Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

जागल्याकधीतरी कर वाढणारच!
मुकुंद संगोराम

पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांनी करवाढीचा दिलेला प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने तहकूब करून करवाढीची लढाई तात्पुरतीजिंकली असली तरीही कधीतरी त्याचा निर्णय करावाच लागणार आहे. येत्या वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने मतदार नाराज होणार नाहीत, याची काळजी घेणे सत्ताधारी पक्षाला घेणे भाग पडणार आहे. पण करवाढ न करण्याने आपण आपल्या सगळ्या मतदारांना अधिक गलिच्छ शहरात राहण्याची सक्ती करणार आहोत, याचे भान सत्ताधारी पक्षाला असणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसतील, तर तेथील नागरी जीवन बकाल होईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. पण कोणतेही कर कधीही वाढता कामा नयेत आणि सगळ्या सुविधा मात्र नेहमी अधिक चांगल्या पद्धतीने मिळायला हव्यात, असा आग्रह जर नागरिक करत असतील, तर त्यांना विश्वासात घेऊन पालिकेच्या उत्पन्नाची आणि खर्चाची बाजू समजावून सांगायला हवी.

दहशतवादाचे धुके विरल्याने ‘डेक्कन ओडिसी’ रुळावर!
पुणे, १४ जानेवारी / खास प्रतिनिधी

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामुळे ‘डेक्कन ओडिसी’ या शाही रेल्वेगाडीतून पर्यटनाचा आनंद लुटण्याच्या मोहाला मुरड घालणाऱ्या परदेशी पर्यटकांनी सुमारे सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर या पर्यटनाला प्रतिसाद दिला आहे. दहशतवादाचे हे धुके विरळ झाल्याने चाळीस परदेशी पर्यटकांसह ही शाही रेल्वे रुळावरून धावणार आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात परदेशी नागरिकांना ‘लक्ष्य’ करण्यात आले होते. त्याचा मोठा परिणाम केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील पर्यटनावर झाला. महाराष्ट्र व गोव्यातील पर्यटन संचिताचे दर्शन घडविणाऱ्या डेक्कन ओडिसी या रेल्वेचे आरक्षण परदेशी पर्यटकांनी रद्द केले तर काहींनी हा प्रवास लांबणीवर टाकला. अनेक देशांनी तर आपल्या नागरिकांना सद्यस्थितीत भारतात पर्यटन वा अन्य कारणासाठी जाणे टाळावे असे आवाहन केले होते. त्याचाही परिणाम राज्यातील पर्यटन क्षेत्रावर झाला होता.सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर डेक्कन ओडिसीच्या परदेशी पर्यटकांची पहिली सफर मागील महिन्यात झाली. मात्र या सफरीला अल्पसा प्रतिसाद लाभला होता. आज संक्रांतीच्या दिवशी ही शाही रेल्वेगाडी परदेशी पर्यटकांसह प्रवासाला निघत आहे. या गाडीतून एकावेळी ९६ प्रवासी प्रवास करू शकतात. तसेच सात दिवसांच्या मुंबई, कोकण, गोवा, पुणे, औरंगाबाद अशा सफरीसाठी सुमारे सव्वालाख रुपये शुल्क आकारले जाते. या सफरीमध्ये जर्मनी, जपान व इंग्लंडमधील सुमारे चाळीस प्रवासी सहभागी झाले आहेत.डेक्कन ओडिसी हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही गाडी आर्थिकदृष्टय़ा सक्षमतेने चालविण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. देशी पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटक हे या गाडीचे मुख्य ग्राहक असल्याने त्यासाठी महामंडळाने जगभर एजंट नेमले आहेत. या शाही प्रवासात परदेशी पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी आता घेण्यात येत आहे. या प्रवाशांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तसेच विम्याचे संरक्षणही देण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिक्षिकेने बोरूने लिहिली ‘तुकारामांची गाथा’!
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ बोरूने लिहिण्याचा प्रयोग साकारल्यानंतर शिक्षिकेनेच तुकाराम गाथा लिहिण्याचा अभिनव उपक्रम पूर्ण केला आहे. या शिक्षिकेचे नाव स्वाती पेठकर असून या सध्या मुक्तांगण इंग्लीश स्कूलमध्ये कलाशिक्षिका आहेत.
‘कॅलीग्राफी’ या आवडत्या विषयात पारंगत झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांपूर्वी संपूर्ण ज्ञानेश्वरी बोरूने लिहून काढण्याचा वेगळा प्रयोग स्वाती पेठकर यांनी केला होता. तेरा एप्रिल २००७ रोजी पूर्ण करून स्वत:च्या कलेचा वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने २००७ च्या आवृत्तीत नोंद घेतली. त्या नोंदीनंतर डिसेंबर २००७ मध्ये संत तुकाराम यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्ताने ‘तुकाराम गाथा’ बोरूने लिहिण्याचा विडा उचलला. देहूच्या इंद्रायणी तिरावर बसून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी १९५५ साली संपादित केलेल्या प्रतीची ७८० पाने होती. तर त्याच प्रतीच्या आधारे शिक्षिकेने २०१० पाने लिहिली. या उपक्रमाचा सांगता पंधरा जानेवारीला इंद्रायणी येथेच करणार आहे, असा विश्वास स्वाती पेठकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बोरू म्हणून रंग देण्यात येणाऱ्या ब्रशचे दांडे वापरून शाईऐवजी ब्लॉक पोस्टरचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

