Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

आता उद्यानांच्या सुशोभिकरणावरून शिवसेना-मनसे आमनेसामने
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 

‘म्हाडा’ची घरे मराठी माणसालाच मिळाली पाहिजेत अशी भूमिका शिवसेना आणि मनसेने घेतली असल्याने नक्की श्रेय कोणाला मिळणार याची ‘लॉटरी’ फुटण्यास अद्याप बराच कालावधी असतानाच आता दादर, माहीम, प्रभादेवी परिसरातील उद्यानांच्या सुशोभिकरणावरून या दोन्ही पक्षांमध्ये नव्याने जुंपण्याची लक्षणे दिसत आहेत. मुंबईतील उद्यानांची दुरवस्था झाली आहे, अनधिकृत बांधकामांनी मैदाने बळकावलेली आहेत या प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना शिरसावंद्य मानून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर, प्रभादेवी, माहीम परिसरातील कार्यकर्त्यांनी कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली. संत ज्ञानेश्वर उद्यान, बाजी प्रभू उद्यानाचे होत असलेले सुशोभिकरण आणि वीर कोतवाल उद्यान आणि विवेकानंद उद्यानाचे होऊ घातलेले सुशोभिकरण ही या कार्यकर्त्यांनी उचललेल्या पावलांची परिणती असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या कामांना वाढता प्रतिसाद मिळाल्याचे पाहताच शिवसेनेने त्याचे श्रेय लाटण्याचा आता खटाटोप सुरू केल्याचा आरोप मनसेने केला आहे. उद्यानाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी सहाय्यक आयुक्तांपासून ते पालिका आयुक्तांपर्यंत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि त्याचे फळ म्हणून अंदाजपत्रकामध्ये निधी मंजूर करण्यात आला, असे मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. आता शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधीतून काही निधी देण्याची तसदी घेतली हे जनता आणि मनसेच्या दडपणामुळे केले आहे. परंतु मूळ खर्च हा महानगरपालिकेच्या केंद्रीय निधीतून होत आहे, याकडेही मनसेने लक्ष वेधले आहे. यापैकी एका उद्यानाच्या बाजूला शिवसेना नेते मनोहर जोशी राहत असूनही त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही, याबद्दलही मनसेने आश्चर्य व्यक्त केले आहे. प्लाझा चित्रपटगृहासमोरील कोतवाल उद्यान आणि माहीम येथील विवेकानंद उद्यान यांच्या सुशोभिकरणासाठी किल्लेदार यांनी गिरीश धानूरकर, श्रीकांत भोईटे, वैभव ठाकूर केदार ठाकूर, यश गोडबोले यांच्यासह पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेटही घेतली असून त्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करून घेतली आहे. उद्यानांचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कोणी केला याची जनतेला जाणीव आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे मनसेचे म्हणणे आहे.