Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

गेट.. सेट..
प्रतिनिधी

सोमणांचा मिलिंद, अंबानींचा अनिल, तळपदेंचा श्रेयस, रामपालांचा अर्जुन, पाठकांचा विनय, बोसांचा राहुल, एवढेच नव्हे तर ठाण्यातील काही डॉक्टर मंडळी गेल्या काही दिवसांपासून धावण्याचा सराव करीत आहेत. मिलिंद तर जलतरणपटू आहे. अनिल अंबानीसुद्धा रोज धावतात, श्रेयसने ‘इक्बाल’च्या वेळी घेतलेले परिश्रम आणि सराव त्याला यावेळी कामी येणार आहे. राहुल बोस रग्बीपटू आहे, त्यामुळे धावताना दमछाक होण्याचा त्याला प्रश्नच नाही. विनय पाठक मात्र जास्त श्रम करतोय, रोज सकाळी ट्रेडमिलवर त्याचा सराव सुरू आहे. आता फक्त ‘गो’ म्हणायचा अवकाश आहे. ‘मुंबई रन्स टू सिक्युअर इट्स फ्युचर’ हे ब्रीदवाक्य घेऊन या सेलिब्रिटींसोबत तब्बल ३५,४५० जण येत्या १८ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

राज्यातील ६५ टक्के शाळा मुख्याध्यापकांविना
पदभरतीची जबाबदारी शासनाने झटकली

* शाळेचा कारभार काळजीवाहू मुख्याध्यापकाकडे
* विद्यार्थ्यांच्या भवितव्याला शासन धोरणाचा फटका
* सर्व शिक्षा अभियानही वेठीस
प्रतिनिधी

राज्यातील तब्बल ६५ टक्के शाळांना मुख्याध्यापक नसल्याचे ‘मॅशिअल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या शाळांची अवस्था कप्तान नसलेल्या जहाजासारखी झाली असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. काळजीवाहू मुख्याध्यापकांच्या हातात शाळांचा कारभार सोपवून राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप ‘राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समिती’ने केला आहे.

बटण दाबताच मिळणार मुंबईकरांना तात्काळ मदत!
शशिकांत कोठेकर

तुमच्या घरात चोर शिरले, तुम्ही राहता त्या इमारतीला किंवा कार्यालयाला अचानक आग लागली तर, गोंधळून जाण्याची गरज नाही. बस.. एक बटण दाबल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने पोलिस, अग्निशमन यंत्रणा, पालिकेचा आपत्कालिन कक्ष या साऱ्यांना लगेच संदेश जाईल आणि सर्व बाजूनी मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा प्रयोग तूर्त पालिकेच्या मुख्यालय व इतर इमारतींमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून नंतर हॉटेल्स, रूग्णालये, गृहनिर्माण संस्था यांनाही या सेवेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. उपग्रहांद्वारे इमारतींमध्ये संपर्क व्यवस्था कार्यान्वित करून त्यामुळे इमारतीत बसविलेल्या यंत्रणेतील बटण दाबताच पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला त्याबाबत संदेश पाठविला जाईल, अशी या व्यवस्थेतील कार्यपद्धती राहणार आहे.

टॅक्सींमधील ‘लॉग बुक’ इतिहासजमा आणि प्रशिक्षणाची वानवा
कैलास कोरडे

मुंबईतील टॅक्सी उद्योगाची व्याप्ती पाहता शहरात ५५ हजार टॅक्सी आणि सुमारे दीड लाख चालक आहेत. टॅक्सी युनियनकडून प्रत्येक वेळी ही आकडेवारी सर्रासपणे सांगितली जाते. मात्र परिवहन विभागाकडे केवळ ५५ हजार टॅक्सी परवानाधारकांचीच माहिती उपलब्ध आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या उर्वरित लाखभर टॅक्सी चालकांविषयीच्या माहितीचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शहरातील एकूण टॅक्सींपैकी ६० टक्क्यांहून अधिक टॅक्सी दररोज दोन पाळ्यांमध्ये चालविल्या जातात. उर्वरित टॅक्सी एक अथवा तीन पाळ्यांमध्ये चालविल्या जातात. त्यामुळे शहरातील टॅक्सी चालकांची संख्या सहज दीड लाखांच्या घरात असू शकते. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एक प्रमुख अंग असलेल्या टॅक्सीविषयक माहितीची नोंद परिवहन विभागाकडून अजिबात ठेवली जात नाही.