समितीची आज पहिली बैठक महानगर नियोजन समितीच्या कामाबाबत अनभिज्ञता
सुनील माळी, पुणे, १४ जानेवारी

कायदा झाल्यावर तब्बल दहा वर्षांनी स्थापन झालेल्या पुणे महानगर नियोजन समितीची पहिली बैठक उद्या, गुरुवारी होत असली, तरी या समितीने पुणे जिल्ह्य़ाचा बहुतांश भाग येणाऱ्या महानगराचा स्वतंत्र आराखडा तयार करावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पीएमआरडीएची स्थापना करावी, या तरतुदींची कुठेच चर्चा होताना दिसत नाही. तसेच या समितीचेच अनेक सदस्य या तरतुदींना अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी महानगर नियोजन समिती नेमण्याचा कायदा १९९९ मध्ये राज्य सरकारने केला होता.

वैद्यकीय शिक्षक होण्यास आता खास पात्रतेची गरज; वैद्यकशिक्षण अत्यवस्थ!
पुणे, १४ जानेवारी/खास प्रतिनिधी

राज्यातील शासकीय रुग्णालयाच्या बिकट अवस्थेबद्दल सध्या ओरड होत आहेच. त्याच्या जोडीला वैद्यकीय शिक्षणाची स्थितीही अत्यवस्थ असल्याबद्दल पुण्यात आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. प्राध्यापकांच्या भरतीमधील अनुशेष, गरजेपेक्षा कमी प्राध्यापक असल्याने अध्यापनाच्या दर्जावर होणारा विपरीत परिणाम, खासगी महाविद्यालयांमध्ये आर्थिक पिळवणूक होत असल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या तक्रारी या पाश्र्वभूमीवर राज्यातील वैद्यकशिक्षणाची दिवसेंदिवस अधोगतीच होत आहे, अशा शब्दांत सहभागी अधिष्ठात्यांनी खंत व्यक्त केली.

बनावट एटीएम कार्डाद्वारे सात लाखाची फसवणूक
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

चोरलेल्या माहितीच्या आधारे बँकेशी संपर्क साधत बनावट एटीएम कार्ड तयार करून, भामटय़ाने त्याद्वारे एका आयटी अभियंत्याची सात लाख सतरा हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. आयसीआयसीआय बँकेच्या औंध येथील शाखेत तसेच पुण्यासह मुंबईच्या अनेक एटीएम केंद्रांमध्ये आठ ते बारा जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडला. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या जितेंद्र गोपाळ कानिटकर (वय ३९, रा. न्यू अजंठा अॅव्हेन्यू, पौड रस्ता) या आयटी इंजिनिअरला बँकेच्या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे. कानिटकर यांनी चतु:शृंगी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिटकर हे एका खासगी कंपनीमध्ये कामाला असून आयसीआयसीआय बँकेमध्ये त्यांचे बचत खाते आहे.कानिटकर यांच्या एटीएम कार्डाचा महत्त्वपूर्ण ‘पिन क्रमांक’ही भामटय़ाने यानंतर बदलून घेतला. त्यानंतर भामटय़ाने कानिटकर यांच्या नावाने बँकेला पुन्हा संपर्क साधून आपल्याला नवे एटीएम कार्ड घ्यायचे असल्याचे सांगितले. कानिटकर यांच्या नाव व पत्त्याने मात्र स्वत:चे छायाचित्र लावून तयार केलेल्या बनावट वाहनपरवान्याचा वापर भामटय़ाने नवे एटीएम कार्ड मिळविण्यासाठी केला. हे कार्ड घेण्यासाठी भामटा स्वत: बँकेच्या औंध शाखेमध्ये गेला होता. या कार्डाच्या आधारे भामटय़ाने शहरातील मॉलमध्ये खरेदी केली. पुण्यासह मुंबईच्या अनेक एटीएम केंद्रांमधून भामटय़ाने कानिटकर यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतली. दरम्यान, कानिटकर हे सोमवारी आपल्या एटीएम कार्डाद्वारे बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले असता, कार्ड बंद करण्यात आल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. कानिटकर यांच्या फसवणूकप्रकरणी आयसीआयसीआय बँककडून अंतर्गत चौकशी करण्यात आल्याची माहिती, बँकेचे कॉर्पोरेट अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख चारुदत्त देशपाडे यांनी दिली.

