Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
नवनीत

आचार्य प्रवचन देत होते- ‘माणूस वयानं वाढतो तसं त्याचं भय वाढत जातं. लहान मूल विस्तवाला स्पर्श करतं. एखादा विषारी प्राणी जवळून गेला तरी त्याला भीती वाटत नाही.. धारदार वस्तू हाताळायला बघतो. मृत्यू म्हणजे काय हे त्याला समजत नाही.. तोपर्यंत तो नि:शंक असतो. भय त्याला ठाऊक नसते.

 

पुढे तो मोठा होतो आणि विस्तव, विंचू, चाकू वगैरेंचा अर्थ समजू लागतो. ही गोष्ट नैसर्गिक आहे, पण बाहय़ जगाशी माणसाचा संपर्क येऊ लागतो तसतसा माणूस भयशंकित होऊ लागतो. चोरीचं भय, मृत्यूचं भय, अपघाताचं भय, गुंडांचं भय, विंचू, सापाचं भय, अतिरेक्यांचं भय, बॉम्बहल्ल्याचं भय, अशा कितीतरी भीती-भयाचा अतिरेक झाला की माणूस मनाचा समतोल घालवून बसतो. मनावर अतिशय ताण येऊन, तो घाबराघुबरा होऊन विचित्र वागू लागतो. महावीर म्हणाले आहेत की, घाबरू नका- आजाराला, मृत्यूला, शत्रूला, वार्धक्याला, जुलूम जबरदस्तीला, अन्यायाला. भयमुक्त रहा व इतरांनाही अभय द्या.’
आचार्य म्हणाले, ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. अभय देणारी व्यक्ती स्वत: शांत असते व इतरांना शांती प्रदान करते.’ भय अज्ञानातून येतं. ‘असं होईल तर’ या चिंतेतून येतं. ज्ञानी माणूस नेहमी निर्भय असतो. जितकी आसक्ती अधिक तितकं भय अधिक. ज्ञानी माणूस निरासक्त, निर्मोही असतो. तो स्पष्ट बोलतो. अन्यायापुढे मान तुकवत नाही. देशासाठी, धर्मासाठी आपलं बलिदान करू शकतो.’
महावीरांचा विहार चालला होता. रस्त्यात काही लोक म्हणाले, ‘‘या जंगलातून विहार करू नका. तिथं ‘चंडकौषिक’ नावाचा भयंकर विषारी नाग आहे.’’ महावीर निर्भय होते.ते तिथेच गेले. ध्यान धरून उभे राहिले. कायोत्सर्ग अवस्थेत फुत्कार सोडत नाग तिथं आला. दोन वेळा फणा आपटून दंश करायला गेला, पण महावीर ध्यानस्थ अवस्थेत. त्यांची ती अभय देणारी शांत, निश्चल मुद्रा बघून तो निर्वैर झाला. त्यांच्या समोर फणा उगारून वेटोळं घालून शांत बसला. हे दृश्य बघायला शेकडो लोक आले. वंदन करून निघून गेले. भय आणि अभय याच्या पलिकडे गेलेलं ते दृश्य होतं.
महानुभावानो, भय माणसाला दुबळं करतं, म्हणून भयमुक्त जगा. निरासक्त, निर्मोही व्हा. आपोआप भय दूर पळेल. तणाव दूर जाईल. मनोबल वाढेल.
लीला शहा

