Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
क्रीडा

अ‍ॅडव्हान्टेज मुंबई !
झहीर खानचे सात बळी, जाफरचे नाबाद अर्धशतक
मुंबईकडे २८७ धावांची आघाडी

हैदराबाद, १४ जानेवारी / वृत्तसंस्था

पहिले दोन दिवस संघर्ष करणाऱ्या मुंबईने आज अखेर लौकिकाला साजेसा खेळ करून पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतली व दुसऱ्या डावात बिनबाद १३० धावा करून ही आघाडी २८७पर्यंत वाढवून उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी अंतिम लढतीत मजबूत पकड घेतली. काल उत्तर प्रदेशला तडाखा देणारा वेगवान गोलंदाज झहीर खान आज त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने सात विकेट घेत मुंबईचे पहिल्या डावात आघाडी मिळविण्याचे स्वप्न सत्यात उतरविले. तर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या दोन्हीही सलामीवीरांनी नाबाद अर्धशतके ठोकत उत्तर प्रदेशची कोंडी करायला सुरुवात केली आहे असून दिवसाखेर मुंबईने ३६ षटकात १३० धावा केल्या आहेत.

आता मॅथ्यू हेडन देणार कौटुंबिक जबाबदारीचे धडे
मेलबर्न, १४ जानेवारी / पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर मॅथ्यू हेडन आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना त्यांची कौटुंबिक जबाबदारी समजावून सांगणार आहे. हेडनने मंगळवारी आपली निवृत्ती घोषित केली आहे. क्रिकेट हंगामात वर्षभरातले १० महिने घरापासून लांब राहणारे खेळाडू जबाबदारी समजून घेण्यास असमर्थ असतात. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव हेडनने करून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.भविष्यात येणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूंना तो मार्गदर्शन करणार आहे. खेळाडूंमधील गुणांची जाणीव त्यांना करून देऊन त्यांचे प्रदर्शन अधिक चांगले कसे होईल, याकडेही लक्ष पुरवणार असल्याचे हेडनने ‘कुरीयर मेल’ मध्ये म्हटले आहे.

न्यूझीलंडला जायचेय, वजन वाढवा!
बीसीसीआयचा इशांत, मुनाफ, गंभीरला सल्ला

विनायक दळवी
मुंबई, १४ जानेवारी

न्यूझीलंड दौरा म्हटला की, तेथील थंडीच्या कल्पनेने भारतीय क्रिकेटपटूंना हुडहुडी भरते. मात्र आगामी न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटूंच्याआधी भारतीय क्रिकेट बोर्डानेच या थंडीवाऱ्याचा धसका घेतला आहे. या थंडीपासून खुल्या मैदानात स्वत:चा बचाव करून चांगली कामगिरी करण्याकरिता भारतीय क्रिकेट बोर्डाने काही खेळाडूंना त्यांची वजने वाढविण्याची लेखी सूचना केली आहे. इशांत शर्मा, मुनाफ पटेल, आर. पी. सिंग, गौतम गंभीर आदी खेळाडूंना तशी पत्रेही गेली आहेत.

हसनच्या अर्धशतकाने बांगलादेश विजयी
श्रीलंकेला पाच विकेट्सने नमविले

ढाका, १४ जानेवारी / एएफपी

शाकिब अल-हसनच्या झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला आणि एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यादरम्यान येत्या शुक्रवारी विजेतेपदासाठी अंतिम झुंज होईल. साखळी फेरीअखेर श्रीलंका आणि बांगलादेश संघाने बोनस गुणांसह प्रत्येकी एक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. एक लढत जिंकत झिम्बाब्वेचे चार गुण आहेत. २५ एकदिवसीय लढतीत बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध केवळ दुसरा विजय आहे. धुक्यामुळे प्रत्येकी ३१ षटकाच्या झालेल्या या लढतीत डावखुऱ्या हसनने (९२ धावा, ६९ चेंडू, १० चौकार, २ षटकार) तडफदार अर्धशतक झळकावत यजमान बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला.

