Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
प्रादेशिक

पुनर्मुद्रित होणार ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’!
मुंबई - पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन संत तुकाराम यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे गणेश हरी केळकर व प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाहीत. या पुस्तकाचे संदर्भमूल्य आणि अभ्यासकांच्या दृष्टीने त्याची असलेली उपयोगिता लक्षात घेऊन साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे

ओळखपत्रांसाठी छायाचित्रांचा भरुदड मतदारांच्या माथी!
संतोष प्रधान
मुंबई, १४ जानेवारी

मतदार ओळखपत्रांसाठी राज्यात गेले १० ते १२ वर्षे सुरू असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. ओळखपत्रे तयार करण्यासाठी निवडणूक विभागाने मतदारांची छायाचित्रे काढण्याची मोहीम हाती घेतली खरी पण त्याला मतदारांकडून फारच अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निवडणूक विभागाने आता थेट मतदारांकडून दोन छायाचित्रे घेण्यास सुरुवात करून एका प्रकारे मतदारांवरच भुर्दंड टाकला आहे. मतदार ओळखपत्रांसाठी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मोहीम राबविण्यात आली होती. तेव्हा मतदारांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र मतदार ओळखपत्रे तयार करण्याचे काम दिलेल्या ठेकेदारांनी गोंधळ घातला.

आता उद्यानांच्या सुशोभिकरणावरून शिवसेना-मनसे आमनेसामने
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

‘म्हाडा’ची घरे मराठी माणसालाच मिळाली पाहिजेत अशी भूमिका शिवसेना आणि मनसेने घेतली असल्याने नक्की श्रेय कोणाला मिळणार याची ‘लॉटरी’ फुटण्यास अद्याप बराच कालावधी असतानाच आता दादर, माहीम, प्रभादेवी परिसरातील उद्यानांच्या सुशोभिकरणावरून या दोन्ही पक्षांमध्ये नव्याने जुंपण्याची लक्षणे दिसत आहेत. मुंबईतील उद्यानांची दुरवस्था झाली आहे, अनधिकृत बांधकामांनी मैदाने बळकावलेली आहेत या प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना शिरसावंद्य मानून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर, प्रभादेवी, माहीम परिसरातील कार्यकर्त्यांनी कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली.

पोलिसाच्या हत्येच्या आरोपावरून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या चालकाला अटक
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा सूड उगवण्यासाठी शेजाऱ्यासोबत दोन पोलिसांना गाडीने ठोकर देऊन एका पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या चालकाला अटक आज केली. ही घटना मंगळवारी रात्री बांगूर नगर परिसरात घडली. या अपघातात एका पोलिसासह आणखी चार जण जखमी झाले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलेश मौर्य (२३) असे या चालकाचे नाव आहे.

शिवाजी पार्कवर अन्य कार्यक्रम नको; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

दादरच्या शिवाजी पार्कचा वापर केवळ क्रीडांगण तसेच राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी व्हावा. त्याखेरीज अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करील, असा इशारा आज शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिला. जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जी उत्तर विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांची भेट घेऊन त्यांना या विषयाबाबतचे निवेदन दिले. शिवाजी पार्कचा वापर पालिका नियमांचे उल्लंघन करून विविध कारणांसाठी केला जात आहे. मात्र खेळ व जाहीर सभा यापलीकडे कोणत्याही कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कची परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. शिवाजी पार्कवर भव्य सेट्स उभारून विविध कार्यक्रम केल्याने मैदानाचे नुकसान होत असून शिवाजी पार्कवर खेळांसाठी येणाऱ्यांना या कार्यक्रमांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे आल्याचे जोशी यांनी सांगितले. कोणाच्याही सोयीसाठी म्हणून पालिकेचे नियम बदलण्यात येऊ नयेत, केवळ क्रीडा आणि क्रीडा महोत्सव व सायंकाळच्या सभा वगळून अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केल्याचे जोशी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उध्दव एकत्र येणार?
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी असलेल्या महत्वाकांक्षी मध्य वैतरणा प्रकल्पाच्या धरणाचे भूमीपुजन २२ जानेवारी रोजी आहे. कें द्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, महापौर शुभा राऊळ, पालिका आयुक्त जयराज फाटक आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबईची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य वैतरणा धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन हजार कोटींचा हा प्रक ल्प असून २०११ सालापर्यंत हा प्रक ल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे उदिष्टय़ आहे. मध्य वैतरणा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला दररोज किमान ४५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळू शकेल. सध्या मुंबईला तीन हजार ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र मुंबईची वाढती लोकसंख्या आणि उंच इमारतींचे वाढलेले प्रमाण यामुळे मिळणारे पाणी अपुरे पडते. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मध्य वैतरणा धरणाचे काम सुरू करण्यात आले. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणूका होतील असा अंदाज असल्याने आचारसंहिता लागू होण्याआधी महत्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन, उदघाटन करून घेण्याची तयारी राजकीय नेत्यांनी चालवली आहे.

