Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

‘ब्लॅक लिस्ट’ कंत्राटदारावर पुन्हा मेहेरनजर
पालिकेची ५२ कोटींची खिरापत

जयेश सामंत

अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधणीमुळे मागील तीन वर्षांंपासून सतत वादात सापडलेल्या ठाणे-बेलापूर रस्त्याच्या कंत्राटदारास ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकावे, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली असतानाच, याच ठेकेदारास काँक्रीट रस्त्याच्या वाढीव कामासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांची जादा रक्कम अदा करण्याचा धक्कादायक निर्णय महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी घेतला आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला यासंदर्भातील एक प्रस्ताव तयार करून अभियांत्रिकी विभागाने या ठेकेदाराचे तोंड गोड केले असले, तरी या अजब प्रस्तावामुळे महापालिकेत भल्याभल्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याला पडलेले १७१ तडय़ांच्या दुरुस्तीचे काम अजून पूर्ण होत नाही, तोवर ५२ कोटींच्या वाढीव मंजुरीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याची तयारीही पूर्ण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

मल्हार करंडकावर सीकेटीचे नाव
पनवेल/प्रतिनिधी : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सुरू असलेल्या मल्हार महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मल्हार नाटय़ करंडकावर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने अनेक बक्षिसे पटकावीत नाव कोरले. या महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘राधा न बावरली’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार पटकावला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी, संतोष दर्णे, कुणाल रेगे, हेमांगी वेलणकर आदी कलाकार, तसेच पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, जयंत पगडे, अशोक खेर आदी उपस्थित होते.

खाजण तलावात मच्छिमारी करणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन
बेलापूर/वार्ताहर : खाजण तलावात मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी घणसोली येथे मच्छिमारांना दिले. घणसोली गावातील मच्छिमारांकरिता उभारण्यात येणाऱ्या जेट्टीचे भूमिपूजन बुधवारी मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी मत्स्य विभाग आयुक्तांकडे याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी पाटील म्हणाले की, कारखाने बंद झाल्याने स्थानिकांना उदरनिर्वाहासाठी साधन राहिले नाही. त्यामुळे मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या अनेकांना त्याशिवाय गत्यंतर नाही. या ठिकाणी मच्छिमारी करणाऱ्यांना शासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक संजय पाटील, कमल पाटील, माजी परिवहन समिती सभापती विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस-एमटीएनएल साथ साथ
पनवेल/प्रतिनिधी : केबल चोरीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले असून पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पनवेल परिसरात एमटीएनएलतर्फे वेळोवेळी सुरू असणाऱ्या कामांदरम्यान मोठय़ा प्रमाणावर केबल चोरीच्या घटना घडत होत्या, मात्र याबाबतीत काहीच तपास होत नसल्याने एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ग्राहक संरक्षण उपकक्षप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी पुढाकार घेऊन या दोन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोक दुधे यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला पोलीस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त एमटीएनएलचे नवी मुंबईचे उपमहाव्यवस्थापक के. बालसुब्रमण्यम, पनवेल विभागीय मंडल अभियता आर. आर. पाठक, कळंबोली व नवीन पनवेल विभागाचे मंडल अभियंता एन. एस. ठाकूर आदी उपस्थित होते. केबल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी संशयितांवर दखलपात्र गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, असा आदेश दुधे यांनी यावेळी दिला. तसेच चोरीचे प्रकार टाळण्यासाठी पोलीस व एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्यांच्या खोदकामांबाबत एमटीएनएल, नगरपालिका, वीज महावितरण कंपनी व वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासंबंधी धोरण निश्चित करण्यात यावे, असेही या बैठकीत ठरले. या बैठकीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमण यांचे आभार मानले.

पिल्ले महाविद्यालयाचे नऊ विद्यार्थी मुंबई संघात
बॉल बॅडमिंटन स्पर्धा

पनवेल/प्रतिनिधी : नवीन पनवेलच्या पिल्ले महाविद्यालयांतील नऊ विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या संघात समावेश झाला आहे. चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये हे नऊ खेळाडू मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये सोनल (अमृता) जोशी, अपर्णा पाटील, निवेदिता सिंह, वैशाली विश्वास, सौम्या मेनन या विद्यार्थिनींचा तर आशिष जैस्वाल, हरीश सत्पती, सनिश अँथनी व वसीम शेख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत नुकत्याच झालेल्या बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पिल्ले महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे गेली १० वर्षे अजिंक्य असलेल्या उल्हासनगरच्या सी.एच.एम. महाविद्यालयाच्या संघांचा पराभव करून पिल्ले महाविद्यालयाच्या मुला-मुलींच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले. या पाश्र्वभूमीवर या नऊ खेळाडूंची चेन्नईत होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आमच्या संघांनी मुंबई विद्यापीठाची ही स्पर्धा प्रथमच जिंकली असून पुढील वर्षीही विजेतेपद राखण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक अली सिद्दीकी यांनी व्यक्त केली.

फळविक्रेत्याची हत्या
बेलापूर/वार्ताहर : सानपाडा रेल्वे स्थानकाजवळील रुळावर एका फळविक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ३५ वर्षे वयाचा हा फळविक्रेता सानपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून फळविक्रीचा व्यवसाय करीत होता.