Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

पोलिसाच्या हत्येच्या आरोपावरून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या चालकाला अटक
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 

शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा सूड उगवण्यासाठी शेजाऱ्यासोबत दोन पोलिसांना गाडीने ठोकर देऊन एका पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या चालकाला अटक आज केली. ही घटना मंगळवारी रात्री बांगूर नगर परिसरात घडली. या अपघातात एका पोलिसासह आणखी चार जण जखमी झाले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलेश मौर्य (२३) असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेशचे काही दिवसांपासून शेजारी लालजी यादव याच्याशी विम्याच्या पैशांवरून वाद सुरू होता. मंगळवारी त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर यादवने कमलेशविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. आपण अनुराग कश्यपचे चालक असल्याचा धाक दाखवून कमलेशने आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेऊ नये म्हणून पोलिसांना दमटावलेही. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही व पोलीस शिपाई जीतेंद्र मानाजी पवार यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. त्याचा राग म्हणून सुटका झाल्यावर कमलेशने त्यांच्यावर सूड उगविण्याचे ठरविले. तक्रार दाखल केल्यावर यादव हा पवार आणि आणखी एक पोलीस शिपाई संजय सोनावणे (२९) यांच्यासोबत पोलीस ठाण्यासमोर उभे होता. त्यानंतर त्यांच्यासोबत तो तेथून बांगूर नगरर्प्यत चालत जात असता कमलेशने आपली ‘टवेरा’ गाडी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने नेत त्यांना ठोकर दिली. या ठोकरीमध्ये पवार यांचा जागीत मृत्यू झाला, तर सोनावणे, यादव आणि यादवचे नातेवाईक बिरबल यादव, संतोष यादव व सिकंदर यादव हे जखमी झाले. पोलिसांनी कमलेशला तात्काळ अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.