कृत्तिका हा खुला तारकागुच्छ असल्याचं म्हटलं जातं. खुला तारकागुच्छ म्हणजे काय?
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सूर्यास्तानंतर दोनएक तासांनी आकाशात डोक्यावर पाहिलं तर सहा-सात ताऱ्यांचा एक लहानसा पुंजका आकाशात दिसतो. शहरातील दिव्यांच्या लखलखाटातही दिसणारा हा ताऱ्यांचा पुंजका म्हणजेच ‘कृत्तिका नक्षत्र’. साध्या डोळय़ांना तारे आकाशात इतस्तत: विखुरलेले दिसतात. या ताऱ्यांआड दडलेली खरी सृष्टी पाहण्यासाठी जर हाताशी लहानशी द्विनेत्री किंवा दुर्बीण असेल तर आकाशनिरीक्षणाची खरी लज्जत चाखायला मिळते. द्विनेत्रीमधून आकाशात बऱ्याच ठिकाणी लहानसे धूरकट पुंजके दिसतात. ताऱ्यांच्या अशा पुंजक्यांना ‘तारकागुच्छ’ असं म्हणतात. संपूर्ण आकाशात असे हजारो तारकागुच्छ आढळतात. या तारकागुच्छांचे दोन प्रकार असतात. खुले तारकागुच्छ व बंदिस्त तारकागुच्छ. ज्या तारकागुच्छात दहा ते एक हजार तारे असतात, त्यांना ‘खुला तारकागुच्छ’ असं म्हणतात.
खुल्या तारकागुच्छातील तारे तुलनेने विखुरलेले दिसतात. द्विनेत्रीमधून पाहिल्यास अशा गुच्छातले तारे सुटे सुटे दिसू शकतात. खुले तारकागुच्छ आपल्या सूर्यमालेच्या सभोवती साधारणपणे शंभर ते सात हजार प्रकाशवर्ष अंतरावर पसरलेले आहेत. या गुच्छांमधील सर्व तारे एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने जखडलेले असून त्यांचा अवकाशातील वेगही सारखाच असतो. अशा गुच्छातील सर्व ताऱ्यांचा जन्मही साधारणपणे एकाच वेळी व एकाच अवकाशस्थ ढगामधून झालेला असतो. आपण कृत्तिकेचंच उदाहरण घेऊया. कृत्तिका हा खुला तारकागुच्छ असून याचे साध्या डोळय़ांना सहा ते सात तारे दिसत असले तरी या गुच्छाचे दुर्बिणीतून निरीक्षण केल्यास २५० ते ३०० तारे या पुंजक्याचे सभासद असल्याचं लक्षात येतं. सप्तर्षी तारकासमूहाचे जे सात ठळक तारे आहेत, त्यातील पाच तारे व जवळपासचे इतर बारा अंधूक तारे हे एका लहानशा तारकागुच्छाचे सभासद असून हा सप्तर्षी खुला तारकागुच्छ आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळचा तारकागुच्छ असून तो केवळ पंचाहत्तर प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

३ मे १९१६ ला मडगाव येथे जन्मलेले दीनानाथ दलाल शालेय वयातही जी चित्रे रेखाटत, ती पाहून त्यांच्या मुख्याध्यापकांनीच त्यांना प्रोत्साहन दिले. दलाल आर्ट स्टुडिओ, दीपावली मासिक, पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरची चित्रे व रेखाटने यामुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचले. राजकीय व्यंगचित्रे, व्यक्तिचित्रे याबरोबरच शिवराज्याभिषेकाच्या तैलचित्राने तर ते हृदयात कोरले गेले. व्यक्तिचित्रणातील शास्त्रशुद्ध बैठकीमुळे ते अभिजात कलावंत ठरले.. ‘गोटय़ा’, ‘चिंगी’, ‘अंतू बर्वा’ ही त्यांची गाजलेली व्यक्तिचित्रे.. १५ जानेवारी १९७२ हा त्यांचा मृत्युदिन..
संजय शा. वझरेकर