सुविधा की क्रूर थट्टा?
गर्दीच्या वेळी मुंबईतील लोकलमध्ये जितके प्रवासी बसलेले असतात; त्याहून दुप्पटीने जास्त प्रवासी उभ्याने ताटकळत प्रवास करतात. लोकलमध्ये शिरकाव मिळाला म्हणून भाग्यवंत ठरणारे थोडेच असतात. अनेकांच्या नशिबी दरवाजातील लटकंतीच येते. ट्रकमध्ये कोंबून खाटिकखान्यांत नेण्यात येणाऱ्या जनावरांनासुद्धा याहून चांगला प्रवास घडतो. मुंबईकरांना वर्षांच्या बारामाही घडणाऱ्या या प्रवासासाठी अमानवीय हा शब्दसुद्धा थिटा वाटतो. तरीही सहनशील मुंबईकरांकडून फारशी खळखळ केली जात नाही. मात्र लोकलमध्ये एलसीडी स्क्रीनची नवी सुविधा उपलब्ध करून देताना पश्चिम रेल्वेने एकप्रकारे मुंबईकरांची क्रूर थट्टा केली आहे. पश्चिम रेल्वेने लोकलमध्ये उपलब्ध करून दिलेली नवी सोय म्हणजे मधुमेह झालेल्या एखाद्या व्यक्तीसमोर जिलेबीचे ताट वाढण्याजोगा प्रकार आहे.

मृत कर्मचाऱ्याच्या थकित कर्जापोटी जामीनदाराचा पीएफ रोखला!
प्रतिनिधी : नोकरीत असताना सहकारी कर्मचाऱ्याला गृहकर्जासाठी जामीन म्हणून राहिल्याची फार मोठी किंमत वसंत रावजी कांबळे यांना सेवानिवृत्तीनंतर चुकवावी लागत असून त्या थकित कर्जापोटी त्यांचा भविष्यनिर्वाह निधीच रोखून धरण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत एक साऊथ (परेल) विभागात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कार्यरत असणारे वसंत कांबळे २२ वर्षांंच्या सेवेनंतर १ मार्च २००७ रोजी निवृत्त झाले. सेवेत असताना मुरलीधर नाडे या सहकाऱ्याला सव्वालाख रुपयांच्या गृहकर्जासाठी ते जामीन राहिले होते. काही हप्ते फेडल्यानंतर मुरलीधर नाडे यांचे निधन झाले.

लोकसत्ता आणि श्री समूह आयोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा २००९ मार्गदर्शन शिबीर
प्रतिनिधी : राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर युवकांमध्ये प्रवेश अर्ज मिळवून परीक्षा केंद्रांमध्ये अर्ज सादर करण्यासाठी धावपळ होत असते. एकदा प्रवेशअर्ज प्रक्रिया संपली की मग प्रतीक्षा असते ती आसन क्रमांक मिळण्याची. या प्रतीक्षेमध्ये परीक्षापूर्व तयारी करण्यासाठी वेळ अपुरा पडतो, अशा वेळी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासवर्गाची शोधाशोध सुरू होते. राज्यसेवा पूर्वपरीक्षा २००९, परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’ आणि श्री समूह राज्यसेवा पूर्वपरीक्षा २००९ (एमपीएससी) करिअर मार्गदर्शन शिबिराचे शनिवार, १७ जानेवारी २००९ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत आयोजित केले आहे.

‘भारतीय व्यवस्थापनशास्त्र पाश्चिमात्यांना वस्तुपाठ’
प्रतिनिधी : भारतीय व्यवस्थापनशास्त्र प्राचीन आहे. रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद आदींच्या विचाराने ते समृद्ध झाले आहे, आगामी काळात भारत महासत्ता होणार असल्याने हे विचारधन पाश्चिमात्त्य देशांसाठी आदर्श वस्तुपाठ होणार असल्याचे प्रतिपादन आय. टी.तज्ज्ञ दीपक घैसास यांनी सोमवारी पार्ले येथे केले.
लोकमान्य सेवा संघ- पार्ले या संस्थेच्या वतीने पार्ले टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवर्य मा. सी. पेंढारकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. स्नेहलता देशमुख होत्या.

