीस महासंचालक अहमद जावेद यांनाच फटका बसला. जावेद यांची कार्यालयीन ‘बोलेरो’ जीप ते राहत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वसाहतीबाहेरून चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. २६/११ नंतर शहरभर ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे चोरीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा या घटनेने बोजवारा उडाल्याची चर्चा आहे.
जावेद यांना गेल्याच महिन्यात कार्यालयीन कामकाजासाठी पांढऱ्या रंगाची ‘बोलेरो’ गाडी देण्यात आली होती. परंतु या गाडीवर पोलीस किंवा पोलिसांच्या गाडय़ांवर असलेले कोणतेच चिन्ह नव्हते. या प्रकरणाचे तपास अधिकारी सुधीर गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे अकरा-पावणे बाराच्या सुमारास जावेद यांनी गाडीचा चालक सचिन आखाडे याला कार्यालयातून काही महत्त्वाच्या फाईल्स घरी घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार आखाडे त्या फाईल्स घेऊन मरिन ड्राईव्ह येथील दिनशॉ वाच्छा रोडवरील ‘यशोधन’ इमारतीतील जावेद यांच्या घरी पोहोचला. त्याआधी त्याने कार्यालयीन कामासाठी देण्यात आलेली ‘बोलेरो’ इमारतीच्या बाहेर उभी केली होती.
मात्र जावेद यांच्या घरी त्याला बराच उशीर झाल्याने रात्री तो कंपाऊंडमध्येच झोपला. सकाळी उठल्यावर गाडी घेण्याकरिता तो गेला असता गाडी गायब झाली. वाहतूक पोलीस गाडी घेऊन गेल्याचा संशय आल्याने त्याने त्याबाबतही चौकशी केली. मात्र गाडीचा काहीच थांग पत्ता लागला नाही. अखेर त्याने यशोधन इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांत गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यासमोरूनही पोलिसांची महिंद्रूा बोलेरो गाडी चोरटय़ांनी पळवली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस ठाण्यांसमोरून पोलिसांच्याच गाडय़ा आणि त्याही एकाच मॉडेलच्या गाडय़ा चोरीला गेल्याने केवळ पोलिसांच्या गाडय़ा चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.