Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

ओळखपत्रांसाठी छायाचित्रांचा भरुदड मतदारांच्या माथी!
संतोष प्रधान
मुंबई, १४ जानेवारी

 

मतदार ओळखपत्रांसाठी राज्यात गेले १० ते १२ वर्षे सुरू असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. ओळखपत्रे तयार करण्यासाठी निवडणूक विभागाने मतदारांची छायाचित्रे काढण्याची मोहीम हाती घेतली खरी पण त्याला मतदारांकडून फारच अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निवडणूक विभागाने आता थेट मतदारांकडून दोन छायाचित्रे घेण्यास सुरुवात करून एका प्रकारे मतदारांवरच भुर्दंड टाकला आहे. मतदार ओळखपत्रांसाठी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मोहीम राबविण्यात आली होती. तेव्हा मतदारांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र मतदार ओळखपत्रे तयार करण्याचे काम दिलेल्या ठेकेदारांनी गोंधळ घातला. ओळखपत्रे तयार झाली खरी, पण त्यावर नाव एकाचे तर छायाचित्र भलत्याचे तर काही ओळखपत्रांवर चेहरे ओळखू येणार नाहीत, अशी छायाचित्रे निघाली. ओळखपत्रे तयार करण्यासाठी घेतलेली मोहीम तसेच शासनाचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले. त्यानंतर १० ते १२ वर्षे ओळखपत्रे तयार करण्याची मोहीम राबविली गेलीच नाही. दोन वर्षांंपूर्वी निवडणूक विभागाने पुन्हा मतदार ओळखपत्रांसाठी नव्याने मोहीम हाती घेतली. मात्र त्यातही गोंधळ सुरू आहे. राज्यातील सुमारे सात कोटी मतदारांपैकी अडीच कोटी मतदारांची ओळखपत्रे तयार झाल्याचा निवडणूक विभागाचा दावा आहे. उर्वरित ओळखपत्रे तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यासाठी मतदान केंद्रांवर छायाचित्रे काढण्यासाठी येण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. मात्र या मोहिमेला फारच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईत तर जेमतेम २० टक्के मतदारांनी या मोहिमेस प्रतिसाद दिला होता. अन्य भागातही चित्र फारसे वेगळे नाही. मतदार छायाचित्रे काढण्याकरिता पुढे येत नसल्याने आता मतदारांकडूनच छायाचित्रे जमा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात मतदार ओळखपत्रे तयार झालेली नाहीत त्या मतदारांची यादी तयार करून मतदारांच्या निवासस्थानी फॉर्म पाठविण्यात येत आहे. त्यावर दोन छायाचित्रे चिकटवून तो फॉर्म मतदान केंद्रांवर नेऊन द्यायचा आहे. ओळखपत्रांसाठी मतदारांनीच छायाचित्रे द्यावीत, अशी मोहीम राबविण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाचे सहमुख्य अधिकारी शेखर चन्न्ो यांनी सांगितले. याबरोबरच छायाचित्रे काढण्याची मोहीम सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मतदार ओळखपत्रांसाठी दोन छायाचित्रे काढण्याचा खर्च मतदारांच्या माथी मारण्यात येऊ लागल्याने गरीब, झोपडपट्टी परिसरात त्याला प्रतिसाद मिळणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.