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्यादोन लढती दम्बुलामध्ये रंगणार
कोलंबो, १४ जानेवारी / पीटीआय

भारत आणि श्रीलंका संघात होणाऱ्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील २८ व ३० जानेवारीला होणारे पहिले दोन सामने दम्बुला या ऐतिहासिक शहरात होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ येत्या २४ जानेवारीला कोलंबोत दाखल होण्याची अपेक्षा आहे. कोलंबोपासून १५० किलो मीटर अंतरावर असलेल्या दम्बुला शहरात दिवसा होणारे पहिले दोन सामने होण्याची शक्यता असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेल्फंट यांच्या निवडीचे फेडररकडून स्वागत
मेलबर्न, १४ जानेवारी / पीटीआय

व्यावसायिक टेनिसपटू संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅडम हेल्फंट यांच्या नियुक्तीचे जगविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर याने स्वागत केले आहे. टेनिसला आतापेक्षाही जास्त चांगले दिवस येण्यासाठी या नियुक्तीचा उपयोग होईल असे तो म्हणाला.४४ वर्षीय हेल्फंट यांना अनेक वर्षांचा खेळाचा अनुभव आहे. नाईके समवेत जेव्हा माझा करार संपला तेव्हा मला हेल्फंट यांना जवळून बघता आले. त्यामुळे असा प्रामाणिक माणूस अध्यक्ष होणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे फेडरर म्हणाला. टेनिस स्पर्धेत दिली जाणारी बक्षिसांची रक्कम वाढवण्याची गरज असल्याचे मत फेडररने यावेळी व्यक्त केले. टेनिस स्पर्धाच्या संख्या कमी आहेत , याकडेही फेडररने लक्ष वेधले. त्यामुळे नवीन अध्यक्ष याकडे लक्ष पुरवतील,अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

सातत्यपूर्ण खेळाबाबत सानिया आशावादी
नवी दिल्ली, १४ जानेवारी/पीटीआय

अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी मला आणखी थोडा कालावधी लागेल, असे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सांगितले. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी होबार्ट येथून दूरध्वनीवरून बोलताना ती म्हणाली की, मी सध्याच्या कामगिरीबाबत समाधानी आहे. मात्र पूर्वीसारखे यश प्राप्त करण्यासाठी मला एक-दोन महिन्यांचा सराव आवश्यक आहे. पूर्वीइतका सर्वोत्तम दर्जाचा खेळ मी सध्या करू शकत नाही.

हॉकीत भारताला संमिश्र यश
सिडनी, १४ जानेवारी/वृत्तसंस्था

भारतीय युवक संघाने चार देशांच्या ऑलिम्पिक युवा क्रीडा महोत्सवात आज पुरुषांच्या हॉकीत ऑस्ट्रेलियावर २-१ अशी मात केली. मात्र मुलींच्या गटात भारतास इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
इंग्लंडने भारतावर ३-१ असा आकर्षक विजय नोंदवला. चुरशीने झालेल्या लढतीत इंग्लंडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पासिंगचा खेळ करीत विजयश्री संपादन केली. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मनदीप अंतील व कर्णधार दिवाकर राम यांनी भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. या सामन्यात प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. अकराव्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीस भेदण्यात यश मिळविले. अंतील याने अप्रतिम फटका मारून भारताचे खाते उघडले.या गोलनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक चाली सुरू ठेवल्या. अखेर २५ व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत रामने संघाचा दुसरा गोल नोंदवला.
पूर्वार्ध संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने जोरदार चाली केल्या. परंतु भारताचा गोलरक्षक मृणाल चौबे याने या चाली रोखण्यात यश मिळविले. उत्तरार्धात ऑस्ट्रेलियास ६६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्रिस्टॉन व्हाईट याने गोल करीत सामन्यात चुरस निर्माण केली. शेवटच्या पाचच मिनिटांत ऑस्ट्रेलियाला गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले. भारताची उद्या इंग्लंडशी गाठ पडणार आहे.

