Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मल्हार करंडकावर सीकेटीचे नाव
 
पनवेल/प्रतिनिधी : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सुरू असलेल्या मल्हार महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मल्हार नाटय़ करंडकावर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने अनेक बक्षिसे पटकावीत नाव कोरले. या महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘राधा न बावरली’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार पटकावला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी, संतोष दर्णे, कुणाल रेगे, हेमांगी वेलणकर आदी कलाकार, तसेच पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, जयंत पगडे, अशोक खेर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या निमित्ताने मला आमचे एकांकिकांचे दिवस आठवले. आता तुम्ही जेथे बसला आहात व जसा गोंधळ करीत आहात, तसाच एकेकाळी मी करायचो, असे समोरील स्पर्धकांना सांगत भविष्यात तुम्हीही माझ्याप्रमाणे प्रसिद्ध कलाकार होऊन व्यासपीठाच्या केंद्रस्थानी या, असा आशीर्वाद अंकुश चौधरी यांनी नवोदित नाटय़कर्मीना दिला.
पनवेलमधील अनिल कुलकर्णी, श्रीकांत पाटणकर, महेश गाडगीळ, नंदकुमार गोगटे, चंद्रकांत मने, स्नेहा सोमण, वसुधा पितळे, मनोहर म्हात्रे, श्री बेहेरे, शाम पुंडे, सुनील पुंडे आदी ज्येष्ठ रंगकर्मीचा यावेळी सत्कार करण्यात आला. कल्पना कोठारी, विवेक मिस्त्री व जयवंत वाडकर यांनी या एकांकिकांचे परीक्षण केले. एकांकिकांच्या माध्यमातून टीव्ही मालिका आणि चित्रपट मिळाले तरीही नाटय़सृष्टीला विसरू नका, असा सल्ला अभिनेते जयवंत वाडकर यांनी दिला.
सीकेटी महाविद्यालयातून पूर्वी एकांकिका केल्या होत्या, परंतु झी टॉकीजशी जोडला गेल्याने वेळेअभावी स्टेज सुटले होते. यावर्षी आवर्जून पुन्हा या स्पर्धेत सहभागी झालो आणि रंगभूमीशी नाळ जोडली गेली, असे मनोगत उद्योन्मुख अभिनेता व दिग्दर्शक दीपक पवार याने व्यक्त केले. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमोल खेर, शैलेश कठापुरकर, अभिजीत जाधव, सत्यवान नाईक, गौतम रामधरणे, सचिन पाटील, अजय पाटील, केतन जाधव, सचिन गमरे यांनी परिश्रम घेतले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : सवरेत्कृष्ट एकांकिका : १) राधा न बावरली, सीकेटी कॉलेज, नवीन पनवेल, २) मुक्त आभाळ झाले, स्वररंग पारिजात, पेण, ३) मुक्तीधाम- ऐश्वर्या थिएटर्स, उरण
सवरेत्कृष्ट दिग्दर्शन : १) मुक्त आभाळ झाले- सिद्धार्थ साळवी, २) राधा न बावरली- प्रमोद शेलार
सवरेत्कृष्ट लेखन : १) ऋणानुबंध- मानसी मराठे, २) गोष्ट कुणाची- विनय जोशी
सवरेत्कृष्ट अभिनय- पुरुष : १) संदीप रेडकर- राधा न बावरली, २) शेखर माळवदे- मुक्तीधाम
उत्तेजनार्थ अभिनय : १) आशीर्वाद मराठे- ऋणानुबंध, २) दीपक पवार- सेहेर एक पहाट
सवरेत्कृष्ट अभिनय-स्त्री : १) मानसी मराठे- ऋणानुबंध, २) शीतल कुलकर्णी- राधा न बावरली
सवरेत्कृष्ट नेपथ्य : १) स्वप्नील म्हात्रे- राधा न बावरली, २) प्रथमेश सोमण- सेहेर एक पहाट.