Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

म्हातारी इतुकी न मी..
तरुणपणी विवाह करण्यास नकार दिलेल्या १०७ वर्षे वयाच्या एका चिनी वृद्ध महिलेला या वयात आपल्याला आधार देणारी कोणीतरी व्यक्ती असावी असे प्रकर्षांने वाटू लागले आणि त्यातून शतकपूर्ती केलेल्या जोडीदाराचा शोध ती महिला घेत असल्याचे वृत्त चिनी वृत्तपत्राने दिले आहे. या १०७ वर्षे वयाच्या महिलेचे नाव वांग गुईथिंग असे असून उतारवयात नातलगांवर आपला भार पडता कामा नये, असे तिला प्रकर्षांने वाटू लागले आहे. १०२ व्या वर्षी पाय मोडल्याने वांगने कपडे धुण्यासारखी कामे करणे बंद केले होते. आता एकटेपणाला ती कंटाळली आहे. ‘‘मी आता १०७ वर्षांची असून अजून मी लग्न केले नाही. मी आता घाई करून नवरा शोधला नाही तर माझे कसे होईल?’’ अशा चिंतेने वांगला ग्रासले आहे. चीनमधील एका मीठ व्यापाऱ्याच्या घरात जन्मलेल्या वांगला ‘लग्न’ या प्रकाराची खूप भीती वाटत असे. तिचे काका, तसेच अन्य पुरुष मंडळी आपल्या बायकांना मारझोड करीत असल्याचे ती पाहत होती आणि त्याचा परिणाम तिच्या बालमनावर झाला होता.

घोटाळ्यांची अखंड परंपरा
४५ वर्षां पूर्वी म्हणजे १९६४ साली स्थापन झालेल्या सोलापूर महापालिकेचा एकेकाळी राज्यात नावलौकिक होता. या शहराची औद्योगिक पीछेहाट झाल्यानंतर महापालिकेलाही त्याचा फटका बसणे साहजिक होते. परंतु अलीकडे शहराची वाटचाल संक्रमणावस्थेतून होत असताना स्वच्छ व द्रष्टय़ा नेतृत्वाच्या अभावामुळे महापालिकेच्या कारभाराचा गाडा भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतला आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक सारे सामील असल्याने कोणाचे कोणावरच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. ‘मिल बाँट के’ खाण्याची वृत्ती वाढल्यामुळे महापालिकेची चौकशी तरी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘आविष्कार’चा कै. अरविंद देशपांडे महोत्सव यंदा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या गौरवार्थ आयोजिण्यात आला होता. सहसा कुठल्याही सभा-समारंभांपासून दूर दूर राहणारे एलकुंचवार यानिमित्तानं मुंबईकर रसिकांसमोर सदेह आले, हेही या महोत्सवाचं वैशिष्टय़. खरं तर एलकुंचवारांना जवळून ओळखणारेही त्यांच्या सन्निध जायला घाबरतात. आपल्याभोवती एक अभेद्य कोट रचून त्या संरक्षणात साहित्यसाधना करणाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं तसं दुरापास्तच. परंतु अलीकडच्या काळात वयानुसार म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, ते थोडे मऊसूत झाले आहेत, असं म्हणतात. त्यांच्या भाषणात याचा प्रत्यय आला. हे भाषणही वैदर्भीय मोकळेढाकळेपणाचं निदर्शक होतं.
आपण दूर तिकडे नागपुरात असूूनही आपली नाटकं भारतीय स्तरावर पोहचली, याला कारण आपल्याला भेटलेली विजया मेहता, सत्यदेव दुबे, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखी मोठी माणसं आहेत, हे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केलं. मात्र, आपले पाय जमिनीवर राहण्यास नागपुरातलं ‘निरोगी’ वातावरण कारणीभूत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. माझ्या घरच्यांना मी मोठा लेखक वगैरे आहे, असं कधीच वाटत नाही. त्यांच्यासमोर डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता वगैरे नावं फेकली तरी ते जराही इम्प्रेस होत नाहीत. कारण- नाटक आणि त्यातली ही दिग्गज मंडळी त्यांची गावीही नाहीत. अशा ‘समृद्ध’ वातावरणात आपली परवरीश झाली, असं ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या एका बििल्डग ठेकेदार मित्राचा सांगितलेला किस्सा तर भन्नाटच आहे. त्यांचा हा मित्र नागपुरातल्या आपल्या या दोन-तीन कलावंत मित्रांची नेहमी सरबराई करत असतो. याचं एकमेव कारण- आपण या आर्टिस्ट मंडळींमध्ये वावरतो, याचं त्याला भलतंच अप्रूप आहे. एकदा एलकुंचवार पुलं व सुनीताबाईंच्या काव्यवाचनाला गेले होते. बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाचा तो कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी त्या ठेकेदार मित्रानं त्यांना विचारलं की, ‘बाबा, काल तू कुठं होतास?’ तेव्हा एलकुंचवारांनी त्याला पुलं-सुनीताबाईंच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. त्यावर त्यानं काय म्हणावं? ‘कविता एकाच्या.. वाचतंय दुसराच! आणि पदरचे पैसे घालून ऐकायला जातोय तिसराच. याला काय म्हणावं?’ या त्याच्या वक्तव्यावर एलकुंचवार हतबुद्ध न होते तरच नवल.
अशा उदासीन आसमंतात वाढलेल्या एलकुंचवारांना आपण नाटक लिहितो, याबद्दलचा अहंकार करण्याची संधीच कधी मिळाली नाही. आपण सुखासीन आयुष्य जगत आलो.. नाटक ही कधीच आपली प्रायॉरिटी नव्हती, असं ते म्हणतात. तरीही अजून पुढची १०-१५ वर्षे नाटकं लिहीत राहणार असल्याची धमकीही त्यांनी दिलीय. त्या अनुषंगानं पुरस्कार वगैरे मिळाले तर मला हवेच आहेत. पुरस्कारातून पैसे मिळतात, असं ते गंमतीनं म्हणाले. मात्र, नाटकामुळे आपल्याला मोठी, प्रगल्भ माणसं भेटली.. त्यांचा निकट सहवास लाभला; ज्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं, अशी उत्कट कबुलीही त्यांनी दिली. एकुणात- एलकुंचवारांचं प्रत्यक्षातलं हे रूप त्यांच्या प्रतिमेपेक्षा वेगळं निघाल्याचा अत्यंत सुखद प्रत्यय रसिकांना आला.
रवींद्र पाथरे