Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

महापौर निवासाच्या तंबूत आर्ट गॅलरीचा उंट
दिलीप शिंदे

 
उपवन येथील नवीन महापौर निवासाच्या आरक्षित भूखंडावर आर्ट गॅलरी बांधण्यास माजी महापौर अनंत तरे यांनी घेतलेली हरकत फेटाळून लावत ठाणे महापालिकेने आरक्षणात फेरबदल करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आरक्षित जागेवरील महापौर निवास तोडून आर्ट गॅलरी बांधली जात नसल्याची भूमिका सभागृह नेते पांडुरंग पाटील यांनी घेतली असताना तरे यांनी त्या ठिकाणी गॅलरी बांधण्यास विरोध केला आहे, तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी विरोध असल्यास गॅलरी इतरत्र बांधण्यास सहमती दर्शविली आहे.
उपवन येथील निर्जन स्थळी असलेल्या महापौर निवासाचा नेहमी राहण्यासाठी वापर केला जात नाही. या निवासाचा वापर पक्षांतर्गत बैठका अथवा वीकएण्डसाठी करण्याची सर्वच महापौरांची परंपरा राहिलेली आहे. या निवासातून चमच्यापासून जेवणाचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रकरण गाजले होते. असे हे बहुचर्चित महापौर निवास पोखरणच्या उपवन तलावापैकी आरक्षित जागेवर आहे. महापौर निवासासाठी आरक्षित असलेल्या जागेवर आर्ट गॅलरी उभारण्याचा ठराव माजी सभापती गोपाळ लांडगे यांच्या आग्रहाखातर १७ जून २००६ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजनही झाले होते. त्यावर शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी हरकत नोंदवली. सुनावणीसाठी न जाता तरे यांनी १२ नोव्हेंबर २००८ रोजी पाठविलेल्या लेखी निवेदनानंतर प्रशासनाने त्यांची हरकत निकालात काढीत आरक्षण बदलाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. वास्तविक महापौरांची सुरक्षा आणि गॅलरीमुळे होणारी माणसांची वर्दळ ही भविष्यात महापौरांना डोकेदुखी ठरणार आहे. शहराचा मध्यभाग वगळून एका टोकाला ही आर्ट गॅलरी उभारणे सयुक्तिक नसल्याचे अनेकांना वाटते.
लोड बेअरिंगवर असलेल्या नगरपालिकेच्या रेस्ट हाऊसमध्ये बदल करून सध्याचे महापौर निवास बनविण्यात आले. उपवन या निर्जन स्थळी हे निवासस्थान असल्याने एकही महापौर तेथे कायमस्वरूपी राहत नाहीत. मात्र भविष्यात उपवन तलावाचे सौंदर्यीकरण, त्याचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना आणि परिसराचा निवासी, वाणिज्य असा विकास होत असल्यामुळे हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात येत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. लगतच येऊर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याने आर्ट गॅलरी किती महत्त्वपूर्ण ठरेल, हे प्रशासनाकडून राज्य शासनाला सांगितले जाणार आहे. आरक्षित २.३१ हेक्टर जागा ही निवासाबरोबर गॅलरीसाठी मुबलक आहे. त्यासाठी फक्त जागेच्या आरक्षणात फेरबदल करण्याची गरज आहे. या फेरबदलावर राज्य शासनाची अंतिम मोहोर उमटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याची धडपड प्रशासनाने सुरू केली आहे.
आर्ट गॅलरीला असलेला विरोध कायम ठेवत सेना उपनेते अनंत तरे यांनी गॅलरी इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. त्यांचा विरोध असल्यास गॅलरी इतरत्र बांधली तरी चालेल, अशी भूमिका घेत माजी सभापती गोपाळ लांडगे यांनी दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले महापौर निवास कुठे बांधण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित केला. सभागृह नेते पांडुरंग पाटील यांनी महापौर निवासाच्या ठिकाणी आर्ट गॅलरी बांधली जात नाही. प्रशासनाने आणलेल्या या प्रस्तावास विरोध असला तरी सभागृहात निर्णय घेतला जाईल. त्यांच्या या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.