Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
राज्य

मंत्र्यांच्या तालुक्यांत विकास, बाकी सारेच भकास!
धनंजय जाधव

पाचवीला पूजलेला दुष्काळ, पावसाच्या भरवशावरील शेती, रोजगाराचा अभाव आणि फक्त कागदावर साकारलेल्या योजना असे जिल्ह्य़ाचे एक चित्र, तर दुसरीकडे अत्याधुनिक शेतीची प्रतीक असलेली ग्रीन हाऊसपासून माहिती-तंत्रज्ञान पार्क ते चकाचक कॉर्पोरेट कार्यालये.. एकीकडे आदिवासी पाडय़ांत वर्षांनुवर्षे भेडसावणारी कुपोषणाची समस्या, तर शहरालगत वाढलेली पिझ्झा-बर्गर संस्कृती.. एकाच जिल्ह्य़ातील हे वास्तव- वजनदार मंत्र्यांचे तालुके विकसित अन् राजकीयदृष्टय़ा मागास असलेले तालुके भकास!

सातपुडय़ातील आदिवासींचे दु:ख साहित्यातून व्यक्त व्हावे- महानोर
नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन

शहादा, १४ जानेवारी / वार्ताहर

सातपुडय़ातील आदिवासींचे दु:ख, दैन्य, वेदना साहित्यातून व्यक्त होण्याची गरज व्यक्त करताना एकलव्याचे दु:ख परिसरातील साहित्यिकांनी मांडावे, अशी अपेक्षा नंदुरबार येथे आयोजित पहिल्या जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित होते. प्रारंभी स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, संमेलनाध्यक्ष डॉ. पितांबर सरोदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित, डॉ. मु. ब. शहा, अनिल सोनार, डॉ. विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्याच्या कामी येणे हेच खरे अध्यात्म - डॉ. लहाने
बीड, १४ जानेवारी/वार्ताहर

‘‘मुलगा कितीही वाईट असला तरी आई त्याची जन्मभर काळजी घेते. त्यामुळे पृथ्वीवर आई हाच देव आहे. मला किडनी देऊन आईने पुनर्जन्म दिल्यामुळे उर्वरित आयुष्यात गरीब आणि गांजलेल्या माणसांची सेवा करण्याचे मी ठरविले. जीवनात दुसऱ्याच्या कामी पडणे हेच खरे अध्यात्म आहे आणि तीच संतपरंपरा आहे, असे मला वाटते,’’ अशा शब्दांत डॉ. तात्याराव लहाने यांनी भावना व्यक्त केल्या. कीर्तन महोत्सवात सोमवारी सायंकाळी ‘माझे अध्यात्म’ या विषयावर डॉ. लहाने यांनी व्याख्यान दिले.

कृपाभय्यांचे मनसेच्या बालेकिल्ल्यात गोदास्नान !
नाशिक, १४ जानेवारी / प्रतिनिधी

छटपूजेच्या निमित्ताने स्थानिक विरुद्ध परप्रांतिय असा रंगलेला वाद ताजा असतानाच मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून मुंबईतील उत्तर भारतीयांचे ‘मसिहा’ म्हणून ओळख असलेल्या कृपाशंकरसिंह यांनी थेट मनसेच्या बालेकिल्ल्यात, नाशिकमध्ये शिरकाव करीत सहकुटुंब गोदास्नानाची अनुभूती घेतली. गंगा-गोदावरी मंदिरात पूजाअर्चा करून काळाराम मंदिरात माथा टेकल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले. छटपूजेच्या निमित्ताने परप्रांतिय आपले शक्तीप्रदर्शन करीत असल्याचा आक्षेप घेत राज ठाकरे यांनी मध्यंतरी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात तसेच देशातही हा वादाचा विषय बनला. त्यावरून रंगलेल्या परप्रांतिय विरोधी मोहिमेचे सर्वाधिक तीव्र व हिंसक पडसाद मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उमटले होते.
या पाश्र्वभूमीवर, मकर संक्रांतीच्या दिवशी भल्या सकाळी कृपाभय्या कुटुंबियांसमवेत थेट गोदाकाठी दाखल झाल्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल यांनी कृपाभय्यांचे पौरोहित्य केले.सिंह परिवाराने रामकुंडावर गोदावरीची विधीवत पूजा करून इतर धार्मिक विधीही यथासांग पार पाडले. मकर संक्रांतीनिमित्त गोदावरी किनारी आज सकाळपासूनच भाविकांची स्नानासाठी गर्दी झाली होती. त्यातच सकाळी नऊच्या सुमारास अचानक तेथे पोलीस बंदोबस्त तैनात झाला व पाठोपाठ कृपाभय्यांचे आगमन झाले. ते पाहून उपस्थितांमध्ये कृपाभैयांनी संक्रमणाच्या दिवशी नेमका मनसेच्या गडाचा वापर का केला असावा, याबाबत चर्चा सुरु होती.

पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘आयएम’ अतिरेक्याचा जनवाडीत आसरा
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

इंडियन मुजाहिदीन तसेच सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या टोळ्या पुण्यातून अटक झाल्यानंतर पोलिसांसह तपास व गुप्तचर यंत्रणांचे लक्ष कोंढवा भागात केंद्रित झाले होते. त्यामुळे या यंत्रणांना चकवा देण्याच्या उद्देशाने हुसैन शब्बीर मोहिद्दीन गंगावली या नुकत्याच अटक झालेल्या इंडियन मुजाहिदीन (आयएम)च्या अतिरेक्याने जनवाडीसारख्या जातीय तणावाच्या दृष्टीने गेली ३५ वर्षे संवेदनाक्षम ठरलेल्या भागात आसरा घेतल्याचे उघड झाले आहे.गंगावलीवर कर्नाटकातही गुन्हे दाखल असल्याने कर्नाटकातून आलेल्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली. त्यात गंगावली हा ‘इंडियन मुजाहिदीन’च्या प्रमुख नेत्यांच्या घनिष्ट संपर्कात होता, असे उघड झाले आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी कर्नाटक पोलीस लवकरच पुण्यात येणार आहेत. ‘इंडियन मुजाहिदीन’चा प्रमुख सूत्रधार रियाज भटकल, त्याचा भाऊ इकबाल भटकल आणि अहमद यासीन यांना गंगावलीने बनावट नोटा पुरविल्याचेही उघड झाले आहे.‘सिमी’ आणि इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना पुण्यात अटक झाली होती. अटक झालेले हे तरुण बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली बॉम्बस्फोटांमध्ये सामील असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर कोंढवा व घोरपडे पेठ भागामध्ये पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले होते.

३३८ घोटाळेबाज पतसंस्थांवर फौजदारी गुन्हे
पुणे, १४ जानेवारी / खास प्रतिनिधी

लेखापरीक्षणामध्ये फेरफार करून आर्थिक स्थिती भक्कम दाखविणाऱ्या राज्यातील ३३८ सहकारी पतसंस्थांवर सहकार खात्याने गुन्हे दाखल केले असून, असे खोटे लेखापरीक्षण अहवाल देणाऱ्या ९५ लेखापरीक्षकांची सनद रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लेखापरीक्षण अहवालात गोलमाल करून आर्थिक स्थिती भक्कम दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यातील ४६२ पतसंस्था अडचणीत सापडल्या आहेत. या पतसंस्थांमध्ये सामान्य ठेवीदारांचे कोटय़वधी रुपये अडकले आहेत. काही पतसंस्थाचालकांनी आपला गाशा गुंडाळून सामान्यांच्या ठेवी बुडविण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. पतसंस्थांमधील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी कोणत्याही संचालकांवर कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर सहकार खात्याने अशा घोटाळेबाज पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण करून त्यात सामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतसंस्थांमध्ये मुंबईतील २२, कोकणातील २७, पुणे११, कोल्हापूर ३८, नाशिक ३१, औरंगाबाद पाच, लातूर आठ, अमरावती ११ व नागपूरमधील सहा पतसंस्थांचा समावेश आहे. या पतसंस्थांच्या १,८०७ संचालकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुणवत्ताधारक शिक्षकांची आज खरी गरज झ्र् काळे
लातूर, १४ जानेवारी/वार्ताहर