हेल्फंट यांच्या निवडीचे फेडररकडून स्वागत
मेलबर्न, १४ जानेवारी / पीटीआय

व्यावसायिक टेनिसपटू संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅडम हेल्फंट यांच्या नियुक्तीचे जगविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर याने स्वागत केले आहे. टेनिसला आतापेक्षाही जास्त चांगले दिवस येण्यासाठी या नियुक्तीचा उपयोग होईल असे तो म्हणाला.४४ वर्षीय हेल्फंट यांना अनेक वर्षांचा खेळाचा अनुभव आहे. नाईके समवेत जेव्हा माझा करार संपला तेव्हा मला हेल्फंट यांना जवळून बघता आले. त्यामुळे असा प्रामाणिक माणूस अध्यक्ष होणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे फेडरर म्हणाला. टेनिस स्पर्धेत दिली जाणारी बक्षिसांची रक्कम वाढवण्याची गरज असल्याचे मत फेडररने यावेळी व्यक्त केले. टेनिस स्पर्धाच्या संख्या कमी आहेत , याकडेही फेडररने लक्ष वेधले. त्यामुळे नवीन अध्यक्ष याकडे लक्ष पुरवतील,अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

सुपर कप बॉक्सिंग स्पर्धा मुंबईत रंगणार
मुंबई, १४ जानेवारी/क्री.प्र.

मुंबईत १७ ते २१ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील तिसरी सुपरकप बॉक्सिंग स्पर्धा रंगणार असल्याने मुंबईकरांना दर्जेदार बॉक्सिंगची मेजवानी मिळणार आहे. भारतातील १६ बलाढय़ विभागीय संघ या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याने या स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारत या संघांनी सुपर कप स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. मात्र या सर्वामध्ये पूर्व विभागानेच पारडे जड दिसते आहे. आमचे बॉक्सर्स पूर्ण भरात असल्याने आमचा संघ या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची लूट करील, असे पूर्व विभाग संघाचे सचिव अनिल बोहिदार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.दरम्यान, भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रमुख प्रशिक्षक जी. एस. संधू यांनी पतियाळा येथे सुरू असलेल्या शिबिरातील मुलांचा संघही या स्पर्धेत उतरविणार असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या सुपरकप स्पर्धेतील अन्य बलाढय़ संघांना आपले शिबिरार्थी कितपत आव्हान देतात याची चाचपणी करण्याचा त्यांचा मानस आहे. या स्पर्धेत सेनादल किंवा रेल्वे आपला एकच संघ उतरवू शकते. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा चांगल्या बॉक्सर्सना या संघात स्थान मिळू शकत नाही. मात्र या संघात निवड न झालेले बॉक्सर्स सुपरकप स्पर्धेसाठी आपल्या विभागीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या आपल्या बॉक्सर्सना या स्पर्धेत सुरुवातीपासूनच तुल्यबळ लढत मिळू शकतील.

बॅडमिंटन : अरविंद भट दुसऱ्या फेरीत
सेऊल, १४ जानेवारी / पीटीआय

येथे सुरू असलेल्या योनेक्स कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी संमिश्र दिवस ठरला. अरविंद भटने दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना भारताच्याच चेतन आनंदला २१-१२, २१-१३ असे नमविले. मिश्र दुहेरीत व्ही. दिजू व ज्वाला गट्टा यांनीही सलामीची लढत जिंकली. भारताच्या इतर खेळाडूंना एकेरीत पराभव सहन करावा लागला. पी. कश्यपला पोलंडच्या वाछा झेमिस्लाव्हने २१-११, २१-१७ असे नमविले. झेमिस्लाव्हची पुढील फेरीत अरविंद भटशी गाठ पडणार आहे. अनुप श्रीधरलाही पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता पाहावा लागला. हाँगकाँगच्या एनजी वेईने २१-२३, २१-१७, २४-२२ असे नमविले. पहिला गेम जिंकल्यानंतरही श्रीधरला ही लढत गमवावी लागली. आनंद पवारला मलेशियाच्या मोहम्मद आरिफ अब्दुल लतिफकडून १४-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या एकेरीत आदिती मुटाटकरला मलेशियाच्या जुलिआ पेई झियान वाँगकडून ९-२१, १५-२१ अशी मात सहन करावी लागली. आता भारताच्या अपेक्षा सायना नेहवालवर अवलंबून आहेत. तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.

