Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘ब्लॅक लिस्ट’ कंत्राटदारावर पुन्हा मेहेरनजर
पालिकेची ५२ कोटींची खिरापत
जयेश सामंत

 
अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधणीमुळे मागील तीन वर्षांंपासून सतत वादात सापडलेल्या ठाणे-बेलापूर रस्त्याच्या कंत्राटदारास ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकावे, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली असतानाच, याच ठेकेदारास काँक्रीट रस्त्याच्या वाढीव कामासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांची जादा रक्कम अदा करण्याचा धक्कादायक निर्णय महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी घेतला आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला यासंदर्भातील एक प्रस्ताव तयार करून अभियांत्रिकी विभागाने या ठेकेदाराचे तोंड गोड केले असले, तरी या अजब प्रस्तावामुळे महापालिकेत भल्याभल्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याला पडलेले १७१ तडय़ांच्या दुरुस्तीचे काम अजून पूर्ण होत नाही, तोवर ५२ कोटींच्या वाढीव मंजुरीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याची तयारीही पूर्ण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नाहटा यांच्या या नव्या प्रस्तावामुळे ठाणे-बेलापूर रस्त्याच्या १११ कोटी रुपयांच्या कामाने आता थेट १६३ कोटींच्या घरात उडी घेतली आहे. जागोजागी तडे पडलेले रस्ते आणि अतिशय सदोष असे असमोल पद्धतीचे काँक्रीट पॅनल यामुळे महापालिकेचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून वाखाणल्या गेलेल्या ठाणे-बेलापूर रस्त्याची एव्हाना रयाच निघून गेली आहे. एक्सप्रेस हायवेच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात जागोजागी पाण्याची तळी निर्माण होतात, असे धक्कादायक चित्र यापूर्वीच दिसून आले आहे. आतापर्यंत महापालिकेने कंत्राटदारास दटावणी देत तडे गेलेले तब्बल १११ पॅनल बदलून घेतले आहेत. मध्यंतरी स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांनीही या रस्त्याची पाहणी करून या दुरुस्त झालेल्या पॅनलचे नमुने घेतले होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील उतारही सदोष असल्याचा मुद्दा मध्यंतरी पुढे आला होता.
या पाश्र्वभूमीवर कंत्राटदाराविषयी कठोर भूमिका घेण्याऐवजी त्याच कंत्राटदाराला ठाणे-बेलापूर रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम देऊन महापालिकेने सर्वांवर कडी केली होती. एरवी अतिशय चाणाक्षपणे सर्व कामांचे परीक्षण करणारे स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांनीही ‘पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंत्राटदार उड्डाणपूल उभारणीचे काम मंजूर करून सर्वानाच तोंडात बोटे घालावयास लावली.
ठाणे-बेलापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाचा हा सर्व इतिहास अगदी ताजा असताना नाहटा यांनी या कामाच्या ठेकेदारास तब्बल ५२ कोटी रुपये वाढीव कामासाठी देण्याचा धक्कादायक प्रस्ताव तयार केला आहे. तुभ्र्यापासून थेट दिघा-ऐरोलीपर्यंत १४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी आहेत. शिवाय दिलेल्या मुदतीपेक्षा तब्बल दोन वर्षे उलटूनही हे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. असे असताना या ठेकेदारास ५२ कोटी रुपयांची वाढीव रक्कम देण्याचा निर्णय धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटू लागली आहे.
महापालिकेने तयार केलेल्या मूळ प्रस्तावात या रस्त्याच्या चार लेन काँक्रीटच्या, तर चार लेन पेव्हर ब्लॉकमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ऐनवेळेस पेव्हर ब्लॉकच्या चार लेन काँक्रीटच्या केल्याने या कामाचा खर्च तब्बल १४ कोटी ६१ लाखांनी वाढला, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. याशिवाय भाववाढ यासारख्या बाबींसाठी अतिरिक्त १४ कोटी या कंत्राटदारास देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव आयुक्तांनी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवला असून, उद्या त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.