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व्यवसायाशी निष्ठा ठेवणाऱ्या गुणवत्ताधारक शिक्षकांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. निलंगा तालुका खासगी शालेय शिक्षण मंडळाच्या वतीने येथील महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात आयोजित गुणवत्ता विकास कार्यशाळेचे उद्घाटन श्री. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ होते. मार्गदर्शक प्राचार्य अनिरुद्ध जाधव होते. या वेळी मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील, शिक्षणाधिकारी एल. एम. धुळे, एस. डब्ल्यू. चंदनशिवे, गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार, प्राचार्य डी. टी. मुंगळे आदी उपस्थित होते. श्री. काळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेच्या स्पर्धेत यावा याकरिता शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी व व्यवसायाशी निष्ठा ठेवून काम करणे आवश्यक आहे. गुणवत्ता वाढीसाठी व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यशाळा उपयुक्त आहेत. प्राचार्य जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी गुणवत्तेच्या विविध पैलूंचा अभ्यास करून त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. केवळ निकाल म्हणजे गुणवत्ता नसून स्वत:च्या गुणवत्तेवर आजच्या स्पर्धेत यशस्वी होणारा विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून तयार होणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी गरजेपुरते खत साठवून ठेवावे - वरपूडकर
परभणी, १४ जानेवारी/वार्ताहर

सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भविष्यातील रासायनिक खतांची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच गरजेपुरते खताचा साठा करून ठेवावा, असे आवाहन कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी केले. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात वरपूडकर बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महेश फड, उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे, आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार व्यंकटराव कदम, सोनपेठचे नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, उपनगराध्यक्ष सुदाम काळे, बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर, उपसभापती सूर्यवंशी, लातूरचे कृषी सहसंचालक जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर उपस्थित होते. श्री. वरपूडकर यांनी आरोग्य पत्रिकेचे प्रकाशन केले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ७१ हजार कोटी रुपये कृषी कर्जमाफी व कर्जफेड सवलत योजना जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याला किमान २० हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे, असे श्री. वरपूडकर म्हणाले. दिवेकर यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली.

चवदार रामफळ यंदा काहीसे महाग
संजय शहापूरकर
सोयगाव, १४ जानेवारी

चवदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामफळाच्या उत्पादनात तालुक्यात यंदा घट आल्याने किमतीत वाढ झाली आहे. सीताफळाचे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या तालुक्यात रामफळाचे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. त्याच्या सीताफळासारख्या बागा मात्र नाहीत. सीताफळापेक्षा मोठय़ा आकाराचे रामफळ नारळाएवढे असते. रामफळाची चव सीताफळापेक्षाही चवदार असते; त्यामुळे याला मागणीही असते. रामफळाची अनेक झाडे फळांनी लदबदली होती. पण अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. शेताच्या बांधावर असलेल्या रामफळाच्या झाडापासून मिळणाऱ्या रामफळाची किंमत नगाला १० ते १५ रुपयांपर्यंत आहे. रामफळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना रामफळ विक्रीसाठी बाजारात जावे लागत नाही. ग्राहक त्याच्या शेतात जाऊन रामफळ खरेदी करतात. शेती उद्योगात रामफळच एक फळ आहे ज्याला खरेदी करण्यासाठी ग्राहक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खरेदी करतात. कारण रामफळाची गोड चव आहे. सीताफळाएवढी आर्थिक उलाढाल रामफळाची होत नसली तरी भविष्यात रामफळाच्या बागा लावण्याचा अनेक शेतकऱ्यांचा मनोदय आहे.

रविवारी होमिओपॅथी परिषद
बारामती, १४ जानेवारी / वार्ताहर

महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर्स फोरमतर्फे १८ जानेवारी रोजी एक दिवसीय होमिओपॅथी परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून आरोग्य राज्यमंत्री, डॉ. शोभाताई बच्छाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या वेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर, उपाध्यक्ष डॉ. अजित फुंदे, ज्येष्ठ सदस्य, डॉ. दिनेश बच्छाव, जिल्हा उपनिबंधक डॉ. संजय भोसले, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या व्यावसायिक अडचणी व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री महोदयांबरोबर चर्चा होणार आहे. नोंदणीकरिता डॉ. राजीव शहा (९४२२५०१८३१) यांच्याशी संपर्क साधावा.