सानिया-शियाव्होन सलामीलाच पराभूत
होबार्ट, १४ जानेवारी / पीटीआय

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा व फ्रान्सेस्का शियाव्होन या जोडीला येथे सुरू असलेल्या होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. स्पेनच्या आरांता पॅरा सॅन्टोन्या व एडिना गॅलोविट्स (रूमानिया) या जोडीने त्यांना नमविले. सानिया व शियाव्होन या जोडीला ५-७, १-६ असा पराभव पत्करावा लागला. या जोडीने मिळालेल्या एकाही ब्रेकपॉइंटचे रूपांतर विजयी गुणात केले नाही. उलट प्रतिस्पर्धी जोडीने चारपैकी तीन संधी अचूकपणे साधल्या. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे सानियाला ७० गुण मिळाले असून आता सानिया मेलबर्न येथे १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.

सोमदेव देववर्मनची विजयी सलामी
ऑस्ट्रेलियन ओपन पात्रता फेरी
मेलबर्न, १४ जानेवारी / पीटीआय

चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारतीय टेनिस वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सोमदेव देववर्मनने येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन पात्रता फेरीत दुसरी फेरी गाठली आहे. २८वे मानांकन मिळालेल्या सोमदेवने भारताच्याच प्रकाश अमृतराजला ६-४, ३-६, ६-४ असे नमविले. जागतिक टेनिस क्रमवारीत १५४व्या स्थानावर असलेल्या सोमदेवची गाठ पोलंडच्या २०७वे मानांकन असलेल्या लुकाझ कुबोटशी पडणार आहे.भारताची सुनिता राव हिची पात्रता फेरीतील सलामीची झुंज उद्या होत आहे.

स्वामी समर्थ विजयी
कबड्डी
मुंबई, १४ जानेवारी/क्री.प्र.

नितीन गिजे व सुहास बाणे या अव्वल दर्जाच्या वामनमूर्ती खेळाडूंनी ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेतील चौथा दिवस गाजविला. ही जोडी भन्नाट खेळली. त्यांच्यामुळेच स्वामी समर्थ क्रीडा मंडळाला वीर बजरंगचा २७-२३ असा पराभव करता आला. सचिन सावंत आणि सुहास परब यांनी पहिल्या दहा मिनिटांत दर्जेदार चढाया केल्या.शिवसेना शाखा क्र. ९० च्या सहकार्याने निर्मल नगर (खार) पोलीस स्टेशनजवळील मैदानावर कै. वसंतराव कोलगावकर स्मृती चषकासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यातील सामने चुरशीच्या लढतीने गाजत आहेत. एकाच मैदानावर पाच सामने नियोजित वेळेवर खेळविण्याची करामत यजमान संस्थेचे अध्यक्ष बबन होळकर आणि सरकार्यवाह एकनाथ जाधव यांनी केली. त्यांचा हा आदर्श उपनगरातील अन्य संस्थांनी आपल्यापुढे ठेवला तर बरे होईल.पुरुष गटातील दुसऱ्या एका सामन्यात कुल्र्याच्या अंबिका सेवा मंडळ या मातब्बर संघाने जोगेश्वरीच्या स्फूर्ती क्रीडा मंडळाचा ३०-९ असा आरामात पराभव करून आपली विजयी दौड कायम राखली. योगेश येले, योगेश कांचन यांनी चौफर चढाया केल्या.महिला गटात रेल्वे लाईन्स संघाने अभय मंडळाला ४६-१५ असे ३१ गुणांनी हरवितांना मीनाक्षी शिंदे, चित्रा जाधव यांनी अष्टपैलू खेळ केला. रेल्वे लाईन्सचा एकूण खेळ पाहाता त्यांना अंतिम फेरी गाठणे फारसे अवघड जाईल, असे दिसत नाही. क्षेत्ररक्षण आणि आक्रमण या दोन्ही बाजू समर्थपणे लढविणाऱ्या साऱ्याचजणी खेळत आहेत. आता या संघाला उपान्त्य फेरीचा सामना करावा लागेल. तो कुल्र्याच्या गोरक्ष संघाशी!
गोरक्षने चौथ्या दिवशी प्रथम श्रीसाईला २०-७ असे हरविले. तासाभराच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या सामन्यात चेंबूर केंद्राला २०-७ असे पराभूत केले.