शाळेतून घरी आल्यावर घरात शिरण्याआधी मानसी शेरूकडे धाव घ्यायची. गुबगुबीत सोनेरी रंगाचा शेरू तिच्या पायाशी लोळायचा. थंडगार नाक तिच्या गालाला लावायचा. लालचुटूक जिभेने तिचं अंग चाटायचा, छोटुकले शेपूट हालवत राहायचा. मानसी, तिचे आई-बाबा शेरूचे खूप लाड करायचे. येता-जाता दूध, खायला नाही तर चघळायला स्टिक्स द्यायचे. त्याची चिमुकली कुस नेहमी टुम फुगलेली असायची. पोट भरलं की अंगाचं वेटोळं करून तो झोपून जायचा. मग कसलं फिरणं आणि कसलं खेळणं. हळूहळू शेरू सुस्तावला. त्याची हालचाल मंदावली. जेव्हा पाहावं तेव्हा तंगडय़ा पसरून तो पसरलेला असायचा. मानसी शाळेतून आल्या आल्या क्रीम क्रॅकरची बिस्किटं घेऊन ‘आऽऽरे शेरूडय़ा..’ करत शेरूपाशी गेली. नेहमी झडप घालून तिच्या हातातली बिस्किटं फस्त करणाऱ्या शेरूनं फक्त डोळे उघडून एकदा पाहिलं. कान हलवले, एक जांभई दिली आणि चारी पाय ताणून तो पुन्हा झोपून गेला. ‘आईऽ शेरू ऽऽ काही खात नाही गं’, मानसी कळवळली. आई म्हणाली, ‘हो ना, सकाळी दिलेलं दूध, ब्रेडही तसंच आहे.’ ‘मी ऑफिसमधून येताना त्याला आवडतात म्हणून वेफर्स आणले, त्यालाही तोंड लावलं नाही त्यानं’, बाबा अभ्यासिकेतून बाहेर येत म्हणाले. मानसीनं घरी काम करणाऱ्या वसंताला शेरूसाठी घाईघाईनं मटण आणायला पिटाळलं. मटणाचा दुरून वास जरी आला तरी शेरू वसंताकडे धाव घेईल आणि शेपटी हलवत त्याच्या अंगावर उडय़ा मारत त्याला बेजार करेल. पण छे! तोही उपाय पूर्णपणे वाया गेला. मग मात्र सगळे घाबरले. शेरूला नेरकर डॉक्टरांकडे न्यायचं ठरलं. नेरकर प्राण्यांचे डॉक्टर होते. बराच वेळ रांगेत बसल्यावर शेवटी एकदाचा नंबर आला. एव्हाना मानसीला रडू यायला लागलं होतं. ‘डॉक्टरकाका, शेरू काही खात नाही. कालपासून उपाशी आहे.’ पुढचं बोलवेना. डॉक्टरांनी लठ्ठ शेरूकडे पाहिलं. ‘हं, याला इथंच ठेवावं लागेल. तीन दिवसांनी या.’ शेरूला अ‍ॅडमिट केलंय हे सगळय़ा कॉलनीला कळलं. दवाखान्यात इतर कुत्र्यांना खायला देताना सहायकानं विचारलं, ‘डॉक्टर, शेरूला काय द्यायचं?’ डॉक्टर म्हणाले, ‘फक्त पाणी. अरे, खायला देऊन तर त्याची ही अवस्था करून ठेवलीय. नुसत्या पाण्यावर ठेवू. आपोआप बरा होईल.’ तीन दिवसांनी मानसी लगबगीने दवाखान्यात गेली. ‘डॉक्टर, शेरू कसा आहे, कुठे आहे, खातो का काही?’ डॉक्टर हसून म्हणाले, ‘हो, छान आहे. त्याला घरी घेऊन जा.’ डॉक्टरांनी शेरूसाठी दूधभाकरी आणायला सांगितलं. ‘अहो, त्याला भाकरी मुळीच आवडत..’ वाक्य पुरं व्हायच्या आत कुस्करलेल्या दूधभाकरीवर शेरू तुटून पडला. शेरूला घेऊन निघताना मानसीनं फी विचारली. डॉक्टर म्हणाले, ‘शेरूला कुठल्याच इलाजाची गरज नव्हती. त्याला फक्त पाणी दिलं. पाण्याचे कसले पैसे? त्याला फिरवून आणत जा आणि मोजका पण पोषक आहार दे. तीच माझी फी.’ प्रेमापोटी अति लाड झाले तर परिणाम वाईट होतो. प्रेमाबरोबरच शिस्त, व्यायाम, योग्य आहार आवश्यक असतो.
आजचा संकल्प- भेळ, पिझ्झा, बर्गर खाईन त्या दिवशी पालेभाजी, कोशिंबीर असा संतुलित आहार मी घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com