‘प्रात:स्वर’मध्ये श्वेता हट्टंगडी-किलपाडी गाणार
१८ जानेवारी रोजी पहाटे रवींद्र नाटय़मंदिर येथे खास सोहळा

प्रतिनिधी : मुंबईतील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे चाहते आणि त्यातील तज्ज्ञ यांना श्वेता हट्टंगडी-किलपाडी या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिकेच्या गाण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. प्रभातसमयी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रात:स्वर’मध्ये १८ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरशेजारी कलाअकादमीच्या खुल्या प्रांगणात हा सोहळा रंगणार आहे. त्यांना हार्मोनियमवर निरंजन लेले आणि तबल्यावर उत्पल दत्त यांची साथ लाभणार आहे.

सागर कातुर्डे पहिल्याच प्रयत्नात ‘भारत श्री’
अलीकडेच पुण्यात झालेल्या ४७ व्या सीनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बोवलेकर सरांच्या सागर कातुर्डे या शिष्याने पहिल्याच प्रयत्नात ‘भारत श्री’ किताबाला गवसणी घातली. जबरदस्त थाइजमुळे त्याच्या ७० किलो वजनी गटात त्याला तोडच नव्हती आणि स्पर्धेसाठी स्टेजवर उतरताच त्याने समग्र प्रेक्षकांप्रमाणेच साऱ्या प्रशिक्षकांकडूनही अनुकूल कौल मिळविला. मरोळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या युवकाने अत्यंत गरीबीतही निव्वळ मेहनतीच्या बळावरच हा पराक्रम केला. ज्या संदीप वालावलकरला पाहून त्याने शरीरसौष्ठवाचे धडे गिरविले तोदेखील त्या स्पर्धेत होता आणि त्याला उत्तेजन देत होता. गटविजेत्या झाल्यानंतर त्यानेच सागरला सांगितले, की तू पहिल्याच प्रयत्नात ‘भारत श्री’ किताब मिळवून कमालच केली आहेस. कारण मलादेखील हा किताब पाच वेळा प्रयत्न केल्यानंतरच मिळाला. त्याच्या या उद्गारांनी सागरचा उत्साह अधिकच वाढवला.
सागरला व्यायामाचे बाळकडू घरातूनच मिळाले. अलाहाबाद बँकेत काम करणाऱ्या त्याच्या वडिलांना व्यायामाची आवड होती. त्यामुळे आपल्या मुलानेही व्यायामात रस घ्यावा, असे त्यांना वाटायचे. झोपडपट्टीत राहत असल्याने व्यायामाची आवड निर्माण झाली तर अन्य मुलांच्या संगतीने किमान वाईट व्यसनांच्या नादी तो लागणार नाही यासाठी त्यांचा आटापिटा होता.

