Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

भिवंडीत क्रीडासंकुलाचा राजकीय वापर
महापौर प्रशासनावर संतापले!
सोपान बोंगाणे

 
भिवंडीतील परशुराम टावरे क्रीडा संकुलाचा राजकीय वापर करण्यास बंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या बॅनरखाली टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित करण्यास पालिका प्रशासनाने परस्पर संमती दिल्यावरून महापौर जावेद दळवी कमालीचे संतप्त झाले आहेत. महापालिकेच्या हितसंबंधाविरुद्ध मनमानी कारभार करणाऱ्या निष्क्रिय आयुक्तांची त्वरित उचलबांगडी करावी, अशी त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
महापालिकेच्या कै. परशुराम टावरे क्रीडा संकुलाचा वापर कोण-कोणत्या कारणासाठी केला जावा, यासाठी महापालिका सभागृहाच्या संमतीने एक नियमावली तयार करण्यात आली असून, त्यातील नियम क्र. ७ (१) अनुसार यात क्रीडा संकुलाचा कोणत्याही प्रकारे राजकीय वापर करण्यास बंदी आहे. आजपर्यंत या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत राजकीय कारणासाठी मैदानाची मागणी करणाऱ्या विविध पक्षीय नगरसेवक व व्यक्तींचे सुमारे एक डझन अर्ज पालिका प्रशासनाने फेटाळून लावले आहेत, असे असताना त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला राष्ट्रवादी चषक-२००९ टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविण्यास कशी परवानगी दिली, असा महापौरांचा सवाल आहे.
राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक खलिद गुड्डू यांनी या स्पर्धा भरविण्यास हे क्रीडा संकुल विनामूल्य मिळावे, असा अर्ज आयुक्तांना दिला व त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली. महापौरांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी आयुक्त व मुंबई क्रिकेट असो.चे अध्यक्ष शरद पवार यांना लेखी पत्र पाठवून आपली हरकत नोंदविली. एकतर हे मैदान कोणत्याही राजकीय हेतूसाठी वापरण्यास देता येत नाही व नियमावलीच्या कलम ४ नुसार अंध, अपंग, मतिमंद, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीनिमित्त मदतीसाठी आयोजित स्पर्धांशिवाय कुणालाही विनामूल्य देता येत नसल्याची बाब निदर्शनास आणली. त्यानंतर आयुक्तांनी संबंधितांना ९ जानेवारी रोजी दुसरे पत्र देऊन २६ हजार रुपये एवढय़ा भाडय़ाच्या रकमेची मागणी केली. पण मैदान वापरण्याला परवानगी मात्र रद्द केली नाही. आयुक्तांची ही कृती पालिकेच्या आर्थिक हिताला बाधा आणणारी असल्याचा आरोप महापौर दळवी यांनी केला आहे. आपण तक्रार केली नसती तर पालिकेचे २६ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान आयुक्तांच्या निर्णयामुळे झाले असते, असे त्यांनी नमूद केले आहे. या क्रीडा संकुलात पालिकेतर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन केले जाते. आजपर्यंत तालुका व जिल्हास्तरीय मोठय़ा स्पर्धा त्यावर झाल्या. भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू नीलेश कुलकर्णी याने जातीने उपस्थित राहून मैदानाचे कौतुक केले. लेदर बॉल क्रिकेटला चालना मिळावी यासाठी त्यात रणजी व आय.पी.एल. अंतर्गत २०-२० चे सामनेही भरविले जाणार आहेत. त्यासाठी तेथे फ्लड लाईटची व्यवस्थाही विचाराधीन आहे. असे असताना रा. काँ.ला त्यावर टेनिस क्रिकेट सामने घेण्यास परवानगी देऊन पिच व मैदानाची अपरिमित हानी होण्याची भीती महापौर दळवी यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्षास क्रीडा संकुलाचा वापर करण्यास परवानगी देऊन आयुक्तांनी चुकीचा पायंडा पाडला. त्यामुळे यापुढे असे अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या कारणासाठी परवानगी मागण्याची शक्यता असून, प्रशासन कुणालाही परवानगी नाकारू शकणार नाही. त्यामुळे आजपर्यंत जपलेला पिच व मैदानाचा दर्जा याची पुरती वाट लागणार असून, त्यातून लेदर क्रिकेट व खेळाडूंची मोठी हानी होऊ शकते. अशा इतरही काही प्रकरणात प्रशासन चुकीची भूमिका घेत असून, त्यामुळे महापालिकेचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.