अनोख्या सत्काराने साजरा मकर संक्रांतीचा सण!
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

वैकुंठ स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून व त्यांना ब्लँकेट देऊन तिळगुळ समारंभ साजरा करण्यात आला.
निनाद, राष्ट्रीय कला अकादमी, दै.लोकसत्ता व नगरसेविका शुभदा जोशी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. दरवर्षी देवदिवाळीला सेवकांचा सत्कार समारंभ होतो. परंतु या वेळी मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आलेला हा कार्यक्रम मकरसंक्रांतीचे निमित्त साधून साजरा करण्यात आला. या वेळी सर्व सेवकांना दै. लोकसत्ताच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्यात आले. या कार्यक्रमाला कसबा- विश्राम क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त सुरेश जगताप, लोकसत्ताचे मुख्य बातमीदार सुनील माळी, उपमुख्य बातमीदार सुनील कडूसकर, निनाद संस्थेचे उदय जोशी, रामलिंग शिवणगे, रंजन पिंगळे, किरण वाईकर, प्रशांत संत, नगरसेविका शुभदा जोशी उपस्थित होत्या. नागरिकांच्या दुखात सहभागी होणाऱ्या या सर्व सेवक व सेविकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच गेली दहा वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे शुभदा जोशी यांनी सांगितले. जगताप यांनी त्यांच्या मनोगतात सेवकांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाला नागरिक व सेवकांचे नातेवाईक उपस्थित होते. उदय जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मंदार रांजेकर यांनी आभार मानले.

पुणे-निजामुद्दीन-पुणे रेल्वेच्या फे ऱ्या वाढविण्याचा निर्णय
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणे-निजामुद्दीन-पुणे अतिजलद रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या फेऱ्यांसाठी सोडल्या जाणाऱ्या गाडीचा क्रमांक ४७७ असून, ती दर शुक्रवारी पुण्याहून सुटेल. ही गाडी जानेवारीमध्ये १५, २२ व २९ या तारखांना तर फेब्रुवारीमध्ये ६ व १३ या तारखांना सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे निजामुद्दीनहून सुटणाऱ्या गाडीचा क्रमांक ४७८ असून, ही गाडी दर गुरुवारी सुटेल. या गाडीचे आरक्षण १५ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. या गाडीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग वातानुकूलित आठ द्वितीय वर्ग आरक्षित चार द्वितीय वर्ग विना आरक्षण दोन एसएलआर मिळून १८ कक्ष आहेत. ही गाडी पुण्याहून दुपारी २.१० ला सुटून निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी ४.४० ला पोहोचेल. निजामुद्दीनहून निघणारी गाडी सकाळी ८.५५ वाजता सुटून पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता पोहोचेल.

ग्रेट डेन स्पेशालिटी शोचे आयोजन
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

दि ग्रेट डेन क्लब ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागामार्फत सतरा जानेवारीला म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे पहिले ग्रेट डेन स्पेशालिटी शोचे आयोजन करण्यात आले आहे. जर्मनीतील ‘ग्रेट डेन’ जातीच्या कुत्र्यांचा या शो मध्ये समावेश केला जाणार आहे. या जातीच्या कुत्र्यांची स्पर्धेतून एका उत्कृष्ट कुत्र्याची निवड केली जाईल. चेन्नईतील आतंरराष्ट्रीय परीक्षक सी. व्ही. सुदर्शन हे या शो चे परीक्षण करणार आहेत. सुमारे पन्नास स्पर्धक कुत्र्यांची प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या स्पर्धेत कुत्र्यांची उंची, वजन, दिसणे यासारख्या विविध गोष्टींचा विचार केला जाणार आहे, अशी माहिती क्लबच्या गीताली टिळक, मयुरेश थिटे आदींनी दिली.