मिठी नदीचा विकास पूर थांबविणार का?
तज्ज्ञांना शंका

प्रतिनिधी : मुंबईला असलेला पुराचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या मिठी नदी विकास प्रकल्पामुळे पूरचा धोका कमी होत नाही, तर धोका अधिकच वाढण्याची शक्यता आहे, असे मत पाणीतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले आहे. राजेंद्र सिंग यांनी अलीकडेच मिठी नदीची पाहणी करून तिला वाचविण्याचे आवाहन मुंबईकरांना केले.
राजेंद्र सिंग यांनी राजस्थानमध्ये दुष्काळी विभागात जलंसवर्धनाचे महत्त्वाचे कार्य केले आहे. मुंबईतील काही कार्यकर्त्यांनी अलीकडेच त्यांची मुंबई भेट आयोजित केली होती. त्यांनी पवईपासून ते माहीम कॉजवेपर्यंत मिठी नदीची पाहणी केली. मिठी नदीच्या परिसरातील लोकांशी त्यांनी चर्चा केली. मिठी नदीच्या परिसरात राहणारे मुंबईकर पूराच्या धोक्यामुळे भयग्रस्त झाले आहेत. राज्य सरकार मात्र मिठी नदीसोबत खेळ करीत आहे. नदीच्या परिसरातील तलावांवर अतिक्रमणे झालेली आहेत. ती हटविणे अत्यंत गरजेचे आहे. कृत्रीमपद्धतीने पात्र रूंद करून नदीचा प्रवाह पूर्ववत करता येत नाही तर प्रवाहाच्या आड येणारे अडथळे दूर केले पाहिजेत, असे ते म्हणाले. मिठी नदी प्रदूषित झाली असून नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. मात्र मुंबईतील तरूणांनी ही नदी वाचविण्याचा निर्धार केला आहे, असे राजेंद्र सिंग यांनी सांगितले. ही नदी वाचविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यावरण अभ्यासक गिरीश राऊत यांच्यासह इतर पाच जणांचा यात समावेश आहे. ही समिती नदी वाचविण्यासाठी कृती कार्यक्रम ठरविणार आहे.

निखिलदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ थिरकणार झाकीरची बोटं
प्रतिनिधी : गेल्या जमान्यातले मान्यवर तबलावादक पं. निखिल घोष यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त ‘संगीत महाभारती’तर्फे नेहरू सेंटर वरळी या ठिकाणी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निखिल घोष हे बासरीचे जादूगार पं. पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ. ते अत्यंत चतुरस्र संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी वादनाबरोबरच संगीत प्रसाराचं आणि ज्ञानशाखेच्या वृद्धीसाठीही अखंड कार्य केलं. २० जानेवारी रोजी नेहरू सेंटरच्या सभागृहात संध्या. ७ वा. त्यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांचं एकल, तबलावादन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. झाकीर हुसेन यांचा एकल वादनाचा या मोसमातला हा शहरातला पहिलाच कार्यक्रम आहे. निखिल घोष यांनी नेहमीच झाकीर हुसेन यांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप माारली आहे. या कार्यक्रमात निखिल घोष यांचे सुपुत्र पं. नयन घोष यांचं सतारवादनही ऐकायला मिळणार आहे. त्यांच्याबरोबर शुभंकर बॅनर्जी तबला साथ करणार आहेत. नयन घोष हे उत्तम नामांकित तबलावादक तर आहेतच. परंतु सतारवादनातही त्यांनी प्राविण्य मिळवलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका नेहरू सेंटर आणि रिदम हाऊसमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी २२८४२८३५/ २४९६४६८०.

तरूणांनी घेतली धूम्रपानविरोधात प्रतिज्ञा
प्रतिनिधी : सार्वजनिक ठिकाणी धूम्नपानबंदीकरिता विद्यार्थ्यांनी चालविलेल्या प्रतिज्ञा चळवळीला समर्थन देण्यासाठी मास्क अथॉन या पाच किमीच्या पदयात्रेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. ओव्हल मैदानाजवळील कोपरेज बॅन्डस्टॅन्ड गार्डन येथून सुरू झालेल्या पदयात्रेची सांगता समारंभ गिरगाव चौपाटीवर झाली.यावेळी बोलताना हेलिस सेखसरिया इन्स्टिय़ुट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. पी. सी. गुप्ता म्हणाले, या पदयात्रेसमवेत कार्यरत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी या मागणीस याचळवळीमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. तंबाखू व त्याच्या विविध प्रकारात होणाऱ्या वापराचे समाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा पदयात्रेचा हेतू होता.यावेळी पोलिस आयुक्त हसन गफूर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) डॉ. व्यंकटेश आदी यावेळी उपस्थित होते.

..आणि शाळेत उत्साहाचे वातावरण पसरले
प्रतिनिधी : मानखुर्द येथील नूतन विद्यामंदिराच्या सात विद्यार्थ्यांना फेरतपासणीत पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती जाहिर झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण पसरले. १६ जून २००८ रोजी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी फक्त १३ मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. इतर मुलेही शिष्यवृत्ती उत्तीर्ण असणारच अशी शाळेला व विद्यार्थ्यांना खात्री होती. त्यामुळे सात मुलांनी फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्याचा निकाल जाहीर झाला आणि सर्व सातही मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. शाळेतील २० विद्यार्थ्यांना यावर्षी शिष्यवृत्ती मिळाली अशी माहिती मुख्याधापिका संध्या अशोक खांडरे यांनी दिली.