चोरीच्या गाडीसह दोन गाडीचोरांना २४ तासांत अटक
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

अंधेरी येथील चार बंगला परिसरातून चोरीला गेलेली नवी कोरी पाजेरो गाडी २४ तासांत चोरटय़ांकडून पुन्हा ताब्यात मिळविण्यात सहाय्यक आयुक्त दिलीप सूर्यवंशी यांच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दोन अट्टल गाडीचोरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गाडीचोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सोसायटीत काम सुरू असल्यामुळे चार बंगला येथील गोल्डन अपार्टमेंटबाहेर ही गाडी उभी करण्यात आली होती. काल सकाळी सातच्या सुमारास ही गाडी चोरीला गेली. याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहाय्यक आयुक्त सूर्यवंशी यांच्या पथकातील तावडे, बोरसे, जाधव या पोलिसांनी माहिती मिळवून ही गाडी मुंबईबाहेर विक्रीसाठी जाण्याआधीच शकीरअली लियाकत अली कुरेशी (४४) व गुलशन मझहर अली (३४) या दोघा अट्टल गाडीचोरांना पाजेरो गाडीसह अटक केली. कुरेशी ९ जानेवारी रोजी तीन वर्षांंची सजा भोगून आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर लगेचच गुलशनच्या मदतीने त्याने पाजेरो गाडीची चोरी केली. कुरेशी तसेच गुलशनवर गाडीचोरीचे यापूर्वी १५ ते १६ गुन्हे दाखल झाले आहेत. याआधीही वर्सोवा पोलिसांनी गाडीचोरांची एक टोळी जेरबंद केली होती. या टोळीचा म्होरक्या फिरोज याच्या चौकशीत हैदराबाद येथील अमीन, समीर आणि फारूख या चोरीच्या गाडय़ा विकत घेणाऱ्या टोळीचा परदाफाश करता आला होता. या टोळीकडून १६ चोरीच्या गाडय़ा हस्तगत करण्यात आल्या होत्या.

डोंबिवलीत गोळीबार
मुंबई, १४ जानेवारी / वार्ताहर

येथील स्टार कॉलनीत स्थायी समिती सभापती रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयासमोर आज रात्री गोळीबाराची घटना घडून एक अनोळखी व्यक्ती जखमी झाली. जखमी व्यक्तीला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्र चव्हाण यांचे मित्र अशोककुमार चौबे हे त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी आले होते. बैठकीनंतर चौबे घराबाहेर पडत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर सोडावाटरच्या बाटल्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चव्हाण यांनी आपले रिव्हॉल्वर बाहेर काढून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हे रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न एकाने केला. या झटापटीत एक गोळी सुटली व दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या पायात घुसली.