काँग्रेसच्या विकास यात्रेचा आज पुण्यात समारोप
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या जनजागरण विकास यात्रा मोहिमेचा समारोप १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी आज जाहीर केले.
या समारोप समारंभानिमित्ताने मुख्यमंत्री प्रथमच पुण्यात सभेसाठी येत असल्याने जोरात तयारी सुरू असल्याचे छाजेड यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत या समारंभाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार सुरेश कलमाडी, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री पतंगराव कदम, जयवंतराव आवळे आदी उपस्थित राहणार आहेत.जनजागरण विकास यात्रा मोहिमेंतर्गत शंभर सभांचे नियोजन पुणे शहर काँग्रेसने केले होते. त्यापैकी ९० सभा पार पडल्या असून, उर्वरित सभांचे आयोजन येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले. त्यांचा समारोप समारंभ नाना पेठ येथील डॉ. आंबेडकर विद्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे.

‘बांधकाम व्यावसायिकांनी मानसिकता बदलावी’
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकांनी आपली नफेखोरीची मानसिकता बदलून समाजहिताच्या दृष्टीने तडजोड करायला हवी. येत्या तीनचार महिन्यांत बांधकाम व्यावसायिकांनी वास्तवाशी जुळवून घेतले नाही, तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल व घरी बसण्याची वेळ येईल, असे मत बांधकाम व्यावसायिक भास्करराव म्हस्के यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मंदीमुळे सिमेंट, पोलाद यांचे भाव उतरले आहेत. परप्रांतीय कामगार पुन्हा कामावर येत आहेत. अशा वेगवेगळ्या घडामोडींमुळे ज्यांना बांधकाम करावयाचे आहे, त्यांच्यासाठी हीच सुवर्णसंधी असून, सध्या सातशे रुपये चौरस फूट या भावाने अतिशय उत्कृष्ट काम करणे शक्य आहे. त्यामुळे नफेखोरीला बाजूला ठेवून सध्याच्या परिस्थितीमध्ये तडजोड करून काम केल्यास बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगले दिवस असतील. चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविल्यामुळे मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण पडणार आहे. त्यामुळे एफएसआय वाढविणे हा त्यावरील मार्ग नव्हे. त्याचबरोबर झोपडपट्टीवासीयांना दोनशे किंवा तीनशे चौरस फूट घरे देऊन त्यांचा प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना जास्त क्षेत्रफळ देऊन शहराबाहेर जागा द्याव्यात व आज जे मध्यवस्तीत राहतात त्यांना व्यापारी तत्त्वावर नुकसान भरपाई देऊन हा प्रश्न सोडण्यास मदत होईल. शहराबाहेरील नवीन समाविष्ट झालेल्या व होणाऱ्या गावांना एफएसआय वाढवून द्यावा. त्यासाठी वाहतूक व्यवस्था प्रबळ केल्यास माणसं बाहेर घरे घेण्यासाठी उत्सुक होतील. याबरोबरच शहरातल्या जागा या शेतीसाठी नव्हेत तर घरबांधणीसाठी असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. एप्रिल, मे व जून हा काळ विविध घडामोडींमुळे घरबांधणी क्षेत्रासाठी अत्यंत मंदीचा राहणार असून, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मंदी स्थिर होईल. याच काळात घरांच्या किमती कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्यांना ते घेणे शक्य होईल. परंतु बांधकाम व्यावसायिकांची विविध दाखले मिळविण्यासाठी होणारी धावपळ व अधिकाऱ्यांकडून घेतले जाणारे पैसे या दोन गोष्टी थांबविण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे आवश्यक आहे.

पर्यटन महामंडळाचा आरोप; कात्रज तलावातील ‘बोटिंग’ बंद पाडण्याचा डाव!
पुणे, १४ जानेवारी / खास प्रतिनिधी

