Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

डॉ. कैलास कमोद, स्मिता तळवळकर,
जयप्रकाश पवार यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार

प्रतिनिधी / नाशिक

इतर मागासवर्गीय विकास व वित्त महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, निर्माती-अभिनेत्री स्मिता तळवळकर, ज्येष्ठ उद्योगपती रतनलाल बाफणा, शहीद अरुण चित्ते, ‘लोकसत्ता’ चे पत्रकार जयप्रकाश पवार यांच्यासह एकूण अकरा जणांना यंदाचा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक, साहित्यिक, सहकार, शेती, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे गिरणा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळा पाच एप्रिल रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘गई बोला रे धिनाऽ ऽ ऽ’ने दणाणला आसमंत
नाशिक / प्रतिनिधी

‘गई बोला रे धिनाऽ ऽ ऽ’, ‘काट्टा दे ढीलऽ ऽ ऽ’च्या गगनभेदी आरोळया आणि परस्परांवरील कुरघोडीच्या घोषणांनी दणाणून गेलेल्या वातावरणात नाशिककर पतंगशौकिनांनी संक्रांत हा नववर्षांतील पहिला सण जल्लोषात साजरा केला. सायंकाळी मात्र ही ईर्षां विसरुन एकमेकांना तिळगूळ देत दिवसाची अखेर झाली. गुजरातचे नजीकचे सान्निध्य असल्याने पहिल्यापासूनच नाशिकमध्ये संक्रांतीला पतंगोत्सवाचे मोठे महत्त्व आहे. बुधवारीही खास माहौलमध्ये शहरात ठिकठिकाणी गच्चीवर, मैदानांमध्ये गटागटाने जमलेल्या मंडळींनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला. या निमित्ताने संपूर्ण शहरातील वातावरण पतंगमय झाले होते.

नाशिकमध्ये आजपासून समकालीन कलाकृतींचे प्रदर्शन
प्रतिनिधी / नाशिक

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाविषयक घडामोडींमध्ये दिवसेंदिवस भर पडत असली तरी महानगरांचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील इतर शहरे त्यापासून वंचितच राहतात. राज्यातील शंभराहून अधिक कला महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची त्यामुळे अधिकच गैरसोय होते. प्रसिध्द कलावंतांच्या मूळ कलाकृती प्रत्यक्षात बघण्याची संधीही मुंबईबाहेरील शहरांमध्ये सहसा उपलब्ध होत नाही. ही उणीव दूर करण्याच्या उद्देशाने मुंबईच्या बोधी आर्ट या संस्थेतर्फे येथील सार्वजनिक वाचनालयाच्या कलादालनात १५ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘विस्तारणारी क्षितिजे’ या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या संयोजनाखाली आयोजित या प्रदर्शनातून आधुनिक आणि समकालीन भारतीय कलांचे दर्शन होणार आहे.

सदासतेज!
इंग्लंडमध्ये ऐन भरात असलेली मेडिकलची ‘प्रॅक्टिस’ सोडून एकाएकी नाशिकला स्थायिक होण्याचा डॉक्टर अनिल बदियानी यांनी घेतलेला निर्णय जसा ४० वर्षांपूर्वी त्यांच्या परिचितांना बुचकळ्यात टाकून गेला तसाच किंबहुना त्याहूनही कितीतरी अधिक प्रमाणात ‘आयसीसीयू ते कळसूबाई शिखर’ हा त्यांनी प्रत्यक्षात आणलेला उपक्रम सगळ्यांनाच आचंबित करणारा ठरला आहे.
स्वत: एक निष्णात डॉक्टर असतानाही वैद्यक शास्त्राच्या मर्यादा जाणून घेत औषधाला काडीएवढेच महत्त्व देणाऱ्या बदियानी यांनी रोगाच्या मुळालाच हात घालणारी व निसर्गाशी एकरूप असणारी जीवनशैली अंगिकारत स्वत:च्या व इतरही हजारोंच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलविला आहे. त्यामुळेच हृदयविकाराच्या झटक्यानंतरचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करताना वयाच्या सत्तरीतही ते स्वत:ला ‘फिटेस्ट पर्सन’ म्हणून संबोधतात आणि दररोज थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल सहाशे पायऱ्यांची चढउतार करतात !