अशोक पंडितना कांस्य
राष्ट्रीय नेमबाजी
मुंबई, १४ जानेवारी/क्री.प्र.

थोडुपुझ्झा, केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत स्टॅण्डर्ड पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या अशोक पंडित यांनी ५६७ गुणांसह एकेरीचे कांस्यपदक जिंकले. या गटात सेनादलाचा विजयकुमार व सीएसएफचा समरेश जंग यांच्यात ५७३ गुणांवर बरोबरी झाली होती. मात्र शेवटी विजयकुमारने सुवर्णपदक निश्चित केले तर समरेशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात सांघिक सुवर्णपदकही सेनादलालाच मिळाले. विजयकुमार, एस. के. चौधरी व गुरप्रित सिंग यांनी १६९० गुणांसह सेनादलाला सुवर्ण जिंकून दिले. सीमा सुरक्षा दलाल रौप्य तर एअर इंडियाला कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राला १६५४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. निकाल : स्टॅण्डर्ड पिस्तुल : एकेरी : १) विजयकुमार (सेनादल; ५७३), २) समरेश जंग (सीएसएफ; ५७३), ३) अशोक पंडित (महाराष्ट्र; ५६७). सांघिक : १) सेनादल(१६९०, विजयकुमार, एस. के चौधरी, गुरप्रितसिंग) २) बीएसएफ (१६५६; नवेशकुमार, महेंद्र सिंग, तौसिफ कुमार), ३) एअर इंडिया (विवेक सिंग, जितेश कौशल, अनंतप्रीत सिंग; १६५५), ४) महाराष्ट्र (१६५४; अशोक पंडित, रोनक पंडित, शेहजाद मिर्झा). फ्री पिस्तुल या प्रकारात महाराष्ट्राने सांघिक कांस्य पदक मिळविले. १) रुचित कपाडिया- ५२१, २) प्रशांत मुंडे- ४९९, ३) मनोजकुमार- ५०८.

सुपर कप बॉक्सिंग स्पर्धा मुंबईत रंगणार
मुंबई, १४ जानेवारी/क्री.प्र.

मुंबईत १७ ते २१ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील तिसरी सुपरकप बॉक्सिंग स्पर्धा रंगणार असल्याने मुंबईकरांना दर्जेदार बॉक्सिंगची मेजवानी मिळणार आहे. भारतातील १६ बलाढय़ विभागीय संघ या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याने या स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारत या संघांनी सुपर कप स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. मात्र या सर्वामध्ये पूर्व विभागानेच पारडे जड दिसते आहे. आमचे बॉक्सर्स पूर्ण भरात असल्याने आमचा संघ या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची लूट करील, असे पूर्व विभाग संघाचे सचिव अनिल बोहिदार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.दरम्यान, भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रमुख प्रशिक्षक जी. एस. संधू यांनी पतियाळा येथे सुरू असलेल्या शिबिरातील मुलांचा संघही या स्पर्धेत उतरविणार असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या सुपरकप स्पर्धेतील अन्य बलाढय़ संघांना आपले शिबिरार्थी कितपत आव्हान देतात याची चाचपणी करण्याचा त्यांचा मानस आहे. या स्पर्धेत सेनादल किंवा रेल्वे आपला एकच संघ उतरवू शकते. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा चांगल्या बॉक्सर्सना या संघात स्थान मिळू शकत नाही. मात्र या संघात निवड न झालेले बॉक्सर्स सुपरकप स्पर्धेसाठी आपल्या विभागीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या आपल्या बॉक्सर्सना या स्पर्धेत सुरुवातीपासूनच तुल्यबळ लढत मिळू शकतील.