Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची ज्ञानगंगा
ठाणे/प्रतिनिधी

 
सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विशेषत: आदिवासी विभागातील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही मागे पडू नयेत, यासाठी त्यांना सक्षम बनविण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यात एकाच वेळी २६६ सार्वजनिक वाचनालये सुरू करून ग्रंथालयाच्या माध्यमातून ‘ज्ञानगंगा’ थेट गावपातळीवर पोहोचविण्यात येणार आहे. महिनाभरात हा अभिनव उपक्रम कार्यान्वित होणार आहे.
स्पर्धेच्या युगात शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध साधनांची उपलब्धता असते. इंटरनेट स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सतत भरच पडत असते. मात्र ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांना आजही अशा प्रकारच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. परिणामी सर्वच स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडल्याची खंत व्यक्त होत असते. आता मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनाही सर्वज्ञानसंपन्न व स्पर्धेच्या युगाचा सामना करण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. नायक फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानगंगा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यात २५३ केंद्रशाळा आणि १३ गट साधन केंद्रात वाचनालय सुरू करण्यात येणार आहेत. या वाचनालयांमध्ये सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके तसेच अवांतर वाचनाची पुस्तके, स्पर्धा परीक्षा, शिक्षकांना उपयुक्त संदर्भग्रंथ, मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्याची व अन्य विषयांची पुस्तके असतील. या वाचनालयांमध्ये जवळपास दोन हजार शीर्षकांची तब्बल ८० हजार पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवाय तेथे स्थानिक वर्तमानपत्रेही उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष हजारे यांनी दिली.
भिवंडी तालुक्यात २५, वाडा २६, शहापूर ३२, मुरबाड २९, अंबरनाथ १०, वसई १३, पालघर ३२, डहाणू २६, जव्हार १८, मोखाडा १३, तलासरी १० तर सर्वात कमी सात वाचनालये कल्याण तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत.
याशिवाय प्रत्येक तालुक्यात गट साधन केंद्रातही पडघा येथे मध्यवर्ती असे भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून दोन फिरती ग्रंथालये सुरू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या आवडीनिवडीनुसार तसेच मागणीप्रमाणे ही फिरती ग्रंथालये आवश्यक पुस्तके संबंधितांपर्यंत पोहोचविणार आहेत.
फिरत्या ग्रंथालयांमध्ये पुस्तकांबरोबरच एलसीडी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यावर माहितीपट दाखविले जाणार आहेत.
या ज्ञानगंगा योजनेसाठी लागणारा सुमारे एक कोटी रुपयांचा निधी नायक फाऊंडेशनच खर्च करणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी यापेक्षाही अधिक निधी खर्च करण्याची आपली तयारी असल्याचे फाऊंडेशनच्या संचालिका नीना नायक यांनी सांगितले. ही योजना निर्विघ्नपणे चालावी.
तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित करण्यात आल्या आहेत, तर केंद्रप्रमुख वाचनालयांची जबाबदारी सांभाळणार आहेत.