म्हाडा घरांसाठी आजही ९९ हजार अर्जाची विक्री
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

म्हाडाच्या फक्त तीन हजार ८६३ घरांसाठी आतापर्यंत तीन दिवसांत दोन लाख ८९ हजार ६५७ अर्जांची विक्री झाली आहे. आज ९९ हजार ६९५ अर्जांची विक्री झाली. अर्जविक्रीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता ३० जानेवारीपर्यंत अर्ज मिळावेत यासाठी आवश्यक ते उपाय योजण्यात आल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांनी आज पुन्हा सांगितले. अर्ज सादर करण्यासाठी लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एचडीएफसी बँकेला दोन ते तीन काऊंटर उघडण्यास सांगण्यात आले आहे.
तीन दिवसांत तीन लाख अर्जाची विक्री झाली असली तरी येत्या दोन-तीन दिवसांनंतर अर्जविक्री रोडावेल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. अर्जविक्रीचा वेग चांगला असला तरी गेल्या तीन दिवसांत ७१९ अर्ज दाखल झाले आहेत. हे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे, असेही जावळे यांनी सांगितले. अर्जासोबत दोन फोटो, अनामत रक्कम सादर करावयाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. घरांसाठी कुणी दलाल आमीष दाखवीत असल्यास त्याबाबत म्हाडाच्या दक्षता विभागाकडे तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रिलायन्सच्या डहाणू वीजनिर्मिती केंद्राला ‘श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार २००७’
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सन २००७ चा उत्पादन वर्गातील ‘श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार २००७’ रिलायन्सच्या डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला बहाल केला आहे. सुरक्षितता आणि व्यावसायिक आरोग्य या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य त्याचप्रमाणे त्या संदर्भातील उच्च दर्जाच्या विविध प्रणाली व कार्यपद्धतीचा अंगिकार केल्याबद्दल या केंद्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या वर्षी हा बहुमान प्राप्त करणारे डहाणू औष्णिक केंद्र हे एकमेव औष्णिक वीजनिर्मिती केंद्र ठरले आहे. यंदा उत्पादन वर्गात २६४ उद्योगांनी अर्ज केले होते. त्यापैकी ११७ उद्योग ७५ टक्क्यांवर गुण मिळविण्यात यशस्वी ठरले. डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राला ९३.९१ टक्के इतके गुण मिळाले. आतापर्यंत या केंद्राला एकूण नऊ विविध पुरस्कार मिळाले आहेत. दर्जा, पर्यावरण व्यावसायिक आरोग्य व सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रातील प्रमाणपत्र मिळविणारे डहाणू केंद्र हे एकमेव वीजनिर्मिती केंद्र आहे.

‘तारे’ ऑस्करमधून बाद
मुंबई, १४ जानेवारी / पी.टी.आय.

आघाडीचा अभिनेता आमिर खान आणि बालकलाकार दर्शिल सफारी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तारे जमीपर’ हा बहुचर्चित चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत निराशा पसरली आहे. हा चित्रपट ‘ऑस्कर’मधून बाद झाल्याचे दु:ख आमिर खानला झाले आहे. हा चित्रपट माझ्यासाठी विशेष असाच आहे. या चित्रपटाशी माझे भावनिक नाते जुळलेले आहे. भारतीय प्रेक्षकांनीच नव्हे तर विदेशातील लोकांनीही या चित्रपटासाठी मला दाद दिली आहे, असे आमिर खान याने बंगलोरमधून प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. अकॅडमी ज्युरींना अन्य नऊ चित्रपट अधिक आवडले असावेत. तो त्यांचा निर्णय आहे. परंतु, भारतीय प्रेक्षकांची पावती माझ्या दृष्टीने मोठी असून त्यासाठी मी प्रेक्षकांचे आभार मानतो, असे आमिर खानने पुढे म्हटले आहे. आमिर खान सध्या ‘३ इडियट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘तारे जमीपर’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर झाल्याचे कळल्यानंतर त्याने हे निवेदन प्रसिद्धीस दिले.

वसंतराव मराठे यांचे निधन
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव मराठे यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. संघाचे मुंबई महानगर कार्यवाह म्हणून मराठे यांनी दीर्घकाळ काम केले. रा. स्व. संघ व संघसंबंधित अन्य संस्थांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी कुशलतेने सांभाळली होती. आणीबाणीत मराठे यांनी महत्त्वाची कामगिरी केली. मालाड येथील उत्कर्ष मंदिर शाळा चालविणाऱ्या शिक्षण मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार माधवराव मराठे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. मराठे यांच्या अंत्ययात्रेस राम नाईक, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, औदुंबर भांगे, राजाभाऊ दामले आदी मान्यवर उपस्थित होते.