नंदुरबारमध्ये उत्तर महाराष्ट्र वकील परिषद
वार्ताहर / नंदुरबार

उत्तर महाराष्ट्र स्तरीय पहिली वकील परिषद येथे २४ जानेवारीस आयोजित करण्यात आली असून या परिषदेला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसह राज्यातील विधितज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांनी दिली.महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल, नंदुरबार विधी महाविद्यालय आणि नंदुरबार जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली असून तीन जिल्ह्य़ातून चारशे वकील उपस्थित राहतील, असे रघुवंशी यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत खूप बदल झाले असले तरी जिल्हा आणि तालुकास्तरावर अनेक सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी भाडय़ाच्या घरात न्यायालये भरविली जात आहेत. त्यांची अवस्थाही चांगली नाही. पक्षकारांना बसण्यासाठी जागा चांगली नाही. झाडाखाली बसून दिवस काढावा लागतो, महिलांसाठी बऱ्याच ठिकाणी सुविधा नाहीत. परिषदेमध्ये या विषयावर चर्चा होणार असून आवश्यक उपाययोजनांवरही विचार करण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठीचा वापर व्हावा या मुद्यावर या परिषदेत भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातून येणारा पक्षकार हा बऱ्याच वेळा अडाणी असल्याने आपला वकील आपली बाजू मांडतो आहे की नाही, न्यायालयाने दिलेला निकाल काय आहे, हे समजण्यासाठी न्यायालयीन कामकाज मराठीत असावे, हा दुसऱ्या
चर्चासत्राचा विषय आहे. यावेळी नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष अ‍ॅड. गिरीश रघुवंशी उपस्थित होते.

धनादेशांमध्ये फेरफार करून १२ लाखाला गंडा
वार्ताहर / जळगाव

कंपनीने दिलेल्या प्रत्येकी एक लाखाच्या चार धनादेशांमध्ये फेरफार करून बँक ऑफ इंडियाच्या नवी पेठ शाखेची तब्बल १२ लाखाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेमालूमपणे झालेल्या या फसवणुकीमुळे बँकींग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील राजेंद्र नारायण पाटील याला ठाणेस्थित के. बी. एक्स्पोर्ट कंपनीने व्यावसायिक कारणासाठी प्रत्येकी एक लाखाचे चार धनादेश दिले होते. तथापि, ते बँकेत भरतेवेळी एक लाखाच्या जागी बेमालूमपणे चार लाखाची रक्कम दाखविली गेली. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या नवी पेठ शाखेत ते जमा करून त्यापोटी १६ लाख रुपये काढण्यात आले. काही दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. कंपनीने त्याबाबत बँकेशी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव विमानतळ भूसंपादनाच्या कामाला गती
जळगाव / वार्ताहर

विमानतळ निर्मितीसाठी येथे भूसंपादन प्रक्रिया वेगात सुरू झाली असून याकामी ३० कोटी ५५ लाख ८४ हजार रूपये खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
विमानतळ विकासासाठी जळगाव तालुक्यातील नशिराबाद व कुसुंबा गाव शिवारातील २४ गटातील एकूण २७.८२ हेक्टर जमीन संपादनाचे काम हाती घेण्यात आले होते. याकामी प्रांताधिकारी अनिल पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. विमानतळ विकासासाठी विकास कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या बदल्यात चांगला भाव देण्यात येत असल्याने कंपनीला शेतक ऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकऱ्यांना जिराईत, हंगामी बागायती व कायमस्वरूपी बागायती शेतजमिनीसाठी अनुक्रमे चार, सहा व आठ लाख रुपये एकरी भाव तसेच शेतकऱ्यांना पुनर्वसन अनुदानापोटी भरीव सहाय्य देण्यात येत आहे.