Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

पुनर्मुद्रित होणार ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’!

 

शेखर जोशी
मुंबई, १४ जानेवारी
शतकापूर्वी झालेली ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ पुनर्मुद्रित होणार !
पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन संत तुकाराम यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे गणेश हरी केळकर व प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाहीत. या पुस्तकाचे संदर्भमूल्य आणि अभ्यासकांच्या दृष्टीने त्याची असलेली उपयोगिता लक्षात घेऊन साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
साहित्य अकादमीतर्फे येत्या १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यात हे दोन्ही खंड प्रकाशित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे चर्चासत्र ‘सिंगिंग वर्ड-संत तुकाराम अ‍ॅण्ड द भक्ती ट्रॅडिशन’ या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. संत तुकाराम यांच्या चारशेव्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे साहित्य अकादमीच्या पश्चिम विभागाचे सचिव के. एस. राव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पुण्यातील डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गणेश हरी केळकर, वासुदेव बळवंत पटवर्धन, का. बा. मराठे आदी काही जाणकार मंडळी दररोज पुण्यात एकत्र जमायची आणि त्यांच्यात संत तुकाराम यांच्या अभंगांवर चर्चा व्हायची. त्या चौदा वर्षांत तुकाराम गाथेतील जवळपास १ हजार ८०० अभंगांवर चर्चा झाली होती. दर शुक्रवारी ही मंडळी एकत्र जमायची आणि गाथेतील एकेका अभंगांवर चर्चा व्हायची. त्यातील साडेसातशे अभंगांची टिपणे आणि इतिवृत्तावरून पटवर्धन आणि केळकर यांनी ‘तुकारामाच्या अभंगांची चर्चा’ असे दोन खंड तयार केल्याची माहिती साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य आणि पुनर्मुद्रित करण्यात येणाऱ्या या खंडांसाठी प्रस्तावना लिहिणारे दिलीप धोंडगे यांनी दिली. ही सर्व मंडळी प्रार्थना समाजाची होती. त्यांनी तुकाराम चर्चा मंडळ स्थापन केले होते. त्या काळी या सर्व जाणकार मंडळींनी तुकाराम यांच्या अभंगांबाबत हे फार मोठे काम करून ठेवले आहे. आजही ते काम महत्त्वाचे असून आजच्या पिढीलाही हे दोन्ही खंड अभ्यासायला मिळावेत, त्या उद्देशानेच साहित्य अकादमी ते पुनर्मुद्रित करत असल्याचे धोंडगे म्हणाले.