कबड्डी महोत्सवास प्रारंभ
प्रतिनिधी : ज्ञानप्रकाश क्रीडा मंडळातर्फे कबड्डी क्रीडा महोत्सव परळ गावातील स्वराज्य भुवन व महापालिका मैदानात सुरू झाला आहे. या महोत्सवाअंतर्गत स्पर्धेचे उद्घाटन कबड्डीपटू रक्षा नारकर हिच्या हस्ते झाले. यावेळी चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण माळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून परळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रणधीर परळकर, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह मनोहर इंदुलकर, कबड्डी असोसिएशनचे सदस्य शशिकांत राऊत व राजेश पाडावे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात ५० किलो वजनी गटातील मुलींचा परळमधील ओम कबड्डी संघ आणि प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळाचा संघ यांच्यात लढत झाली. तर ४५ किलो वजनी गटातील मुलांच्या संघांचा सामना झाला. काळाचौकीस्थित जिजामाता नगर सवरेत्कर्ष मंडळ व दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब यांच्यात उद्घाटनाचा कबड्डी सामना झाला. मुलींच्या सामन्यात ओम कबड्डी संघ विजयी झाला तर मुलांच्या गटातील सामना जिजामाता नगर सवरेत्कर्ष मंडळाच्या संघाने जिंकला.

पाल्र्यातील ज्येष्ठ रहिवासी रघुनाथ भाटवडेकर यांचे निधन
प्रतिनिधी : पाल्र्यातील ज्येष्ठ रहिवासी रघुनाथ काशीनाथ भाटवडेकर यांचे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात उद्योजक पुत्र सुरेश भाटवडेकर , अभय आणि विवाहित कन्या सुहासिनी, नातवंडे असा परिवार आहे.

विलेपार्ले येथे १८ जानेवारी रोजी ‘एक था सैगल’चे आयोजन
प्रतिनिधी : आशा भोसले फॅन ग्रुप आणि स्वरयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कुंदनलाल सैगल यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले (पू.) येथे ‘एक था सैगल’ अर्थात ‘बाबूल मोरा’ या सैगल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती डोंबिवली येथील विनायक जोशी यांची असून त्यांच्यासह अपर्णा हेगडे गाणी सादर करणार आहेत. निवेदन मिलिंद जोशी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विलेपार्ले येथील जवाहर बुक डेपो व आपले दुकान येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९८२१४०४९५४, ९८२१२९०७४६ वर संपर्क साधावा.

‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर सचिन रोहेकर यांना पुरस्कार
प्रतिनिधी : हिंदी साप्ताहिक उत्तर दर्पणच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर सचिन रोहेकर यांना उत्तर दर्पण उत्कृष्ट युवा पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. ५००१ रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा उत्तर दर्पण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रेम शुक्ल यांना देण्यात येणार असून ११००१ रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्तर दर्पण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा १८ जानेवारी रोजी दहिसर येथे होणार आहे. पुरस्कार निवड समितीत ज्येष्ठ पत्रकार शचिंद्र त्रिपाठी, अश्विनी कुमार मिश्र, डॉ. एच. बी. मिश्र आणि उत्तर दर्पण साप्ताहिकाचे वरिष्ठ वार्ताहर ओमप्रकाश पांडेय यांचा समावेश आहे.

शहीद आणि वीर पोलिसांचा सत्कार
प्रतिनिधी : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आझाद मैदान पोलीस ठाण्यातील हवालदार विजय खांडेकर यांच्या कुटुंबीयांना धोबीतलाव विभागातील व्यापारी व नागरिकांतर्फे गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेले सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, विजय पोवार व हवालदार मोहन शिंदे यांना १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धोबीतलाव विभागातील साईबाबा चौकात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.