कात्रज तलावात मगर आढळल्यामुळे मनुष्यहानी होण्याची भीती दाखवून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळामार्फत चालविण्यात येणारे जलक्रीडा केंद्र कायमचे बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप महामंडळाने केला आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र महामंडळाने महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. कात्रज तलावात सुमारे दोन महिन्यांपूर्वी मगर दिसली. मगरीच्या तलावातील वास्तव्यामुळे महामंडळाचे बोटिंग बंद करावे असे पत्र महापालिकेने दिले. त्यानंतर आजतागायत मगरीचा तपास लागू शकला नाही. उजनी धरणातील मच्छीमारांनी ही मगर पकडण्याची तयारी दर्शविली. परंतु त्यासाठी काही अटी घातल्या. या अटींवर निर्णय होऊ न शकल्याने मगर पकडण्याच्या हालचाली होऊ शकल्या नाहीत. कात्रज तलावात जलक्रीडा करण्याबरोबच मच्छीमारी करण्यासही बंदी घालण्यात आली होती. या विषयावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली आणि या मच्छीमारांची उपासमार होत असल्याने त्यांना मासे पकडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे महामंडळालाही बोटिंग सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. तलावात दोन महिन्यांपूर्वी मगर आली होती. तेव्हापासून महामंडळाचे बोटिंग बंद करण्यात आले आहे. कात्रज तलावात महामंडळाच्या अठरा पॅडल बोट आहेत. त्यापासून मिळणाऱ्या सुमारे चार लाखांच्या उत्पन्नाला महामंडळाला मुकावे लागले आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुख्य म्हणजे या तलावात मगर आली कोठून हा प्रश्न आहे. ही मगर पकडल्याशिवाय बोटिंग सुरू करायचे नाही असा पवित्रा महापालिकेने घेतला आहे. पालिकेचे उपायुक्त दर्जाचे एक अधिकारी या संदर्भात महापालिका आयुक्तांची दिशाभूल करतात. महामंडळाचे बोटिंग बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

कर्नल पुरोहित यांचा जामीन फेटाळला
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिलेल्या विविध प्रमाणपत्रांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, मिलिंद दाते यांच्या नावाचे मूळ शस्त्र परवाना जप्त करण्याचे कारण देत न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज आज फेटाळून लावला. दहशतवाद विरोधी कारवायांसंदर्भातील खटल्याच्या विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या न्यायालयात गेल्या महिन्यापूर्वी कर्नल पुरोहित यांच्या जामीनअर्जाच्या सुनावणीस प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी वकील अॅड. एस. एम. जगताप यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. पुरोहित यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे अॅड. जगताप यांनी न्यायालयात सांगितले. पुरोहित यांच्याविरोधात मिलिंद यशवंत दाते यांनी तक्रार दिली होती.पुरोहित यांच्या वतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद करताना सांगितले, पुरोहित यांना नाशिक व अन्य ठिकाणच्या खटल्यात जामीन मिळाल्याने त्यांना येथील खटल्यात जामीन द्यावा. खोटी माहिती देणे बनावट नसून दोनदा तपास पूर्ण झाला नाही म्हणून वेळ वाढवून घेण्यात आली. पुरोहित यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच दंड भरण्याचे आवाहन
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या दुचाकी, तीन चाकी तसेच चारचाकी संबंधित कार्यालयांमध्ये दंड भरल्यानंतर नागरिकांना तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच यासंबंधी दंड भरावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दुचाकींसाठी (दंड, टोइंग शुल्क) शंभर व पन्नास रुपये, तीनचाकींसाठी शंभर व शंभर तसेच चारचाकींसाठी शंभर व दोनशे रुपये असा अनुक्रमे दीडशे, दोनशे व तीनशे रुपयांचा दंड संबंधित नागरिकांनी भरावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी केले आहे. दंडाच्या व टोइंग शुल्काची पावती वेगवेगळीच घ्यावी तसेच हा दंड सहायक पोलीस फौजदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडेच भरावा, असेही पाटील यांनी सांगितले आहे. दंड भरून वाहन सोडवून घेण्यासाठी नागरिकांना जादावेळ थांबावे लागणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली आहे.

सर्वधर्मीय तिळगूळ समारंभाचे आयोजन
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

लावणी, गरबा, भांगडा, ओडिसी कथ्थक या विविध नृत्यांबरोबरच ‘भारत हमको जान से प्यारा है’ ‘सबसे आगे होंगे हिंदुस्तानी’ या देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून बहुसांस्कृतिक देशाच्या चिमुकल्या नागरिकांनी भारतमातेच्या व तिरंग्याच्या साक्षीने तिळगुळाच्या रूपाने प्रेमाचे वाटप करून सर्व धर्मातील लोकांना एकमेकांमधील बंधुभावाचा गोडवा कायम टिकविण्याचा संदेश दिला. निमित्त होते अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वधर्मीय तिळगूळ समारंभाचे’. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय तिळगूळ समारंभामध्ये ‘सॅल्यूट टू इंडिया’ हा गीत, संगीत, नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अॅलन परेरा, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, पुणे मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, तसेच मोहिंदर कंधार, मोहन भांबल, विमल मोटा आदी उपस्थित होते. माणसामाणसामधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण व्हावा यासाठी या छोटय़ा कलाकारांनी विविध प्रांतातील वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन घडविले. त्याचबरोबर मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व जवानांना चिमुकल्यांनी सलाम केला.